जमीन - मका लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन चांगली.
पूर्व मशागत - उन्हाळ्यात जमिनीची खोल (15 ते 20 सें.मी.) नांगरट करून कुळवाच्या 2- 3 पाळ्या द्याव्यात. त्या वेळी 25 गाड्या शेणखत प्रति हेक्टरी मिसळावे.

सुधारित जाती

1. लवकर पक्व होणाऱ्या जाती (80 ते 90 दिवस) -
कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रासाठी.
संमिश्र जाती - अरुण, किरण, पारस, सूर्या, पुसा लवकर, महिकांचन, मांजरी.
संकरित जाती - एफएच 3211, एफक्युएच 4567.
2. मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जाती (90-100 दिवस) - कोरडवाहू, बागायती आणि थोड्याशा उशिरा पेरणीसाठी.
संमिश्र जाती - नवज्योत, मांजरी.
संकरित जाती- डीएमएच 107, केएच 9451, एमएचएच 69.
3. उशिरा पक्व होणाऱ्या जाती (100-110 दिवस)- वेळेवर पेरणी, निश्चित पाऊस किंवा बागायतीची सोय असलेल्या ठिकाणी.
संमिश्र जाती - प्रभातस धवल, आफ्रिकन टॉल, शक्ती 1.
संकरित जाती - डेक्कन 103, एनईसीएच 117, एचक्यूपीएम 1.
पेरणीची वेळ - 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान.

पेरणीची पद्धत

उशिरा व मध्यम कालावधीच्या जातीसाठी - ओळीतील अंतर 60 ते 75 सें.मी. व दोन रोपात 20 ते 25 सें. मी.

लवकर तयार होणाऱ्या जातीसाठी - दोन ओळीस 60 सें. मी. व दोन रोपात 20 सें. मी.

सरी वरंब्यावर पेरणी करताना सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला पेरणी करावी.

बियाण्याचे प्रमाण - हेक्टरी 15-20 किलोग्रॅम बियाणे पुरेसे.

बीजप्रक्रिया - 2 ते 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलोग्रॅम बियाणे. त्यानंतर ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धक 15 ग्रॅम प्रति किलो बियाणे चोळावे.

रासायनिक खत

उशिरा तयार होणाऱ्या जातीसाठी - नत्र, स्फुरद व पालाश 120-60-60 किलो प्रति हेक्टर खतमात्रा द्यावी. त्यातील नत्र 40 किलो पेरतेवेळी, 20 दिवसांनी पुन्हा 40 किलो, 40 ते 45 दिवसांनी 40 किलो या प्रमाणे नत्र विभागून द्यावे.

आंतरमशागत - पेरणीनंतर 15 ते 35 दिवसांपर्यंत एक ते दोन खुरपण्या आणि कोळपण्याद्वारे तणांचा बंदोबस्त करावा.

किंवा तणनाशक वापर- पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी अट्रॉझीन (50 टक्के) हे तणनाशक 1 किलो किंवा पेंडिमिथॅलीन 1 ली प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावे.

पाणी व्यवस्थापन

पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी (पीक वाढीची अवस्था),

40- 60 दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना

75- 95 दिवसांनंतर पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाण्याची पाळी देणे आवश्यक आहे.

अनियमित पावसाच्या भागात पाण्याचा ताण असलेल्या काळात 0.2 टक्के थायोयुरियाची (नर व मादी) पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी फवारणी केल्यास उत्पादनात वाढ दिसून आलेली आहे.

संपर्क - 7588571580, 9421859788
डॉ. व्ही. डी. साळुंके, ए. जी. मुंढे, आर. के. सोनवणे, आर. एल. औंढेकर
(गहू व मका संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

स्त्रोत: अग्रोवन