प्रवासी भारतीय दिवस दोन वर्षातून एकदा 9 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो अनिवासी भारतीय समुदायाच्या त्यांच्या मातृभूमीप्रति योगदानाचा सन्मान करतो. 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान दिवंगत परदेशातील भारतीय समुदायाला ओळख मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सहभागी करून घेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून प्रवासी भारतीय दिवस संमेलनाची प्रथम सुरुवात झाली होती. प्रवासी भारतीय दिवस हा परराष्ट्र मंत्रालयाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे. भारतातील विविध प्रदेशातील विविधता आणि प्रगतीचे दर्शन घडवण्यासाठी विविध शहरांमध्ये याचे आयोजन केले जाते. 2015 पासून द्विवार्षिक कार्यक्रमात याचे रूपांतर झाले आणि या मधल्या काळात संकल्पना -आधारित परिषदांचे आयोजन करण्यात आले. या स्वरूपात स्वारस्याच्या विशिष्ट क्षेत्रांवर अधिक केंद्रित चर्चा करता येते आणि जागतिक भारतीय समुदायाला यात सहभागी होण्याची संधी प्रदान करते. इतिहास आणि महत्त्व महात्मा गांधी हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी 9 जानेवारी 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले, त्या दिवसाची आठवण म्हणून या द्विवार्षिक समारंभाचे आयोजन केले. उद्दिष्टे आणि परिणाम प्रवासी भारतीय दिवसाच्या आयोजनाची प्राथमिक उद्दिष्टे: भारताच्या विकासातील परदेशस्थ भारतीय समुदायाच्या योगदानाचा गौरव इतर देशांना भारताबद्दल अधिक जाणून घेता यावे जगभरातील स्थानिक भारतीय समुदायांच्या कल्याणाच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या भारताच्या कार्याला पाठिंबा परदेशस्थ भारतीयांना त्यांच्या वाडवडीलांच्या भूमीत सरकार आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. परदेशात मोठ्या संख्येने असलेल्या भारतीय समुदायांसोबतचे भारताचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी ही अधिवेशने महत्त्वाचे साधन ठरली आहेत, त्यामुळे विविध क्षेत्रांतील अनुभव, ज्ञान आणि कौशल्ये यांची देवाणघेवाण करणे शक्य झाले आहे. प्रवासी भारतीय दिवस - 2025 18 वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन 8-10 जानेवारी 2025 रोजी ओडिशातील भुवनेश्वर येथे होणार आहे. या वर्षाची संकल्पना “विकसित भारतासाठी समुदायाचे योगदान” अशी आहे. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार (PBSA) सादरीकरण हे PBD चे वैशिष्ट्य आहे. हा प्रतिष्ठित सन्मान अनिवासी भारतीय, भारतीय वंशाच्या व्यक्ती किंवा त्यांच्याद्वारे स्थापन केलेल्या आणि चालवलेल्या संस्थांना दिला जातो. PBSA विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी ओळखते आणि NRIs आणि PIO च्या शिक्षण, विज्ञान आणि नवोपक्रम, व्यापार आणि उद्योग, कला आणि संस्कृती, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा आणि परोपकार यासारख्या क्षेत्रातील कामगिरी आणि वचनबद्धतेचा उत्सव साजरा करते. प्रवासी भारतीय दिवस हा जगभरातील भारतीय समुदायाला मोलाचा ठेवा म्हणून भारताने त्यांना दिलेले मानाचे स्थान दर्शवितो. हा उपक्रम केवळ सामायिक वारशाचा गौरवच नव्हे तर विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या वाटचालीत परदेशातील भारतीयांच्या क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठीचे धोरणात्मक व्यासपीठ देखील ठरत आहे. जागतिक स्तरावर भारत आपले स्थान बळकट करत असताना, जगभरातील आपल्या समुदायासोबत दृढ संबंध जोपासण्यासाठी आणि विविध क्षेत्रातील त्यांच्या प्रावीण्याचा राष्ट्रीय विकासात उपयोग करून घेण्यासाठी प्रवासी भारतीय दिवस नक्कीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. स्रोत : प्रवासी भारतीय दिवस