औषधी वनस्पती प्रक्रिया ही औषधी वनस्पतींची किफायतशीर लागवड करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब ठरते. या वनस्पतींवर शेतक-यांच्या शेतानजीक प्रक्रिया केल्याने वाहतुकीस लागणारा वेळ, खर्च व परिश्रम कमी होतील व प्रक्रिया केलेल्या मालास चांगला दर मिळण्याबरोबर साठवणूक करणेही सोपे जाते. शेतकरी व्यक्तिशः किंवा सहकारी पद्धतीवर अशी प्रक्रिया केंद्रे उभारु शकतात, जेणेकरून उत्पादनाची प्रक्रिया करण्याबरोबरच स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. औषधी वनस्पतींची योग्य पद्धतीने प्रक्रिया करुन त्यांचा दर्जा चांगला ठेवणे हे हमखास बाजारपेठ व चांगला बाजारभाव मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक ठरते. योग्य व दर्जेदार औषधी उत्पादनासाठी योग्य वेळी काढणी व वनस्पतींच्या आवश्यक भागाची (फळे, पाने, फुले, बिया, मुळे, पंचांग इ.) व वनस्पतीस कमीतकमी नुकसान होईल या दृष्टीने काढणी केली जाते. काढणी सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा वनस्पतींच्या भागांची काळजीपूर्वक हाताळणी करून सावलीत किंवा बंद जागेत त्या गोळा करून थंड व कोरड्या जागेत साठवून ठेवाव्यात. त्यामुळे प्रक्रियेसाठी उत्तम दर्जाचे कचे उत्पादन उपलब्ध होते. प्रक्रियेचे महत्व औषधी वनस्पती उत्पादने गोळा करताना व हाताळणी दरम्यान भौतिक व तांत्रिक दृष्ट्या नुकसान होते. रासायनिक बदलांमध्ये उत्पादन दर्जा, रंग यांवर अनिष्ट परिणाम होऊन सडण्याची प्रक्रिया सुरू होते. जैव-रासायनिक बदलांमुळे वनस्पती उत्पादनामधील मुख्य औषधी तत्वे नष्ट होण्याची शक्यता असते. जैवशास्त्रीय बदल जिवाणू, बुरशींच्या प्रादुर्भावामुळे वनस्पती किडी व रोगांना बळी पडल्याने घडतात. औषधी उत्पादनांमध्ये कच्या माल म्हणून त्या वनस्पतीची काढणी करताना ओलावा अधिक प्रमाणात असतो. आपल्याकडील उष्ण व आर्द्र हवामानामुळे उपरोक्त घटकांमुळे सडण्याचा दर वाढतो. उत्पादनाची काढणी व प्रक्रिया यामध्ये मोठा कालावधी असल्याने त्यांचा दर्जा घसरण्यास वाव राहतो. शेतक-यांची अयोग्य हाताळणी व अकुशल कामगारवर्ग यामुळे उत्पादनांचा योग्य दर्जा मिळवण्यात अडचणी निर्माण होतात. या प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करून उत्पादित मालाचा दर्जा टिकविण्यासाठी प्रक्रिया अत्यावश्यक ठरते. प्रक्रियेच्या पद्धती (सुकविणे) सुकविणे/ओलावा कमी करणे : यामध्ये सूर्यप्रकाशाचा प्रत्यक्ष संपर्क टाळून खास सुकविण्यासाठी तयार केलेल्या शेडमध्ये वनस्पतींचे भाग वाळवावेत. भागांचा आकार कमी केल्याने सुकविणे सुलभ होते. उत्पादन स्वच्छ करून लवकर सुकवून घेणे प्रक्रियेचा दृष्टीने महत्वाचे ठरते. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने सुकवणी : यंत्रात औषधी वनस्पतीचा भाग सुकविला जातो. यामध्ये अनेक प्रकारची सुकवणी यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे निसर्गत: उपलब्ध सूर्यप्रकाशाचा वापर सुकविण्यासाठी परिणामकारकपणे केलेला असतो. गरम हवेचा उपयोग करून कॅबिनेट सुकवणी : यंत्रात (Hot air cabinet drier) ४५ ते ५५ अंश सें.ग्रे.तापमानास औषधी वनस्पतींची सुकवणी केल्यामुळे कमीतकमी वेळात व योग्यरितीने औषधी कंपन्यांनी मागणी केलेल्या मानकाप्रमाणे सुकवणी करून त्यांचा दर्जा राखला जातो. या यंत्रामध्ये सुकवणी केल्याने त्यामध्ये कोणत्याही प्रभाव पडत नाही. निर्वात सुकवणी यंत्र (Vaccume drier) : यामध्ये उष्णतेने प्रभावित होणा-या वनौषधी उत्पादनाची सुकवणी केली जाते. यामध्ये निर्वात पोकळीमध्ये वनस्पती भागाची सुकवणी केल्यामुळे उष्णतेने प्रभावित होऊन औषधीद्रव्यांचे प्रमाण कमी होत नाही. गोठणबिंदू तापमानास सुकवणी (Freeze drier) : अशा सुकवणी यंत्रामध्ये उद्य मूल्य असणा-या वनस्पती सुकविल्या जातात. या राखले जाते. शितगृहात साठवण (Cold storage) : यामध्ये ज्या वनस्पती ताज्या अवस्थेत औषधी तयार करण्यासाठी वापरल्या जातात. त्या काही कालावधीसाठी साठवल्या जातात. तात्पुरत्या साठवणीमध्ये वनस्पतींची अवस्था किंवा रचनेत बदल न होता प्रक्रियेसाठी आवश्यक उत्पादन योग्य वेळेत उपलब्ध होते. प्रक्रिया (स्तरनिहाय) औषधी वनस्पतींची प्रक्रिया विविध स्तरांवर योग्य काळजी घेऊन करणे आवश्यक असते. प्राथमिक स्तरावर वनस्पती सुकवून तिचे योग्य आकाराच्या पिशव्यांमध्ये पॅकेजिंग केले जाते. तर द्वितीयक स्तरावर सुकलेल्या वनस्पती उत्पादनांचे विविध प्रकारात चूर्ण बनविले जाते. तृतीय स्तरावर औषधी तत्वे/ द्रव्ये विलग करून औषधे बनविली जातात. प्राथमिक स्तरावरील प्रक्रिया वनस्पती उत्पादनांची काढणी व गोळा करणे : यामध्ये औषधीदृष्ट्या उपयुक्त असणा-या भागांची औषधीद्रव्ये मुबलक प्रमाणात वनस्पतीमध्ये असताना काढणी करणे आवश्यक ठरते. चरकसंहितेत विविध भागांची काढणी करून संग्रह करण्याचा योग्य कालावधी सांगितलेला आहे. त्याप्रमाणे मुळांची काढणी जेव्हा जुनी पाने गळून नवीन पालवी फुटते अशा वेळी म्हणजे शिशिर (डिसेंबर ते फेब्रुवारी) किंवा ग्रीष्म (एप्रिल ते जून) या ऋतूमध्ये मुळे वीर्यमान होता व त्याची काढणी या कालावधीत करावी. फांद्यांची काढणी वसंत (फेब्रुवारी ते एप्रिल) किंवा वर्षा (जून ते ऑगस्ट) ऋतूमध्ये करावी. यावेळी फुले येतात व फळे पिकतात तसेच पाने जून झालेली नसतात. त्यावेळी वरील ऋतूमध्ये पानांची देखील काढणी योग्य समजतात. सालीचा (त्वचा) संग्रह ती पुष्ट असताना शरद (ऑगस्ट-उत्तरार्ध ते ऑक्टोबर-पूर्वार्ध) ऋतूत करावा. फुले व फळांचा संग्रह करताना (ऑक्टोबर- उत्तरार्ध ते डिसेंबर-पूर्वार्ध) ऋतूत काढावेत तर पंचांग देखील याच ऋतूत संग्रह करणे योग्य ठरते. काढणी करताना वनस्पती समूळ नष्ट होणार नाही, याची काळजी घ्यावी. गोळा/संग्रहीत वनस्पती उत्पादन काळजीपूर्वक हाताळणी करून थंड व कोरड्या जागी सावलीत साठवावे. स्वच्छ करणे : औषधी वनस्पती काढणीनंतर तिच्याबरोबर अन्य काडीकचरा, माती व तणांचा भाग असण्याची शक्यता असते. त्यासाठी असा भाग स्वच्छ असणे आवश्यक असते. प्रतवारी : यामध्ये स्वच्छ केलेले औषधी वनस्पतींचे भाग प्रतवारी करून अलग करावेत, जेणेकरून योग्य व दर्जेदार उत्पादनापासून चांगल्या प्रतीचा कचा माल मिळू शकेल. धुणे : वरील पद्धतीने प्रतवारी केलेला कद्यामाल स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा, त्यामुळे त्यावर असणारी माती स्वच्छ केली जाईल. सुकविणे : औषधी वनस्पती उघड्यावर प्रत्यक्ष सूर्यप्रकाशाच्या संपर्कात सुकविल्या जात नाहीत, कारण उष्णतेमुळे प्रभावित होऊन नष्ट होणारी त्यातील काही औषधी तत्वे (द्रव्ये) नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांतील ओलावा साधारणत: आठ टक्के होईपर्यंत त्या कोरड्या जागेत व सावलीत मुळ्या सुकविल्या जातात. पॅकेजिंग : वनस्पतीची योग्य प्रकारे सुकवणी केल्यानंतर त्यांच्या आकारमानानुसार पॅकेजिंग करणे आवश्यक ठरते. अश्वगंधा/ सर्पगंधा अशा औषधी वनस्पतींच्या मुळ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये साठवून ठेवाव्यात. इतरही औषधी वनस्पतींसाठी कापडी पिशव्या किंवा पोत्याचा वापर पॅकेजिंगसाठी करावा. त्यानंतर पोती सीलबंद करावीत. द्वितीयक स्तरावरील प्रक्रिया दळणे (Grinding) : वनस्पतींच्या सुकलेल्या भागांचा आकार कमी करण्यासाठी छोटे तुकडे केले जातात व त्यानंतर गिरणीमध्ये / दळणयंत्रामध्ये (Ginder-2Hp च्या पुढे) दळले जातात. चाळणी (Screen grading) : दळलेल्या चूर्णाच्या विविध प्रकारच्या चाळण्यामध्ये चाळून सूक्ष्म, अतिसूक्ष्म व भरड चूर्ण अशी प्रतवारी करण्यात येते. विविध आकारमानाच्या चूर्णाची निर्मिती करण्यासाठी वेगवेगळया जाळी क्रमांकाच्या (Mesh.No) चाळण्या वापरल्या जातात. पॅकेजिंग (Packing) : उपरोक्त चूर्ण विविध आकाराच्या प्लॅस्टिक बरण्यांमध्ये/ पिशव्यांमध्ये वजनानुसार भरली जातात. अशा चूर्णाचे पॅकिंग करताना त्या पदार्थाच्या (Packing Material) वनस्पती द्रव्यांचा भौतिक / रासायनिक गुणधर्मावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे उत्पादनाचा दर्जा व गुणधर्म सुरक्षित राखले जातात. कल्प तयार करणे : शेतक-यांच्या शेतावर व अत्यल्प गुंतवणुकीवर तयार केले जाणारे उत्पादन म्हणून कल्पाचा समावेश करता येईल. कल्प तयार करण्याची पद्धत सोपी असून त्यामध्ये ताज्या शतावरी/ मुसळी कंदाबरोबर साखरेचा वापर केला जातो. कल्प तयार करण्यासाठी २ किलो स्वच्छ धुतलेले कंद स्टेनलेस स्टील पातेल्यामध्ये १६ लीटर पाण्यात उकळून २ लीटर काढा तयार केला जातो. चोथा गाळून काढा कमी आचेवर ८ किलो साखर टाकून चूर्ण तयार होईपर्यंत उकळला जातो. काढा उकळत असताना ढवळणे आवश्यक आहे. सर्व मिश्रणाचे कोरडे खडे झाले म्हणजे उष्णता देणे बंद करावे. अशाप्रकारे तयार होणारा कल्प योग्य आकाराच्या बरण्यांमध्ये भरून सीलबंद करावा. तृतीयक स्तरावरील प्रक्रिया या स्तरावरील प्रक्रियेमध्ये औषधी वनस्पतीमधील प्रमुख औषधी द्रव्यांचे विलगीकरण करून त्यापासून औषधे बनविली जातात. वनस्पतीमधील तत्वांचे विलगीकरण केल्याने त्यापासून बनविलेल्या गोळ्या इतर औषधे परिणामकारकरीत्या वापरल्या जातात या स्तरावरील प्रक्रिया गुंतागुंतीच्या व तंत्रज्ञानदृष्ट्या उच्च दर्जाच्या व क्लिष्ट असल्याने मोठमोठ्या औषधी कंपन्यांमध्ये वापरल्या जातात. प्रमुख औषधीद्रव्यांच्या विलगीकरणानुसार प्रक्रिया पाण्यात विद्राव्य असणारी द्रव्ये गरम पाण्यात विद्राव्य असणारी द्रव्ये उच्च तापमान व दाबाखाली विलग केली जाणारी द्रव्ये पाण्यात न विरघळणारी परंतु विशिष्ट द्रावकांमध्ये (अल्कोहोल/ क्लोरोफॉर्म) इ. विद्राव्य द्रव्ये उदा. अल्कलॉइड्स तेलांमध्ये विद्राव्य अशी औषधीद्रव्ये सांद्रीभवन पद्धतीने विलग केली जाणारी द्रव्ये उदा. (सीवेंजर्स विलगीकरण पद्धत) क्रोमॅटोग्राफीक पद्धतीने अलग केली जाणारी द्रव्ये उदा. व्हीनक्रोस्टीन (सदाफुली) अविद्राव्य औषधीद्रव्ये (डिस्पेर्सिन,सेण्ट्रिफुगतीव)औषधी वनस्पतींची प्रक्रिया विविध स्तरांमधून जाते. व्यापारीदृष्ट्या महत्वाच्या औषधी वनस्पतीनपासून मिळणारी रासायनिक द्रव्ये खालीलप्रमाणे . अ.क्र. वनस्पतीचे नाव मिळणारे रसायन १ सोनामुखी सोनोसाईड २ रानवांगी सोलॅसीडीन ३ पानपिंपळी पायपरेन ४ कळलावी कोल्चीसीन ५ अश्वगंधा सोमणीफेरीन ६ रानकांदा सीलॅरीन ७ अॅलीमानस झॅन्थोटॉक्सीन ८ कुडा होल्टेरीन ९ जेष्ठमध ग्लीसाहीरीनीन १० वावडिंग इम्बेलीन ११ सर्पगंधा रीसेपिन १२ सदाफुली व्हिनक्रोस्टीन १३ डायस्कोरिया डायासजेनीन १४ खुरासणी /ओवा ट्रोपेण १५ शतावरी सॅपोनीन , शतावरीन १६ सफेद मूसळी सॅपोनीन १७ गुग्गुळ गुग्गुळस्टेरॉल १८ कोरफड एलोइन १९ खाजकुहिली म्युक्यूनाईन २० ब्राम्ही बॅकोसाईड-ए औषधी वनस्पतींच्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यामध्ये सुकवणी यंत्रे (Diers), चूर्ण तयार करण्यासाठी यंत्रे (Grinders), बरण्या भरणारी व सिलींग करणा-या यंत्राचा समावेश होतो. ज्या शेतक-यांना उत्पादनावर प्रक्रिया करून त्यांचे मूल्य वाढवण्याची इच्छा आहे. ते सदर प्रक्रिया साहित्य व त्यांच्या कार्यपद्धती व दर्जाविषयी माहिती प्राप्त करून स्वतःच्या शेतावर किंवा सामूहिकरीत्या प्रक्रिया करु शकतात. प्रक्रिया करताना औषधी वनस्पतीच्या दर्जावर लक्ष ठेवून खरेदीदार कंपन्यांच्या मागणीप्रमाणे व त्यांना अपेक्षित असणा-या मानकाप्रमाणे कच्च्या मालावर प्रक्रिया करून उत्पादनामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन