प्रस्तावना

राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. नाचणीत असणा-या कॅल्शियमच्या विपुल साठयामुळे खेळाडू, कष्टाचे काम करणारे, वाढती मुलं यांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर, आहारतज्ज्ञ देतात

हे पीक राज्यातील दुर्गम, आदिवासी भागातील हलक्या व वरकस जमिनीत घेतात. नागली हे दुर्गम भागातील लोकांचे प्रमुख अन्नधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे त्याचप्रमाणे जिरायत आणि बागायत पीक आहे. कर्नाटक राज्यात हे महत्त्वाचे पीक असून जवळजवळ भाताइतके क्षेत्र तेथे या पिकाखाली आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड होते. ते पौष्टिक आणि शक्तिदायक समजले जाते. यात ६ ते ११% प्रथिने, कॅल्शिअम, लोह, स्फुरद पुरेशा प्रमाणात असतात. मधुमेह, अशक्त व आजारी माणसांना नाचणीचा आहार उपयुक्त व गुणकारी मानला जातो. यामुळे रक्तातील कोलेस्टेटरॉल कमी होते तसेच मधूमेहाचे प्रमाण कमी होते.

हवामान

नाचणीस उष्ण हवामान मानवते

जमीन

तांबडवट, फिक्कट व राखी रंगाच्या जमिनीत नाचणी चांगली येते.

हंगाम

खरीप हंगामात हे पिक घेतले जाते.

पेरणी

बी मुठीने जमिनीत फेकून, पेरून किंवा रोपे लावून लागण करतात. हेक्टरी २५-५० किग्रॅ. बी. लागते. महाराष्ट्रात रोपे तयार करून लावतात. लागणीत २५ सेंमी. अंतरावरील नांगराच्या सऱ्यांत २० सेंमी. अंतरावर रोपे टाकीत जातात. प्रतिकूल परिस्थितीतही रोप ताबडतोब मूळ धरू शकते.

खते

या पिकाला खत देण्याची प्रथा नाही; पण हेक्टरी ८००-१,००० किग्रॅ. मासळीचे खत किंवा ५० किग्रॅ. नायट्रोजन अमोनियम सल्फेटामधून आणि १० किग्रॅ. फास्फोरिक अम्ल दिल्यास उत्पन्न वाढते.

हे पीक पावसाच्या पाण्यावर घेतात.

जाती

गोदावरी, बी – ११, पीईएस-११० इंडाफ ८, दापोली – १, व्ही एल – १४९, जीपीयू – २६, २८,पी आर–२०२, ), इ-३१ (निमगरवा) आणि ए-१६ (गरवा).
नाचणीच्या तांबूस व पांढऱ्या प्रकारांचे दाणे जास्त पौष्टिक असतात.

उपयोग

नाचणीपासून भाकरी, माल्ट,नुडल्स, पापड, आंबील, इडली बनवितात.

रोग व त्यावरील उपाय

करपा, काणी, पानावरील ठिपके व केवडा हे रोग नाचणीवर पडतात.

करपा : हा रोग पायरीक्यूलेरिया एल्युसिनी या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) होतो. त्यात राखाडी रंगाचे डाग कणसाच्या खालील भागावर आढळतात. त्यामुळे कणसात दाणे चांगले भरत नाहीत. लहान रोपे रोगाला लवकर बळी पडतात. ५:५:५० बोर्डो मिश्रण पिकावर फवारतात.

काणी : हा रोग मेलॅनोप्सिकियम एल्युसिनीस या कवकामुळे होतो. त्यात कणसातील काही दाण्यांचे काणीयुक्त बीजाणुफळांत रूपांतर होते. रोग तुरळक आढळतो. उपाय म्हणून रोगट कणसे काढून नष्ट करतात.

पानावरील ठिपके : हा रोग हेल्मिथोस्पोरियम नोड्यूलोजम या कवकामुळे होतो. यामुळे पानावर तपकिरी ठिपके पडतात. याकरिता बी पेरण्यापूर्वी बियांवर अॅग्रोसानची क्रिया (१:४००) करून घेतात.

केवडा : हा रोग स्क्लेरोस्पोरा मॅक्रोस्पोरा या कवकामुळे उद्भवतो [→ ज्वारी; बाजरी].

कीड : नाचणीवरील महत्त्वाची कीड म्हणजे सुरवंट होय. याच्या पतंगांचा नाश करणे हाच उपाय आहे.

स्त्रोत :  मराठी विश्वकोश