आधार ॲपच्या माध्यमातून आधारमध्ये ईमेल आयडी मोफत समाविष्ट किंवा अद्ययावत करा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आता नागरिकांना आधार केंद्राला भेट न देता, थेट 'आधार ॲप'द्वारे (Aadhaar App) त्यांच्या आधार कार्डमध्ये ईमेल आयडी समाविष्ट किंवा अद्ययावत करण्याची परवानगी दिली आहे. १ जुलै २०२६ पासून पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ही सेवा केवळ आधार ॲपद्वारे पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांची आधार माहिती अद्ययावत ठेवणे पूर्वीपेक्षा अधिक सुलभ होणार आहे. ययुआयडीएआय नागरिकांना आधारमध्ये ईमेल आयडी जोडण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहे. नागरिक आधार ॲप डाउनलोड करून किंवा अपडेट करून ईमेल अपडेटच्या या सुविधेचा वापर करू शकतात. नवीन आधार ॲप अँड्रॉइड (Android) आणि ॲपल (Apple iOS) या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. नागरिक हे ॲप येथे डाउनलोड करू शकतात: https://pehchaan.uidai.gov.in/app/download आधार ॲपवर ही नवीन सेवा उपलब्ध झाल्यापासून अवघ्या दोन दिवसांत २५०,००० (अडीच लाख) हून अधिक नागरिकांनी आपला ईमेल आयडी अद्ययावत केला आहे. आधारसोबत ईमेल जोडल्यामुळे , जेव्हा जेव्हा आधार प्रमाणीकरणाची विनंती केली जाते, तेव्हा त्याची रिअल-टाईम ईमेल सूचना मिळण्यास मदत होते. यामुळे पारदर्शकता वाढते आणि आधार क्रमांकधारकांना कोणत्याही कारणासाठी त्यांच्या आधारचा वापर झाल्यास त्याबद्दल तात्काळ माहिती मिळून सुरक्षिततेचा एक अतिरिक्त स्तर प्राप्त होतो. सदर प्रक्रियेतून प्रत्यक्ष केंद्रावर जाण्याची आवश्यकता रद्द करून, हा उपक्रम 'विकसित भारत'च्या दिशेने 'डिजिटल इंडिया' उपक्रमाचा एक भाग म्हणून नागरिकांना सुलभ डिजिटल सेवा प्रदान करण्याच्या युआयडीएआयच्या वचनबद्धतेवर भर देतो. राहणीमान अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेले नवीन आधार ॲप नागरिकांना त्यांच्या स्मार्टफोनवरून थेट मोबाईल नंबर अपडेट आणि पत्ता अपडेट यांसारख्या अनेक सेवा सहजपणे प्राप्त करण्यास सक्षम करत आहे. आत्तापर्यंत, ४ मिलियन (४० लाखां) हून अधिक लोकांनी नवीन आधार ॲपचा वापर करून त्यांचे मोबाईल नंबर अपडेट केले आहेत. त्याच वेळी, सुमारे १ मिलियन (१० लाख) लोकांनी त्यांचा पत्ता अपडेट करण्यासाठी या ॲपचा वापर केला आहे.