खुंटावरील द्राक्षबाग लागवडीचे तंत्र हे स्वमुळावरील द्राक्ष लागवडीच्या तंत्राच्या वेगळे आहे. खुंट लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्वतयारी कशी करावी व त्याचे महत्त्व कसे आहे, याबद्दलची माहिती आजच्या लेखात घेत आहोत.

ज्या जमिनीवर द्राक्ष लागवड करायची आहे, अशा जमिनीची पूर्वतयारी सुरवातीलाच करणे फार महत्त्वाचे असते. कारण एकदा लागवड केलेली द्राक्षबाग ही जवळपास 12 ते 14 वर्षे उत्पादन देत असते. इतर फळपिकांच्या तुलनेत द्राक्षपीक हे जरा वेगळे आहे. उदा. पाणी व्यवस्थापन या पिकात घडनिर्मितीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असल्यामुळे प्रत्येक वेलीच्या मुळाजवळ एकसारख्या दाबाचे पाणी मिळणे गरजेचे होते. हाच विचार डोळ्यांसमोर ठेवून जमिनीची पूर्वतयारी करण्यापूर्वी जमीन सपाट करून घेणे महत्त्वाचे असते. याचसोबत शेतामध्ये जर बहुवर्षीय गवत उदा. हराळी व लव्हाळा असल्यास त्याचासुद्धा नायनाट करावा. अन्नद्रव्यांचा विनाकारण ऱ्हास टाळण्याच्या दृष्टीने या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.

आखणी व चर खोदणे

द्राक्षवेल व्यवस्थापनासंदर्भात प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहणे गरजेचे असते. लागवडीपूर्वी जमीन सपाट केल्यानंतर नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात आखणी करण्याचे नियोजन अशा प्रकारे करावे, की लागवडीची दिशा व वेलीच्या ओलांड्यांची दिशा ही दक्षिणोत्तर राहील. यामुळे घडांना उन्हापासून संरक्षण मिळेल. याकरिता चारीची दिशा ही Y पद्धतीमध्ये उत्तर-दक्षिण असल्यास ओलांड्यांची दिशासुद्धा तीच राहील. जमिनीच्या प्रकारानुसार द्राक्षवेलीच्या दोन ओळींतील अंतर ठरवावे.

खुंटावरील द्राक्ष लागवड भारी जमिनीत केल्यास वेलीच्या वाढीचा जोम जास्त असतो. जर जमिनीचे क्षेत्रफळ वेलीच्या वाढीकरिता अपुरे पडल्यास कॅनॉपीमध्ये गर्दी वाढेल. या गर्दीमुळे घडनिर्मितीवर विपरीत परिणाम तर होईलच; पण त्याहीपेक्षा रोगांचा प्रादुर्भावसुद्धा जास्त वाढेल. म्हणूनच भारी जमिनीत द्राक्ष लागवड करताना दोन ओळींतील अंतर जवळपास दहा फूट, तर दोन वेलींतील अंतर सहा फूट ठेवल्यास पुढील काळात अडचणी येत नाहीत.

याच तुलनेत हलक्या जमिनीत वेलीच्या वाढीचा जोम कमी असतो, त्यामुळे जमिनीच्या क्षेत्रफळाशी वरच्या कॅनॉपीचा समतोल मिळत नसल्यास एक तर घडांचे उन्हापासून संरक्षण होणार नाही व त्याचसोबत प्रति युनिट क्षेत्रफळातून अपेक्षित असे उत्पादन मिळणार नाही. या गोष्टींचा विचार करता हलक्या जमिनीत दोन ओळींतील अंतर हे साधारणतः नऊ फूट, तर दोन वेलींतील अंतर हे जवळपास पाच फूट असावे.

जमीन कोणत्याही प्रकारची असो, एकदा खुंटरोपांची लागवड झाली, की त्यामध्ये मुळांचा विस्तार चांगला व्हावा या दृष्टीने चारी घेऊन आवश्यक ती जमिनीची मशागत सुरवातीसच करावी. याकरिता बागेत आखणी करून घ्यावी. आखणी केल्याप्रमाणे अडीच फूट रुंद व अडीच फूट खोल अशी जेसीबीच्या साह्याने चारी घ्यावी. चारीची लांबी मात्र शेतामध्ये उपलब्ध असलेली जागा तसेच मशागतीची प्रक्रिया यांचा समतोल ठेवूनच ठरवावी. शक्यतोवर ही लांबी 200 ते 300 फुटांपेक्षा जास्त नसावी, कारण लागवडीची लांबी जास्त असल्यास वळण पद्धतीमध्ये तारांना ताण देणे शक्य होत नाही, ओलांडेसुद्धा घडाच्या अधिक भारामुळे खाली येतात.

चर काढताना जमिनीच्या वरच्या थरातील एक फूट माती ही एका बाजूस टाकून खालच्या थरातील एक फूट माती चारीच्या दुसऱ्या कडेला टाकावी. यामुळे कधीही वापरात न आलेली माती ही वर येईल. प्रत्येक वर्षी वापरण्यात आलेली वरच्या थरातील माती खाली जाईल. तेव्हा चारी घेते वेळी या गोष्टींकडे मुख्यतः लक्ष द्यावे.

चारी भरणे

उघडलेली चारी ही 10 ते 15 दिवस तशीच राहू दिल्यामुळे हानिकारक असलेले कीटक, जिवाणू इत्यादी कमी होतील. यानंतर चारी भरताना वरच्या एक फूट थरातील एका बाजूला काढून ठेवलेली माती ही तळामध्ये टाकावी. तळातील माती वरच्या थरावर टाकावी. ही माती जवळपास चारीच्या तळापासून दीड फुटापर्यंत भरावी. यावर हिरवळीचे खत पसरावे. चरामध्ये दर तीन फूट अंतराकरिता एक घमेले (अंदाजे 10 किलो) कुजलेले शेणखत, एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य असे मिश्रण टाकावे. त्यानंतर चर एकसारखे करून पाणी द्यावे. यामुळे मातीतील पोकळी बंद होऊन माती खाली बसेल. या प्रक्रियेमुळे जमीन भुसभुशीत होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. अशा प्रकारच्या जमिनीतून अन्नद्रव्य शोषण करणाऱ्या मुळांची संख्या व लांबी वाढून खोलपर्यंत पसरण्यास मदत होईल.

चारीमध्ये पाणी दिल्यानंतर माती खाली बसून पुन्हा त्या चारीमध्ये खड्डा तयार झाल्याचे दिसेल. बाहेर उरलेली माती पुन्हा त्या चारीमध्ये टाकून नांगराच्या साह्याने हलकी नाळ किंवा पाट तयार करून पाणी द्यावे. यानंतर जमीन वाफसा परिस्थितीत येईल व खुंटरोपांची लागवड करता येईल. ज्या ठिकाणी कडक किंवा मुरमाड व खडकाळ जमीन आहे अशा ठिकाणी मशिनच्या साह्याने रिपिंग करून घ्यावे. यामुळे शेतातून बाहेर निघून जाणारे पाणी शेतामध्येच मुरते, त्याचा परिणाम म्हणजे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. अशा प्रकारच्या जमिनीत पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.

डॉ. आर. जी. सोमकुंवर

स्त्रोत: अग्रोवन