1) शेडमध्ये नैसर्गिक हवा खेळती असावी. जागा सखल भागात असावी, दलदलीची नसावी. जमीन मुरमाड असावी. जागा शहरात अथवा भरवस्तीत नसावी. पाण्याची व विजेची सोय असावी. त्याचप्रमाणे जागेची निवड करताना तिच्या आकाराचा विचार करावा.

2) शेडसाठी जमिनीच्या तुकड्याची कमीत कमी रुंदी 200 फूट असावी. शेडची दिशा ही नेहमी पूर्व - पश्चिम असावी. शेड उभारताना त्यांना लागणाऱ्या जागेचा विचार करून शेड उभारावी.

3) सुरवातीच्या काळामध्ये प्रत्येक ब्रॉयलर पक्ष्याला 0.5 चौ. फूट जागा मिळावी. नंतरच्या कालावधीमध्ये प्रति पक्षी एक चौ.फूट जागा मिळेल अशाप्रकारे शेड उभारावी. शेडची लांबी कितीही ठेवली तरी चालते; परंतु रुंदीवर मात्र मर्यादा येते. जास्तीत जास्त 30 फूट रुंदी असलेल्या घरात योग्य वायुविजन व प्रकाश राहतो.

4) शेडचा पाया दगड व चुन्यात बांधून पक्का केल्यास घराचा टिकाऊपणा वाढतो. शेडची जमीन आजूबाजूच्या जमीन सपाटीपेक्षा एक फूट उंचीवर असल्यास घराला ओल येत नाही, तसेच जमीन कॉंक्रिटची पक्की तयार करून घ्यावी.

5) जुने पक्षी गेल्यानंतर ती धुऊन स्वच्छ करण्यासाठी सोपे जाते. शेडला रुंदीच्या बाजूने छपरापर्यंत उंच भिंती बांधाव्या लागतात. त्या भिंतीत सहा फूट उंचीचे व तीन फूट रुंदीचे दरवाजे ठेवावेत. शेडच्या लांबीच्या बाजूने एक फूट उंचीच्या विटांच्या भिंती बांधाव्यात. त्यावर पक्षिगृहात हवा आणि प्रकाश येण्यासाठी किमान सहा ते आठ फूट उंचीची छपरापर्यंत जाळी मारावी.

6) शेडमध्ये लांबीच्या दोन्ही बाजूस अंतराअंतराने आठ फूट उंचीचे लोखंडी अगर कॉंक्रिटचे खांब उभे करावेत. त्यावर कैच्या चढवून दोन कैचीतील अंतर दहा फूट ठेवावे. कैच्यांवर दुपाखी छप्पर इतर लोखंडी अँगलच्या आधाराने बसवले जाते.

7) दोन्ही बाजूंस छपराचा पत्रा साधारणतः चार फूट बाहेर काढल्याने शेडमध्ये येणारा पाऊस जमिनीवर पडून लिटर ओले होत नाही. शेडची मधली उंची 12 ते 15 फूट व बाजूची उंची सात ते आठ फूट ठेवल्याने छपरास योग्य ढाळ मिळून पावसाचे पाणी झटकन ओघळून जाते. घराच्या छपराकरिता वापरण्यात येणारा पत्रा हा सिमेंटचा असावा.

संपर्क - डॉ. लोणकर - 9420243895
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा

- प्रदीप सागरे, वंजारी फैला, जि. यवतमाळ

माहिती संदर्भ : अॅग्रोवन