অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समाधानातच सूख असते !

समाधानातच सूख असते !

समाधानातच सूख असते !
परवा माझे एक सहकारी प्राध्यापकमित्र भेटले, बसथांब्यावर. घाईत होते. म्हणाले, ‘तू स्वेच्छानिवृत्ती घेऊन सुटलास, सुखी झालास. मी अजून धावतोच आहे.’ मी म्हणालो, ‘अरे, पुढच्या महीण्यात सेवानिवृत्त झाल्यावर तुही सुटशील, सुखी होशील की ?’ कसनुसा चेहरा करत ते म्हणाले, ‘अरे माझी बस आली, मी निघतो.’ साठीनंतर नोकरीत आणखी दोन वर्षे वाढवून मिळावीत म्हणून प्रस्ताव सादर करण्यासाठी ते विद्यापीठात चालले होते. कुठे थांबायचे ते कळले पाहीजे.

सुख कायम टिकत नाही. सर्वांगीण सुखाचा शोध घेताना दमछाक होते. निसर्ग नियमानुसार सुखाचं रुपांतर दु:खात होत असतं. कारण, कोणतंही सुख मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, हालचाल करावी लागते. हालचालीतून गती निर्माण होते आणि त्याला गतीचे नियम लागू होतात. न्यूटनच्या गतीशास्त्राचा तिसरा नियम म्हणतो की, प्रत्येक क्रियेला समशक्तीची आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. म्हणून सुखासाठी केलेली धडपड तेवढ्याच क्षमतेची आणि विरुद्ध प्रतिक्रिया, म्हणजे दु:ख, निर्माण करते. सुख मिळविण्यासाठी एकतर आधी दु:ख घ्यावं लागतं किंवा नंतर तरी ते भोगावचं लागतं. महान कवयत्री बहिणाबाई चौधरी म्हणते,


अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर ।
आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर ॥
अपत्य प्राप्तीच्या सुखासाठी प्रसववेदना सोसाव्या लागतात. दु:खानंतर येणारी सुखं आपल्याला हवी हवीशी वाटतात परंतु, सुखानंतर येणारी दु:खं मात्र नकोशी वाटतात. भाववाढीनंतर पगारवाढ आणि पगारवाढीनंतर भाववाढ या दुष्टचक्रातील पगारवाढ आपल्याला हवी असते परंतु भाववाढ नको असते. भाववाढीच्या दु:खामुळे पगारवाढीतले सुखही आपण गमाऊन बसतो. पन्नास रुपयाची कॅडबरी, शंभर रुपयाचा पिझ्झा विकत घेणारा कांदे वीस रुपये झाले म्हणून अस्वस्थ होतो आणि आपण महागडा पिझ्झा विकत घेऊ शकतो यातले समाधान हरवून बसतो.


सुखं पाहीजेत हा हव्यास, ती कशी मिळवायची, वाढवायची आणि टिकवायची याची चिंता आपली सगळी सुखं बिघडऊन टाकतात. सूर्यास्तापर्यंत जास्तीत जास्त जमीन पादाक्रांत करण्याच्या हव्यासापोटी धावता धावता कोसळणार्‍या माणसासारखी आपली अवस्था होते. म्हणून जीवनात समाधानाला अनन्यसाधारण महत्व आहे. समाधान मिळविण्याची युक्ती सांगताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण ।
मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते ॥
सुख आणि दु:ख ही मनाची अवस्था असते. कशात सुख मानायचं आणि दु:ख कशाचं करायचं हे, मन ठरवते. मला सुखदायक वाटणारी घटना इतरांना दु:खदायक वाटू शकते. कारण,
अनुकुल वेदनीय सुखम ।
प्रतिकुल वेदनीय दु:खम ॥
सोमनाथ देविदास देशमाने,
अहमदनगर,
भ्रमणध्वनी: ९७६३६२१८५६
.......................................................................................

अंतिम सुधारित : 6/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate