रोगमुक्त व सशक्त ब्रॉयलर कोंबड्यांची पिल्ले निवडावीत. त्यावरच व्यवसायाचे गणित अवलंबून आहे. हॅचरीमध्ये पिल्लांना लसीकरण झालेले असावे. शिफारशीनुसार लसीकरण करावे.

वादळी वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, तसेच स्वच्छ सूर्यप्रकाश लंबरुपी पडावा यासाठी ब्रॉयलर पक्ष्यांसाठी शेडची रचना करताना उत्तर-दक्षिण दिशेस करावी. पोल्ट्री फार्मच्या जमिनीची पातळी आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंच असावी.

१) शेडसाठी लागणाऱ्या विजेची उपलब्धता, पाणी व कोंबड्यांची बाजारपेठ जवळच्या अंतरावर असावी.
२) शेडमधील जमिनीवर लाकडी भुसा, भाताचे तूस पसरावे. याचा थर कमीत कमी तीन इंचांचा असावा. यामुळे कोंबड्यांच्या शरीराचे तापमान योग्य त्या मर्यादेत राहते.
३) पाणी खाद्यपचनास मदत करते. शरीराचे तापमान नियंत्रणाचे काम करते. उन्हाळ्यात साधारण पाण्याची जास्त आवश्यकता असते. पाण्यामधून आपण गरजेनुसार कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे देऊ शकतो.
४) रोगमुक्त व सशक्त ब्रॉयलर कोंबड्यांची पिल्ले निवडावीत. त्यावरच व्यवसायाचे गणित अवलंबून आहे.
५) हॅचरीमध्ये पिल्लांना लसीकरण झालेले असावे.
६) खाद्य अल्फाटॉक्झिनमुक्त असणे गरजेचे आहे.
७) लाकडाचा भुसा तीन आठवड्यांनंतर बदलावा. रोजच्या रोज सकाळी किंवा संध्याकाळी थरांची अदलाबदल करावी.
८) लसीकरण करताना लसीचा थेंब डोळ्यात किंवा इंजेक्शनाच्या मदतीने पायाच्या मांडीतील स्नायूमध्ये देणे गरजेचे असते.
९) कोंबड्या सात आठवड्यांच्या झाल्यावर १.५ ते २ किलोच्या वजनाच्या आसपास विक्रीसाठी तयार होतात.
१०) कोंबड्यांची हाताळणी पोल्ट्री शेडपासून विक्रीच्या जागेपर्यंत योग्य पद्धतीने करावी. कारण या कालावधीमध्ये त्यांच्या आरोग्यावर व वजनावर परिणाम होतो.

विजेचे व्यवस्थापन -

पोल्ट्री शेडसाठी विजेचा विचार करता, साधारण पहिल्या आठवड्यापासून ते कोंबड्यांच्या विक्रीपर्यंत याचा उपयोग पुढीलप्रमाणे होतो.

ब्रॉयलरचे वय ---- विजेचा वापर ---- जागा
१) ० ते ५ आठवडे ---- १५ वॅट ---- २०० स्क्वे.फू.
२) ५ ते ८ आठवडे ---- ६० वॅट ---- २०० स्क्वे.फू.

कोंबडी पिल्लांसाठी आपणाला ब्रुडरची आवश्यकता असते. त्याची किंमत ६०० ते १००० रुपयांपर्यंत आहे. ब्रुडर आपण उपलब्ध साहित्याचा वापर करून तयार करू शकतो. एक मोठी टोपली घ्यावी, त्याला होल्डरच्या आकाराची तीन छिद्रे पाडावीत. त्यामध्ये तीन होल्डर व २०० व्होल्टचा बल्ब लावावा. यानंतर आतील बाजूस चकचकीत ॲल्युमिनियम फॉईल लावावी. त्याचा वापर रिफ्लेक्टरच्या स्वरूपात होतो.

खाद्य व्यवस्थापन -

कुक्कुटपालन व्यवसायातील फायदा आणि तोटा हा खाद्य व्यवस्थापनावर आवलंबून असतो; ७० टक्के खर्च हा खाद्यावर होतो. त्यामुळे खाद्य व्यवस्थापन फायद्याचे ठरते.

ब्रॉयलरला खाद्य देण्याची पद्धत -
खाद्याचा प्रकार ---- वय (आठवड्यामध्ये) ---- प्रथिनांचा समाविष्ट भाग
(a) ब्रॉयलर स्टार्टर ---- ०-४ आठवडे ---- २९ ते २२ टक्के
(b) ब्रॉयलर फिनिशर ---- ४-८ आठवडे---- १९ ते २० टक्के

लेखक -
नवाज शिकलगार - ८८०५२१७१४३
(लेखक पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी, जि. पुणे येथे सहायक प्राध्यापक आहेत)

स्त्रोत: अग्रोवन