অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिवशाहीर बाबासाहेबांचा कृतज्ञ भाव अनुभवताना...!

शिवशाहीर बाबासाहेबांचा कृतज्ञ भाव अनुभवताना...!

महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे चालता बोलता इतिहास. त्यांना ऐकतांना असे वाटते जसे, प्रत्यक्ष आपल्या समोर इतिहास घडतो आहे. अशा व्यक्तीची प्रत्यक्ष भेट म्हणजे आयुष्यातला सुवर्ण क्षणच. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने त्यांच्या अनौपचारिक गप्पा आणि सत्काराच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे शिवशाहीर पुरंदरेंना ऐकण्याची आणि अनुभवण्याची संधी मिळाली. त्यांच्या दिल्ली भेटीत दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल होती. प्रत्येक कार्यक्रमाला चाहत्यांची प्रचंड गर्दी केली.

शिवशाहीर पुरंदरेंबद्दल वाचनात आले होते, त्यांचे साहित्यही वाचले. मात्र, त्यांना प्रत्यक्षात ऐकण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली. इतके मोठे व्यक्तीमत्त्व असूनही, त्या मोठेपणाचा लवलेशही त्यांच्या वागण्यात दिसत नव्हता. विषयाचे सखोल ज्ञान असतानाही, 'हे सर्व आपल्याला वडीलांमुळेच प्राप्त झाल्याचे ' नम्र भाव त्यांनी परिचय केंद्रातील कार्यक्रमात व्यक्त केले. व्यक्तीचा मोठेपणा हा त्याला मोठे करणाऱ्या व्यक्तीचे त्याच्या आयुष्यातील स्थानावरून दिसून येते. बाबासाहेबांच्या बोलण्यातून ही विनम्रता जाणवत होती. ते म्हणाले, ‘मी आज जो काही आहे, तो माझ्या वडिलांमुळेच. माझ्या असण्याचा 95 % वाटा हा माझ्या बाबांचा आहे.’ कधी प्रेमाने तर कधी रागवून त्यांनी माझ्यातली कला जोपासली, फुलवली. हे त्यांचे वाक्य फार काही सांगून गेले.

‘बाबासाहेबांना महाराष्ट्र परिचय केंद्राचे कार्यालय नवे नाही’ हे ऐकून सूखद धक्का बसला. त्यांनी यावेळी दिल्लीतील त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. इथल्या भेटीगाठी त्यांना स्पष्टपणे आठवत होत्या. वयाच्या 96 व्या वर्षी ही त्यांची स्मरण शक्ती पाहून आश्चर्य वाटले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी खासदार ना.गो. गोरे यांच्या सोबतच्या संसदेतील आठवणी तसेच 1961 साली परिचय केंद्रातील प्रथम मुख्य माहिती अधिकारी भा.कृ. केळकर, माजी संचालक आर.एम हेजीब यांच्या बद्दलच्या आठवणींना बाबासाहेबांनी उजाळा दिला.

‘जाणता राजा’ या नाटकाचे ते रचिते आहेत. छत्रपती शिवाजी महारांजाच्या संपूर्ण आयुष्याविषयी वैविध्यपूर्ण असा त्यांचा अभ्यास आहे. शिवाजी महाराजांचे द्रष्टेपण, परराष्ट्र नीती, नेतृत्व क्षमता, योध्दा, पिता, पूत्र, सांसारिक व्यक्ती, राजकीय व्यक्ती अशा संपूर्ण चरित्राचे चिंतन, मनन, लेखन, वाचन शिवशाहीरांनी केलेले आहे. हे या छोटेखानी कार्यक्रमातूनही अनुभवता आले. कार्यक्रमात त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल परदेशी लेखकांनी काय-काय लिहिले आहे, ते सारांश रूपात नमूद केले. इंग्रजीच्या पुस्तकातील उतारेच्या उतारे बाबासाहेबांना तोंडपाठ आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखा बरोबर चे ते ऊर्जीत होतात हे जवळून पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता.

त्यांनी आपल्या संभाषणात आम्हा सर्वांना संदेशही दिला. '"अभ्यासपूर्ण वाचा, लिहा, त्यातूनच उत्तम कलाकाराचा जन्म होतो, आपल्या ताकदीप्रमाणे प्रयत्न करा, स्वत:वर गर्व करू नका." असा संदेशही शिवशाहीरांनी आपुलकीने दिला..आणि त्यांनी हसऱ्या चेहऱ्याने निरोप घेतला.

अंजू निमसरकर-कांबळे, संपर्क- 9899114130

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 11/21/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate