गावतळी आणि विहिरी यांचा मुख्य आधार भूजल आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मुख्यतः हरितक्रांतीपूर्वी विहिरी आणि गावतळी हेच बागायती शेतीसाठीच्या आणि पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत होते; परंतु हरित क्रांती आणि विजेचे सार्वत्रीकरण यामुळे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आणि लवकरच भूजल पातळीत मोठ्या वेगाने घट झाली. यातच १९७०-१९८० च्या दशकात राज्यातील जनतेला मोठ्या दुष्काळांची झळ सोसावी लागली. याचा परिणाम म्हणून शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आणि याच काळात बोअरवेलचे तंत्रज्ञान बागायती शेतक-यांच्या मदतीला धावून आले. बोअरवेलचे तंत्रज्ञान पहिल्यांदा महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आणले गेले; परंतु त्याचा उपयुत परिणाम पाहून अनेक शेतक-यांनी त्यांच्या शेतामध्ये बोअरवेल्स खणल्या. लवकरच हे तंत्रज्ञान अधिक स्वस्त आणि सर्वत्र सहज उपलब्ध झाले, त्यामुळे छोट्या, मध्यम व मोठ्या शेतक-यांमध्ये बोअरवेल्स खणण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली, अर्थातच यामुळे काही ठिकाणी जमिनीची अक्षरशः चाळणी झाली, अनेकांनी नगदी पिकांसाठी बोअरवेल्सच्या पाण्याचा भरमसाठ उपसा केला आणि परिणामी भूजलाची पातळी आणखी खोल गेली. साधारण मागच्या दोन दशकांपासून जेव्हा अगदी खोलवर उभे आणि आडवे बोअरवेल्स घेऊनसुद्धा पाणी मिळणे दुर्लभ झाले, तेव्हा शेतकरी वर्ग मुख्यत: फळ बागायतदार शेतकरी वर्ग हवालदिल झाला. मोठ्या काळजीने उभ्या केलेल्या फळबागा तोडण्याची वेळ त्याच्यावर आली व पिण्याच्या पाण्यासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांची वणवण सुरू झाली. अनेक ठिकाणी भूजल साठे जवळजवळ रिकामे झाले. अशा अटीतटीच्या परिस्थितीत साधारण नव्वदीच्या दशकानंतर शेततळ्यांची संकल्पना फळबाग बागायतदार शेतक-यांच्या मदतीला अगदी जीवनदानासारखी धावून आली. पावसाळ्यात शेतातून वाहून जाणारे पाणी शेततळ्यातच अडवायचे व हेच पाणी टंचाईच्या काळात पिकांसाठी वापरायचे हे यामागील मुख्य सूत्र होते, तर शेततळ्यात साठविलेले पाणी भूजलाची पातळी उंचावण्यास साहाय्यभूत ठरेल, हे साधे गणित यामागे होते; पण प्रत्यक्षात अतिशय वेगात वाढत असलेली शेततळ्यांची संख्या आणि त्यात पाणी साठविण्यासाठी होणारा भूजलाचा अनिबंध उपसा आणि वापर यामुळे एकूण पाणी वापराचे चित्र पूर्णपणे बदलून गेले आहे. परिणामी शेततळी भूजलाच्या पातळीत आणखी घट होण्यास कारणीभूत ठरत आहेत. शेततळ्यांची सद्यस्थिती शेततळ्यांमुळे भूजल टंचाईच्या काळातही आपली शेती बागायती करण्यासाठी पाणी उपलब्ध होण्याची पकी खात्री झाल्याने बागायतदार शेतकरी अल्पावधीत शेततळ्यांकडे आकृष्ट झाले. शेततळ्यातील पाण्याचा योग्य वापर आणि त्याद्वारे शेतीतून भरघोस उत्पन्न मिळविल्याच्या अनेक यशोगाथा बघण्यास व ऐकण्यास मिळतात. शेततळ्यांची ही परिणामकारकता बघून शेतातळ्याचे धोरण अगदी मोठ्या प्रमाणावर राबविण्यासाठी आणि शेतक-यांना अनुदान आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य पातळीवर अनेक सरकारी योजना आणल्या गेल्या. यंदाच्या दुष्काळसदृश परिस्थितीत तर महाराष्ट्र सरकारने 'मागेल त्याला शेततळे' देण्याची घोषणाच केली होती. केंद्र सरकारने सादर केलेल्या यंदाच्या अंदाजपत्रकात एका वर्षात ५ लाख शेतातळी आणि विहिरी घेण्याचे नमूद केले होते. एकंदर शेततळ्यांची संख्या वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ग्रामीण भागात फिरताना आणि शेतक-यांशी चर्चा करताना दुर्दैवाने शेततळ्यांविषयी जे चित्र दिसते ते फारच निराशाजनक आहे. शेततळी तयार करण्यामागील मुख्य उद्दिष्ट आणि प्रत्यक्षात शेततळी वापरण्याच्या शेतक-यांच्या पद्धती यात प्रचंड तफावत दिसून येते. पावसाचे वाहून जाणारे अतिरित पाणी शेततळ्यात साठविणे हा जरी एक मुख्य उद्देश असला, तरी प्रत्यक्षात पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविणारे शेततळे शोधूनही सापडत नाही. याउलट जवळजवळ सर्वच बागायतदार शेतकरी विहिरी किंवा बोअरवेल्सच्या माध्यमातून जमिनीतील भूजलाचा उपसा करून शेततळ्यात पाणी साठवितात. परिणामी भूजलाची पातळी आणखी खोल जाण्यास ते कारणीभूत ठरत आहे. शेततळे नव्हे ,साठवण तलाव वापरात असलेल्या शेतातळ्यांत साठविलेले पाणी जमिनीत मुरून भूजलाच्या साठ्यात वाढ होण्याची सुतरामही शक्यता दिसून येत नाही, कारण ती सर्व शेतातळी प्लास्टिक पेपरने आच्छादित केलेली आहेत, त्यामुळे सरकारी पातळीवर जरी 'शेततळे' हा शब्दप्रयोग वापरला जात असला, तरी प्रत्यक्षात ते 'साठवण तलाव' असलेल्या कोणत्याच शेततळ्याला डिझाईननुसार (प्रस्तावित रचनेनुसार) पावसाचे पाणी आत येण्यासाठी गरजेचे असलेले 'इनलेट आणि ओवरफ्लो वाहून जाण्यासाठी 'आऊटलेट दिसून येत नाही. यातील दुसरी अडचणीची बाब म्हणजे शेततळ्यांच्या एकूणच नियमनाचा आणि नियोजनाचा असलेला अभाव. शेततळी मंजूर करताना एका गावात किंवा पाणलोट क्षेत्रात त्या क्षेत्राच्या क्षमतेनुसार किती शेततळी असावीत, याबद्दल कुठेही स्पष्टता दिसून येत नाही. अनेक गावे अशी आहेत, जिथे शेततळ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. जालना जिल्ह्यातील एका गावात तर वापरात असणा-या शेततळ्यांची संख्या ३०० च्या वर दिसून आली. शेततळ्यांच्या संख्येबरोबर आणखी एक कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे शेतातळ्यांच्या आकारमानांचा. जरी ठरावीक आकारमानाच्या शेततळ्यासाठी सरकारी अनुदान मिळत असले, तरी जवळपास सर्वच बागायतदार शेतकरी त्यात अतिरित खासगी गुंतवणूक करून शेततळी आकाराने मोठी व अधिक खोल करतात. अनेक ठिकाणी अर्धा एकर ते एक एकर क्षेत्रफळाची शेततळी सरसि पाहायला मिळतात आणि याचे मुख्य कारण म्हणजे शेतातळ्यांची संख्या. काही ठिकाणी शेततळ्यांची संख्या किती असावी आणि त्यांचे आकारमान काय असावे यावर सरकारी विभागाचे आणि अधिका-यांचे कोणतेही नियमन व नियंत्रणही दिसत नाही. शेतातळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन : काळजीचा मुद्दा यात पुढील अडचणीचा भाग आणि काळजीचा मुद्दा म्हणजे शेततळ्यात साठविल्या जाणा-या पाण्याच्या बाष्पीभवनाचा. भूगर्भात सुरक्षित असलेले भूजल सूर्यप्रकाश आणि हवेच्या संपर्कात आणण्याचा प्रकार शेततळ्यांच्या माध्यमातून घडताना दिसतो. महाराष्ट्राच्या अनेक भागांत उन्हाळ्यात सरासरी तापमान ४० अंशापर्यंत जाते, यामुळे बाष्पीभवनाचा वेग अशा भागात अतिशय वाढतो. महाराष्ट्रात अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, तळी, धरणे किंवा कालवे यांसारख्या जलसाठ्यांतून वर्षाला साधारणपणे एकूण जलसाठ्याच्या ४० ते ४२ टके इतक्या पाण्याचे बाष्पीभवन होते. शेततळ्यांची वाढत असलेली प्रचंड संख्या, एकूण आकारमान आणि पाणी साठवण्यासाठी होत असलेला प्रचंड भूजल उपसा यामुळे शेततळ्यांतील पाण्याच्या बाष्पीभवनाचा मुद्दा अतिशय काळजीचा बनली. शेततळ्याच्या वापराचे दुष्परिणाम शेततळी भरण्यासाठी होणा-या भूजल उपशाचा सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हणून अनेक गावांत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, शेतक-यांच्या शेततळ्यांमध्ये अगदी उन्हाळ्यामध्येसुद्धा बागायतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध आहे; पण त्याच वेळेस गावात मुख्य कारण म्हणजे बागायतदार शेतकरी शेततळी भरण्यासाठी प्रचंड प्रमाणात भूजल उपसतात, परिणामत: भूजल स्तर अधिक खोल जाऊन एकूण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावत आहे. गावाला पाणी पुरवठा करणा-या विहिरी व बोअरवेल्स लवकरच कोरड्या पडत आहेत. ज्या गावात मोठ्या प्रमाणात शेतातळी बांधली गेली आहेत, त्या गावातून वाहून येणा-या पाण्यावर मर्यादा पडल्या आहेत, ज्याचा परिणाम खालच्या भागातील गावाच्या पाण्याच्या उपलब्धतेवर होत आहे. अशा धोरणांमुळे जमिनीवर साठवलेल्या पाण्याला महत्व व प्रोत्साहन मिळत असल्यामुळे भूजल साठा व वाहते पाणी यावर मर्यादा येत आहेत, परिणामी त्यावर अवलंबून असणारी स्थानिक जैवविविधता व भूजल साठे धोक्यात येत आहेत. महत्वाच्या उपाययोजना रब्बी आणि उन्हाळी पिके मुख्यत: फळबागा यांच्या सिंचनासाठी कमी पावसाच्या प्रदेशामध्ये शेततळी हे निश्चितच एक उपयुक्त आणि परिणामकारक साधन आहे; परंतु यासाठी शेतातळ्यांच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये समन्वय आणि योग्य नियमनाची तातडीने गरज आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी पुढील सात उपाय योजणे आवश्यक वाटते. १. भूजल उपशावर बंधने - टंचाईग्रस्त भागात आणि विशेषतः शोषित आणि अतिशोषित पाणलोट क्षेत्रामध्ये शेतातळ्यात पाणी साठविण्यासाठी होणा-या भूजल उपशावर कायदेशीर बंदी घालणे आवश्यक आहे. अशा भागात शेततळी फक्त वाहून जाणा-या पावसाच्या पाण्यानेच भरणे हे कायदेशीर बंधनकारक असावे. २. शेतातळ्यांच्या संख्येवर मर्यादा - कोणत्याही गावात किंवा पाणलोट क्षेत्रात त्या भागातील एकूण जलसंपत्तीच्या क्षमतेनुसार शाश्वत जलनियोजनाच्या दृष्टीने जास्तीत जास्त किती शेततळी योग्य आहेत, याचे नियोजन करणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे हे नियोजन करताना त्या गावातील जलसाठ्यावर व गावातून वाहून जाणा-या पावसावर अवलंबून असणा-या गावांमधील पाण्याच्या उपलब्धतेचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. ३. शेततळ्यांचा आकार - शेतातळ्यांचा अवाढव्य आकार आणि त्यांची खोली यांवर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. मंजूर झालेल्या शेतातळ्याच्या आकारमानात शेतकरी स्वखर्चाने वाढ करतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यात पाण्याचा साठा करतात. हे टाळण्यासाठी फक्त मंजूर झालेल्या आकारमानानुसारच बांधल्या गेलेल्या शेततळ्यांना अनुदान दिले जावे. त्याचबरोबर एक गुंठा ते दोन गुंठा आकाराची छोटी शेततळी घेण्यासाठी शेतक-यांना अधिक प्रोत्साहित केले जावे. शेततळ्याच्या आकाराबरोबरच, दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो शेततळ्यासाठीच्या जागा निवडीचा. शेततळे थोड्याशा उताराच्या जमिनीवर घ्यावे, ज्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी त्यात सहज साठवता येईल. अशा उताराच्या जमिनीवरील शेतातळ्यांमध्ये पावसाचे पाणी येण्यासाठी 'इनलेट’ व अतिरित पाणी वाहून जाण्यासाठी 'आउटलेट सहज व सोप्या पद्धतीने करता येते, तसेच पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा गाळ, खडे, गोटे व माती इत्यादी शेततळ्यात जाऊ नये म्हणून जेथे इनलेट आहे, त्याच्याच शेजारी एक छोटा खडुा खणून त्यात गाळ व माती यात साठवता येते, जेणेकरून स्वच्छ पाणी शेतातळ्यात जाईल. महत्वाचे म्हणजे मोठ्या आकाराचे एकच शेततळे तयार करण्यापेक्षा साखळी पद्धतीने छोटीछोटी शेततळी तयार करणे अधिक संयुक्तिक ठरते, कारण यामुळे वाहून जाणारे जास्तीत जास्त पाणी साठवता येते. या पद्धतीत पहिल्या शेतळ्याचे अतिरित पाणी वाहून जाण्यासाठी केलेले 'आउटलेट हे त्याखालच्या शेततळ्याचे 'इनलेट' म्हणून काम करते. या साखळी पद्धतीसाठी शेतक-याच्या मालकीचे एकूण क्षेत्र आणि शेजारील शेतक-यांशी सुसंवाद या दोन महत्वाच्या बाबी आहेत. ४. शेततळ्यांसाठी अनुदान व प्रोत्साहन - सध्या साधारणपणे फळबाग आणि इतर बागायती पिके घेणारे शेतकरी हे शेततळ्यांसाठीच्या अनुदानाचे मुख्य लाभार्थी आहेत, परंतु छोटे, मध्यम कोरडवाहू शेतकरी हे शेततळ्यांसाठीच्या अनुदान व वापरात न आलेली शेततळी हमखास नजरेस येतात. ढोबळमानाने असे दिसते की, ही शेततळी साधारणत: छोट्या व मध्यम कोरडवाहू शेतक-यांची आहेत, ज्यांना प्लास्टिक पेपरचा खर्च उचलण्यास अडचणी येतात, अशा शेतक-यांना जास्तीचे अनुदान देणे गरजेचे आहे, जेणेकरून ते अशी शेततळी वापरात आणू शकतील. ५. शेतातळ्यांच्या आच्छादनासाठी प्लास्टिक पेपरला पर्याय - सध्या शेतातळ्यांच्या आच्छादनासाठी वापरला जाणारा प्लास्टिक पेपर खूप महाग आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही घातक आहे. शेततळ्यातील पाणी थांबविण्यासाठी कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक उपायांवर काम करण्याची गरज आहे, 'Watershed Organization Trust' या पुणेस्थित संस्थेने दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यातील एका शेततळ्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर ८० टके माती आणि २० टके सिमेंट या प्रमाणातील मिश्रणाचा लेप (कोटिंग) देण्याचा प्रयत्न करून पाहिला, यासाठी प्लास्टिक पेपरच्या तुलनेत निम्मा खर्च आला आणि दोन वर्षांनंतरही हे कोटिंग चांगल्या स्थितीत आहे, अशा प्रकारच्या प्रयोगांना अधिक बळ आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ६. पिण्याच्या पाण्यासाठी सामूहिक शेततळे - शेततळी ही पिण्यासाठी किंवा अगदीच घरगुती वापरासाठी खात्रीशीरपणे गावातच पाणी उपलब्ध करण्यासाठी मध्यम आकाराचे शेततळे हे महत्त्वाचे माध्यम ठरू शकते. जर बागायतदार शेतकरी त्याला वर्षभर पुरेल एवढे पाणी शेततळ्यात खात्रीशीरपणे साठवू शकतात, तर गावपातळीवर मध्यम आकाराचे सामुदायिक शेततळे बांधणेसुद्धा शक्य आहे, जेणेकरून टंचाईच्या दोन-तीन महिन्यांच्या काळात लोकांना गावातच पाणी उपलब्ध होईल आणि यामुळे गावक-यांना टॅकरवर अवलंबून राहण्याची गरजही भासणार नाही व टॅकरवरचा सरकारी खर्चही वाचू शकतो. ७. बाष्पीभवनाचे प्रमाण - भूजल उपसून किंवा कालव्यातून खेचून शेततळ्यात साठवलेल्या पाण्याचे कमीत कमी बाष्पीभवन व्हावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतातळ्यांमध्ये साठवलेल्या एकूण पाणीसाठ्यापैकी जवळपास ४० टके पाण्याचे बाष्पीभवन होत आहे, ही मोठी चिंतेची बाब आहे. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी करण्यासाठी शेततळ्यांची लांबी व रुंदी कमी करणे वा मर्यादित ठेवणे, शेततळ्याची खोली वाढविणे, शेततळ्यातील पाण्यात इव्हेलॉकसारखे विनाअपायकारक रसायने घालणे हे तात्पुरते उपाय करता येऊ शकतात; परंतु यावरील महत्वाचा उपाय म्हणजे शेततळ्यांचे आकारमान आणि संख्या नियंत्रित ठेवणे व ते भरण्यासाठी भूजलाऐवजी पावसाचे पाणी साठवणे हाच आहे. महाराष्ट्रातील आणि मुख्यत: ग्रामीण भागात अलीकडील काळात निर्माण झालेले जलसंकट आणि पाणीटंचाई निश्चितच भयावह आहे. शेततळ्यांकडे या समस्येचा एक महत्वाचा पैलू आणि उपाय म्हणून बघितला गेला पाहिजे. म्हणून शेततळे बांधण्याच्या आणि वापराच्या चुकीच्या पद्धतींचा प्रसार- प्रचार होण्यापूर्वी वेळीच दक्ष राहून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि त्यामधील अधिक शक्यता आणि संधी शोधणे गरजेचे आहे. स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट