हळदीची लागवड १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यात केल्यास उत्पादन चांगले मिळते. चांगले उत्पादन मिळण्यासाठी लागवडीपूर्वी शास्त्रीय दृष्टिकोनातून जमिनीची पूर्वमशागत करणे आवश्यक आहे. जमिनीची पूर्वमशागत जमीन चांगली निचरा होणारी असावी. जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून घ्यावे. हळद, आले यांसारख्या कंदवर्गीय पिकाच्या बेवडावरती पुन्हा हळदीची लागवड करू नये. भारी, काळ्या चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक घेण्याचे टाळावे. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये या पिकाची लागवड केल्यास पिकावर कायम पिवळसर छटा राहते, उत्पादनात घट येते. हळदीचे कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीमध्ये हवा खेळती राहते अत्यंत महत्त्वाचे आहे. या पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची उभी- आडवी नांगरट करून घ्यावी. दोन नांगरटीनंतर ढेकळे फोडून घ्यावीत. जमिनीमधील लव्हाळा, हराळी यांसारख्या बहुवर्षीय तणांचे अवशेष मुळांसह काढून जाळून नष्ट करावेत. तसेच अगोदरच्या पिकाच्या काड्या वेचून घ्याव्यात. उपलब्धतेनुसार चांगले कुजलेले शेणखत एकरी १० ते १२ टन शेतात पसरवून टाकावे. शेणखताची मात्रा कमी प्रमाणात उपलब्ध झाल्यास इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा. यामध्ये गांडूळ खत, कंपोस्ट खत, मासळीचे खत, घडांचा चुरा, प्रेस मड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडींच्या मिश्रणाचा समावेश करावा. ओल्या मळीचा वापर हळदीसाठी टाळावा. एकरी २५० किलो सुपर फॉस्फेट आणि ८० किलो म्युरेट अॉफ पोटॅश या खतांचा वापर जमीन तयार करतेवेळी करावा. बेण्याची निवड बेण्याची सुप्तावस्था संपलेली असावी. बेण्यावरील एक ते दोन डोळे चांगले फुगलेले असावेत. मातृकंद बेणे ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, बगल गड्डे किंवा अंगठा गड्डे ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे, तर हळकुंडे ३० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाची असावीत. बेणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे. बेण्याची उगवण एकसारखी होण्यासाठी लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर बेण्यावरती पाणी मारावे. बेण्यास कंदकुजीचा प्रादुर्भाव झाला असल्यास बेणे मऊ पडते. असे मऊ बेणे कापले असता आतमधील भाग कापसासारखा दिसतो. असे बेणे उगवत नाही बीजप्रक्रियेच्या द्रावणात तरंगते. मातृकंद बेणे त्रिकोणाकृती असावे. बेण्यामध्ये इतर जातींची भेसळ नसावी. बेण्यावरील मुळ्या, गतवर्षीच्या पानाचे अवशेष साफ करून बियाणे स्वच्छ करावे. डॉ. जितेंद्र कदम - ९४०४३६६१४१ (लेखक हळद संशोधन योजना कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.) ------------------------------------------------------------------------------------------------ स्त्रोत -अग्रोवन