অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वातंत्र्याचे मूल्य !

स्वातंत्र्याचे मूल्य !

स्वातंत्र्याचे मूल्य!
राष्ट्राचे आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य ही एक अत्यंत मौल्यवान वस्तू आहे,ज्याच्यासाठी खूप मूल्य खर्ची टाकावे लागते. जेंव्हा राष्ट्र स्वतंत्र असते तेंव्हा नागरिकांना कांही मर्यादेत स्वातंत्र्य उपभोगता येते,परंतु राष्ट्र पारतंत्र्यात असले की व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो.विदेशी शासक जेंव्हा एखाद्या देश प्रदेशावर आपला अधिकार स्थापन करतात तेंव्हा त्यांची प्रवृत्ती नेहमी प्रजेच्या शोषणाची असते. असे परकिय शासक स्थानिक बौद्धीक, भौतिक संपत्ती आपल्या देशात लुटून नेतात. परकिय शासक व्यक्तीगत पातळीवर सज्जन असोत की दुर्जन, सार्वजनिक पातळीवर ते सामान्य लोकांचे सर्व प्रकारे शोषणच करतात. असे शोषण अतिशोषित सामान्य जनांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करते. ते आत्मशक्तीच्या जोरावर तन-मन-धन समर्पित करुन स्वातंत्र्यासाठी संघर्ष करतात. सामान्य जनांचे हेच आत्मबल संपूर्ण राष्ट्राची प्रेरणा हो‌ऊन राष्ट्र स्वतंत्र होण्यास कारणीभूत होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची पाने याची साक्ष देतात. भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी सामान्य भारतीय जनतेने प्रचंड लढा दिला. काहींनी हिंसेचा मार्ग पत्करला तर बहुतेकांनी अहिंसेचा. उद्देश एकच होता, भारताला स्वतंत्र करणे. भारत ही माझी जन्मभूमी आहे म्हणून कित्येकांनी प्राण पणाला लावले, सर्वस्व अर्पण केले. तुरुंगवास, छळ सोसले, लाठया खाल्या. सर्वांनी एकत्र मिळून स्वातंत्र्य मिळविले. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला. परंतु, आदर्श स्वराज्याचे आपले स्वप्न अजून पूर्ण झालेच नाही. त्यासाठी जे मूल्य द्यायला हवे, जो प्रयत्न करायला हवा, तो आपण पूर्ण क्षमतेने केलाच नाही. आमची देशभक्तीची भावना पातळ झाली. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर स्वातंत्र्य मिळविले खरे! पण त्यानंतर आम्ही आमची संस्कृती आणि इतिहास विसरत चाललो. जो देश आपली संस्कृती विसरतो तो विकृतींच्या अधीन होतो आणि जो देश आपला इतिहास विसरतो,तो देश आपला भूगोलही बिघडवतो. म्हणूनच मोगला‌ईतील बुजूर्ग मंडळी अधूनमधून ’मोगला‌ई बरी होती रे’ असे तर ब्रिटिश अंमलाखालील समवयस्क मंडळी ’इंग्रजी राजवट चांगली होती’ असे हताशपणे म्हणताना आढळतात. त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही असे जरी म्हणता येत नसले तरी त्याचे समर्थन कदापिही हो‌ऊ शकत नाही. शेकडो वर्षाच्या गुलामगिरीने जखडून टाकलेल्या देशाच्या मानसिकतेतून स्वाभिमानी, लोककल्याणकारी, राष्ट्रप्रेमी समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था इत्यादिंच्या निर्माणाचे काम अजुन अपूर्ण आहे. हे काम एकट्या सरकारचे नाही, केवळ नागरिकांचेही नाही. दोघांनी मिळुन त्यासाठी सातत्त्याने प्रयत्न करावे लागतील. शासनप्रणाली व नागरिक यांच्यामध्ये परस्पर सामंजस्य असायला हवे. शासनकर्ते जे कार्यक्रम ,योजना हाती घेतील त्याच्या दूरगामी परिणामांचा, राष्ट्रहिताचा विचार झाला पाहिजे. आम्ही निवडून दिलेले सरकार हे आमचे आहे असे जनतेला, व ज्यांनी आम्हाला निवडून दिले ती रयत आमची आहे असे शासनकर्त्यांना, मनापासून वाटले पाहिजे. समाज घटकांना एकमेकांविषयी विश्वास, आपुलकी व ममत्व वाटले पाहिजे. आम्ही सारे एक आहोत, एक राहू अशा प्रेरणेने जगले व वागले पाहीजे. असे ज्यावेळी हो‌ईल, त्यावेळी मतदानासाठी व इतर कुठल्याही कामासाठी लाच देणे घेणे आपो‌आपच बंद हो‌ईल, कारण मी ज्याला आपला मानले त्याला लाच देणे किंवा त्याच्याकडून घेणे संभवत नाही. भारताच्या पुनर्निर्माणासाठी कर्तृत्वसंपन्न माणसांची नितांत आवश्यकता आहे. माझ्या वाट्याला आलेले काम हे माझ्या राष्ट्राचे काम आहे अशी वृत्ती अंगी धारण करणारे व त्याप्रमाणे वागणारे नागरिक ज्या देशात असतात त्या देशाला वैभवाच्या शिखराकडे जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. असे नागरिक बनण्याचा व आपल्या मातृभूमीला परमवैभवाच्या शिखरावर स्थानापन्न करण्याचा संकल्प आजच्या स्वातंत्र्यदिनी आपण सर्वजण करु या. आपल्या आतला आत्मविश्वास जागृत करु या. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांना उचित न्याय देण्याचा व त्यांच्या स्वप्नातील भारत प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु या. वंदे मातरम.
सोमनाथ देविदास देश्माने,
अहमदनगर,
भ्रमणध्वनी: ९७६३६२१८५६
.................................................................................

अंतिम सुधारित : 8/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate