उन्हाळी हंगामात कमी कालावधीत पालेभाज्यांपासून चांगला नफा मिळतो. बाजारपेठेच्या मागणीनुसार उपलब्ध क्षेत्रात टप्याटप्याने पालेभाज्यांची लागवड करावी.

पालेभाज्या

उपलब्ध क्षेत्र आणि सिंचनक्षमता लक्षात घेऊन पालेभाज्यांची लागवड करावी. इतर पिकांपेक्षा अत्यंत कमी दिवसांत पालेभाज्या तयार होतात. या भाज्यांना उन्हाळ्यात चांगली मागणी असते. सुधारित लागवड पद्धत आणि जातींची निवड करून अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्य आहे. सध्याच्या काळात चवळी, चाकवत आणि घोळ या भाजीपाल्यांची लागवड मे महिन्यापर्यंत टप्याटप्याने करावी.
१) लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी सपाट जमीन निवडावी. पाणी धरून ठेवणाऱ्या, जमिनीमध्ये पालेभाज्या उत्पन्न चांगले येत नाही.
२) जमिनीची योग्य मशागत करून पुररेसे शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीसाठी २ मीटर बाय १ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.
३) लागवडीपूर्वी प्रती किलो बियाण्यास थायरम २.५ ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळू शकतो.
४) पालेभाजी पिकांना माती परीक्षण शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी. चवळी पिकाला २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे. चाकवत पिकाला प्रति हेक्टरी ५० किलो नत्र द्यावे.
५) पालेभाज्यांची कापणी सकाळी किंवा सायंकाळी कमी उष्ण तापमानाच्या वेळेस करावी. काढणी झाल्याबरोबर पालेभाजी झाडाखाली सावलीत ठेवावी आणि वाहतूक थंड हवामानाच्या वेळेस करावी.
६) भाजीपाला जास्त काळ ताजा ठेवण्यासाठी काही शेतकरी भरपूर प्रमाणात पाण्याचा शिडकावा करतात. त्यामुळे भाजीपाला सडण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन कापणीनंतर जुड्या बांधून लगेच विक्री करावी.

जाती आणि लागवडीचे नियोजन

पालेभाजी ---- जाती ---- दोन ओळींतील अंतर (से.मी.) ---- बियाणे कि./हेक्टरी ---- उत्पन्न टन/हेक्टरी
१) चवळी---- कोईमतूर-१, कोईमतूर-२, छोटी चवळी, मोठी चवळी, दापोली-२, को ९, को २, को ३, केरळ-१ ----२०ते २५ ---- २ ते २.५ ---- १० ते २५
२) चाकवत ---- नं. ८, नं.-११ ---- २० ते ३० ---- ८ ते १० ---- ७ ते ८
३) घोळ ---- स्थानिक जाती ---- २० ते २५ ---- ३० ते २५ ----५ ते ८

- डॉ. विजय दाडे, डॉ. विजय काळे
(लेखक उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला येथे कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन-