आधार ॲपची वाढती लोकप्रियता आणि डिजिटल-फर्स्ट ओळख सेवा आधार ॲपचा स्वीकार आधार क्रमांक धारकांमध्ये (ANHs) वेगाने होत आहे, जो रहिवाशांचा सोयीस्कर आणि डिजिटल-फर्स्ट ओळख सेवांवरील वाढता विश्वास दर्शवतो. आधार ॲपचा वाढता वापर हेच स्पष्ट करतो की ते विविध प्रकारच्या आधार सेवा मिळवण्यासाठी एक विश्वासू आणि वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म बनले आहे. यात घरबसल्या पत्ता बदलणे, मोबाईल नंबर अपडेट करणे, ईमेल अपडेट करणे, बायोमेट्रिक लॉक/अनलॉक करणे आणि ई-आधार डाउनलोड करणे यांसारख्या सेवांचा समावेश आहे. या ॲपने आतापर्यंत ४ कोटींहून अधिक डाउनलोड्सचा टप्पा ओलांडला असून ही संख्या दररोज वाढत आहे. सुरुवातीपासूनच, आधार ॲपने ११.६५ लाख पत्ते अपडेट करण्यात मदत केली आहे, ज्यामुळे रहिवाशांना कोणत्याही आधार केंद्रावर न जाता घरबसल्या आपले आधार तपशील सोयीस्करपणे अद्ययावत ठेवणे शक्य झाले आहे. या ॲपद्वारे जवळपास ४९ लाख मोबाईल नंबर देखील अपडेट करण्यात आले आहेत, ज्यामुळे रहिवाशांना त्यांच्या आधारशी जोडलेली संपर्क माहिती अचूक ठेवण्यास मदत झाली आहे. १ जुलै रोजी ईमेल अपडेट फिचर लाँच झाल्यापासून, आधार ॲपच्या माध्यमातून सुमारे १२.५ लाख ईमेल पत्ते जोडले किंवा अपडेट केले गेले आहेत, ज्यामुळे रहिवासी आणि यूआयडीएआय (UIDAI) यांच्यातील संपर्क अधिक मजबूत झाला आहे. पूर्वी या सुविधेसाठी ७५ रुपये शुल्क आकारले जात होते, परंतु आता आधार ॲपवर ही सुविधा ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ॲपवरील गोपनीयता आणि सुरक्षेच्या (Privacy and Security) फिचर्सचाही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. रहिवाशांनी 'बायोमेट्रिक लॉक/अनलॉक' या सुविधांचा १ कोटी ९१ लाखांहून अधिक (१९.१ दशलक्ष) वेळा वापर केला आहे. हे फिचर आधार धारकांना त्यांच्या वैयक्तिक माहितीवर अधिक नियंत्रण ठेवण्यास सक्षम करते. याद्वारे नागरिक आवश्यकतेनुसार कधीही आपले बायोमेट्रिक्स इन्स्टंटली लॉक किंवा अनलॅक करू शकतात, ज्यामुळे केवळ काही क्लिक्समध्ये सुरक्षेचा एक अतिरिक्त थर मिळतो. आधार ॲप हे आधार धारकांना त्यांची ओळख दाखवण्यासाठी, शेअर करण्यासाठी आणि पडताळणी करण्यासाठी एक सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. 'डिजिटल इंडिया मिशन' आणि 'विकसित भारत' यांच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून लोकांचे जीवन अधिक सुकर (Ease of Living) बनवण्यात हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावत आहे.