सध्याच्या काळात गहू, ज्वारी, करडई पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी द्यावे. थंडीची लाट असल्याने फळबागांच्या मध्ये धूर करावा. त्यामुळे काही प्रमाणात तापमान वाढण्यास मदत होते.

गहू

1) वेळेवर पेरलेल्या गव्हास 18 ते 21 दिवसांनी हेक्टरी 60 किलो नत्र व उशिरा पेरलेल्या गव्हास 50 किलो नत्र युरियाद्वारे द्यावे.
2) पिकातील तणाचे नियंत्रण करावे.
3) पाण्याच्या पाळ्या खालीलप्रमाणे पिकाच्या आवस्थेप्रमाणे द्याव्या.
अ) मुकुट मुळे फुटणे (पेरणीनंतर 18 ते 21 दिवसांनी)
ब) फुटवे फुटण्याची शेवटची अवस्था (पेरणीनंतर 50 ते 55 दिवस)
3) कांड्या धरतेवेळी ( पेरणीनंतर 50 ते 55 दिवस)

रब्बी ज्वारी

1) उशिरा पेरलेल्या ज्वारीच्या पिकात निंदणी व कोळपणी करून पिकातील तणाचे नियंत्रण करावे.
2) बागायती जमिनीतील ओल कमी झाली असल्यास व पीक फुलोरा व पोटरीच्या अवस्थेत असल्यास पिकास पाणी द्यावे.

करडई

1) सध्याच्या काळात तण नियंत्रणासाठी निंदणी व कोळपणी करावी.
2) जमिनीतील ओलावा कमी झाला असल्यास व पाणी देण्याची सोय असल्यास आणि एक फुलावर पीक असताना हलके पाणी द्यावे. शक्यतो एक सरी आड पाणी द्यावे.

हरभरा

1) हरभरा पिकाची निंदणी व कोळपणी करून पिकातील तणाचे नियंत्रण करावे.
2) बागायती हरभऱ्याच्या जमिनीतील ओल कमी झाली असल्यास व पीक फुलोऱ्या असल्यास व घाटे भरते वेळी पिकास हलके पाणी द्यावे. पिकांत जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

रब्बी सूर्यफूल

1. सूर्यफुलामध्ये निंदणी व कोळपणी करावी.
2. सूर्यफूल पेरणीनंतर एक महिन्यांनी प्रतिहेक्टरी 30 किलो नत्र युरियाद्वारे द्यावे.
3. पिकास बोंड लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये संरक्षित पाणी द्यावे.

केळी

1) केळीच्या बागेस पाण्याच्या पाळ्या नियमित द्याव्या. शक्यतो ठिबक सिंचनाचा वापर करावा.
2) बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास बागेभोवती शेकोट्या पेटवून धूर करावा. बागेत रात्रीच्या वेळेस विहिरीचे पाणी द्यावे.
4) पक्व झालेले घड काढून घ्यावे.
5) ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेल्या केळीच्या प्रत्येक झाडास 50 ग्रॅम नत्र व 40 ग्रॅम स्फुरद द्यावे.
6) झाडाच्या खोडाभोवती आलेली पिले नियमित कापून काढावी.

आंबा

1) आंब्याची नवीन लागवड केलेल्या कलमांना काठीचा आधार द्यावा.
2) लागवड केलेल्या कलमांना सावली करावी.
3) नवीन लागवड केलेल्या कलमांचे ओळे तयार करून त्यात शिफारशीत कीडनाशकाची भुकटी धुरळावी. त्यानंतर काडीकचरा किंवा वाळलेले गवत यांचे आच्छादन टाकावे.
4) पाण्याच्या पाळ्या नियमित द्याव्या. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.

संत्रा, मोसंबी

1) मृगबहार धरलेल्या बागेस जमिनीच्या मगदुरानुसार 12 ते 15 दिवसांनी दुहेरी बांगडी पद्धतीने किंवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
2) आंबे बहर धरण्यासाठी जमिनीची चांगली मशागत करून द्यावी. दुपारी पडलेल्या झाडाच्या सावलीच्या बाहेर कुदळीने गोल खोदून घ्यावे. त्यामध्ये प्रत्येक झाडास चांगले कुजलेले शेणखत 50 किलो व 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश खत मिसळून परत मातीने झाकावे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बागेस हलके पाणी द्यावे.
3) झाडाच्या खोडा जवळ नांगर चालवू नये. ज्यामुळे झाडाची मुळे तुटणार नाही. तसेच झाडाचे खोड, फांद्यांना इजा होणार नाही.
संपर्क ः 02452-229000
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

स्त्रोत: अग्रोवन