संविधान-साक्षरता काळाची गरज आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण संघर्षमय आयुष्यात प्रज्ञावंत दलित-आदिवासी कैवारी, अर्थतज्ञ, जलतज्ञ अशा अनेक भूमिका यशस्वी पार विद्यार्थी ते कायदे पंडित, कामगार नेते, महिला मुक्तिदाते, शेतकऱ्यांचे पुढारी, पाडलेल्या आहेत. या सर्वांमध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार या भूमिकेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त भारतीयांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. एक मत-एक मूल्य यानुसार समता प्रस्थापित झाली. आज संपूर्ण भारतात संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. म्हणजेच संविधानाला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो की, या 75 वर्षात संविधान किती भारतीयांमध्ये रुजलेले आहे? तर आपणास संविधान विषयाची निरक्षरता लक्षात येईल. आज परिस्थिती अशी आहे की, बहुतांशी लोकांनी संविधानच पाहिलेले नाही, मग त्याच्या वाचनाविषयी आणि समजून घेण्याविषयी विचार न केलेलाच बरा. आज आपण ज्या देशात जन्मलो, वाढलो आणि जगत आहोत त्या देशाचा कारभार ज्या संविधानावर चालतो त्या पुस्तकाविषयी भारतीयांमध्ये प्रचंड निरसता, अज्ञानता आहे. आज आपण पाहतो आपल्या हक्काचा, कर्तव्यांचा हा दस्तावेज, आपण अभ्यासला नाही तर देश कदापि महासत्ता होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संविधान कितीही उत्कृष्ट असले, परंतु त्याचे पालन करणारे लोक जर अज्ञानी असतील तर ते संविधान निकृष्ट ठरेल. यासाठी आपणास काय करता येईल? ज्याप्रमाणे आपण अक्षर-लेखन साक्षर होतो, आर्थिक साक्षर, संगणक साक्षर होतो, तसेच संविधान साक्षरता काळाची गरज आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना संविधान शिकवले पाहिजे. संविधानाने आपणास काय दिले? आणि आपण कोणते कर्तव्य करायला हवे? याविषयी संस्कार रुजणे आवश्यक आहे. यासाठी शाळांमधून विविध गीते, भारुडे, अभंग, बडबड गीत, पथनाट्य, एकांकिका, स्पर्धा, खेळ आणि कृतींमधून संविधानांच्या मूल्यांना रुजवण्यासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. संविधान विषय केवळ कायदा, न्यायालय, राजकारण, सरकारी कार्यालय या पुरताच मर्यादित न राहता तो जगण्याचा भाग व्हायला हवा. आज आपणास संविधानाचा जागर करण्यासाठी संविधानाचा संवाद करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिकाला समजेल अशी मांडणी करणे गरजेचे आहे. संविधानाची जी प्रस्ताविका आहे त्यातील प्रत्येक मूल्यांचा अर्थ विद्यार्थ्यांना कृतीतून समजून सांगण्याची गरज आहे. ज्यामुळे संविधान जगण्याचा भाग होईल. संविधानाची प्रस्ताविका हा भारतीय संविधानाचा सार आहे, आरसा आहे. भारताच्या प्रस्ताविकेमध्ये आपण जर बघितले तर फक्त एका ओळीमध्ये हा भारत कसा असेल, भारतीयांना या भारतामध्ये काय मिळेल आणि या भारताची वाटचाल कशी असेल, याचे संपूर्ण चित्रण या प्रस्ताविकेमध्ये दिलेले आहे. आम्ही भारताचे लोक आणि संविधानदेखील स्वतः प्रत अर्पण करत आहोत. यामध्येच या भारतीय संविधानाचे मोठेपण आणि महानता आपणास दिसते. संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये हा देश सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असेल, तसेच या देशातील लोकांना सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य तसेच संधीची व दर्जाची समानता तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचा यामध्ये समावेश असे निश्चित करून अधिनियमित केलेले आहे. असे असताना मात्र भारतीय याबाबत अतिशय अनभिज्ञ आहेत. आपणास संविधानाचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे, नसता आपल्या अस्तित्वाला काहीही अर्थ राहणार नाही. २४ ऑक्टोबर २०२४ पासून 'घर घर संविधान' हा शासन निर्णय काढून संविधान प्रसार व प्रचारासाठी योग्य पाऊल उचलले आहे, त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करतो. शाळेमधून, महाविद्यालयांमधून संविधान साक्षर झालेली ही पिढी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या संविधानांच्या स्तंभांना जाणून घेऊनच लोकशाही मजबूत करेल. संविधानाची होणारी साक्षरता हीच खया अर्थाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरी मानवंदना व अभिवादन ठरेल. श्री. प्रदीप अरुणा रमेशराव घाटेशाही. जि.प. शिक्षक जालना