ग्रीक लोक रानटी अवस्थेतून बाहेर पडण्यापूर्वी मिनास नावाच्या राजाने क्रीट येथे स्थापन केलेली एक संस्कृती होती. इ.स.पू. १४०० सुमारास ही संस्कृती संपुष्टात आली; परंतु नंतरच्या ग्रीक पुराणकथांवर तिचा प्रभाव टिकून राहिला. या ग्रीक कथांतील व्यक्तींचे तीन प्रमुख वर्ग पडतात : पहिला ऑलिंपस पर्वतावर राहणाऱ्या देवांचा, दुसरा सूर्य, चंद्र, समुद्र इत्यादींचा आणि तिसरा वीरपुरुषांचा होय. होमरच्या इलिअड आणि ओडिसी या महाकाव्यांत ग्रीक देवतांची बरीच माहिती आहे. इ.स.पू. आठव्या शतकातील हीसिअडच्या थिऑगनी (देवोत्पत्तिशास्त्र) या काव्यामध्ये मात्र ग्रीकांच्या सविस्तर पुराणकथा आढळतात. या काव्यात विश्वनिर्मिती, देवांचे जन्म इ. विषयांची चर्चा असून या काव्याला ग्रीसमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली होती. इ.स.पू. सहाव्या शतकापासून इसवी सनाच्या प्रारंभापर्यंतच्या काळात ऑर्फियस या तत्त्ववेत्त्याच्या प्रभावाने अनेक नवीन देवोत्पत्तिशाश्त्रे व पुराणकथा निर्माण झाल्या; परंतु त्यांना विशेष मान्यता मिळाली नाही. प्राचीन काळापासून ते आजतागायत ग्रीक पुराणकथांमधून अनेक साहित्यिक व इतर कलावंत यांना प्रेरणा मिळालेली आहे. हीसिअडने मांडलेल्या विश्वनिर्मितीच्या कल्पनेनुसार प्रारंभी ‘केऑस’ची अवस्था होती. त्यानंतर जीआ (पृथ्वी) निर्माण झाली. तिच्यापासूनच विश्वदेवता व मानव निर्माण झाले असल्यामुळे ती ग्रीसमधील महत्त्वाची देवता होती. जीआ व तिचा पुत्र यूरानस (आकाश) यांच्या संयोगातून सहा पुरुष व सहा स्त्रिया असे १२ टायटन्स निर्माण झाले. हाच विश्वातील पहिला वंश असून टायटन्स हे मानवांचे पूर्वज मानले गेले आहेत. त्यानंतर पृथ्वी व आकाश यांच्यापासून कपाळावर फक्त एकच डोळा असलेले सायक्लोप्स नावाचे वादळाचे तीन देव निर्माण झाले. त्यानंतर त्या दोघांपासून प्रत्येकी १०० बाहू आणि ५० मस्तके असलेली सेंटिमेन नावाचे तीन राक्षस जन्मले. टायटन्सपैकी क्रोनसने आपली बहीण रीया हिच्याशी विवाह केला. त्यांना हेस्टिआ, डीमीटर आणि हेरा या तीन मुली आणि हेडीझ, पोसायडन आणि झ्यूस हे तीन मुलगे झाले. पुढे झ्यूसने क्रोनसचा पराभव केल्यानंतर टायटन्स व झ्यूस वगैर देवांमध्ये युद्ध झाले. देवांनी सेंटिमेन व सायक्लोप्स यांची मदत घेऊन टायटन्सना पराभूत केले. हे युद्ध संपल्यानंतर झ्यूस आणि यूरानसच्या रक्तापासून बनलेले जायंट्स यांच्यात युद्ध झाले. जायंट्स हे फक्त मर्त्य व्यक्तीकडूनच मारले जातील, अशी भविष्यवाणी असल्यामुळे देवांनी हर्क्यूलीझ या मर्त्य वीराची मदत घेऊन त्यांचा नाश केला. पृथ्वीने शेवटी टायफोअस याला झ्यूसवर पाठविले. त्याने झ्यूसला कैदेत टाकले; परंतु हर्मीझने झ्यूसची सुटका केल्यावर त्याने वज्रप्रहार करून टायफोअसला पराभूत केले. अशा रीतीने झ्यूस हा सर्वश्रेष्ठ देव बनला. झ्यूस या शब्दाच्या मुळाशी ‘द्यौस्’ हा संस्कृत शब्द असून ‘प्रकाशमान आकाश’ हे त्याचे मूळचे स्वरूप होते. मीटिस (विद्वत्ता) ही त्याची प्रथम पत्नी होती. तिची मुले तुला पदच्युत करतील असे पृथ्वी आणि यूरानस यांनी सांगितल्यामुळे अथीनाच्या जन्माच्या वेळी त्याने गर्भवती पत्नीला गिळले. झ्यूसपासून नीमॉसिनीला म्यूझेस, डीमीटरला पर्सेफोनी आणि ओसिॲनिड यूरीनोमीला चॅरिटी या कन्या झाल्या. तुझ्यापासून थेटीसला होणारे मूल तुला पदच्युत करील, असे प्रॉमीथिअसने सांगितल्यामुळे त्याने तिचा मोह सोडला. त्याने आपली बहीण हेरा हिला फसवून तिच्याशी विवाह केला. हेरा हे नाव ‘स्वर्’ (स्वर्ग) या संस्कृत शब्दाशी संबद्ध असून हेरा ही मूळची आकाशाची राणी, पुढे विवाह व मातृत्व यांची देवी बनली. झ्यूसने मीटिसला गिळले तेव्हा अथीना तिच्या गर्भात होती. नंतर झ्यूसचे डोके दुखू लागले म्हणून त्याची कवटी उघडली, तेव्हा ती बाहेर आली. ती बुद्धिमत्ता, कला, युद्ध, शांती इत्यादींची देवता होती. तिने आपले कौमार्य कटाक्षाने जपले होते. टैरेसिआसने तिला स्नान करताना पाहिले म्हणून तिने त्याला अंध केले; परंतु नंतर त्याला भविष्यकथनाची कला दिली. अथीनाप्रमाणेच आर्टेमिस ही कृषिदेवताही कुमारी होती आणि तिने आपल्या मैत्रिणींनाही कुमारी राहायला लावले होते. झ्यूसचा भाऊ पोसायडन हा नद्या, सरोवरे व समुद्र यांचा देव होता. झ्यूस व लीटो यांचा संगीतप्रिय मुलगा अपोलो हा मूळचा सूर्यदेव होता आणि पुढे मेंढपाळांचा देव बनला. त्याच्या जन्माच्या वेळी मत्सरामुळे हेराने अनेक अडथळे उत्पन्न केले होते. म्यूझेस या त्याला संगीतात साथ देत असत. झ्यूस व हेरा यांचा लंगडा मुलगा हीफेस्टस हा अग्निदेव आणि देवांचा लोहार होता. त्याचे नाव संस्कृतमधील अग्नीच्या ‘यविष्ठ’(तरुणतम) या विशेषणाशी संबद्ध मानले जाते. मूळची जननक्षमतेची देवी ॲफ्रोडाइटी ही पुढे प्रणयदेवी बनली. एका सौंदर्यस्पर्धेत ट्रॉयच्या पॅरिसने हेरा आणि अथीना यांच्यापेक्षातिला अधिक सुंदर ठरविले होते. व्यापार, लाभ, वक्तृत्व, वारा, संधिप्रकाश इत्यादींचा देव हर्मीझ हा झ्यूस व मेया यांचा मुलगा होता. झ्यूस व हेरा यांचा मुलगा एरीझ हा युद्धदेव ॲफ्रोडाइटीच्या प्रेमात पडला होता. क्रोनस आणि रीया यांचे पहिले अपत्य असलेली हेस्टिआ म्हणजे घरातील अग्नीची देवता होय. पोसायडन आणि अपोलो यांनी तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली; परंतु तिने कुमारी राहणेच पसंत केले. यूरानस व जीआ यांची कन्या थीमिस ही न्यायाची व ज्ञानाची देवी होती. ग्रेसेस नावाच्या कृतज्ञतेच्या तीन देवी होत्या. ईरॉस हा फ्रोडाइटीचा सहकारी सायकीच्या प्रेमात पडला होता. सेमली या राजकन्येला झ्यूसपासून झालेला डायोनायसस हा मद्यदेव म्हणजे वैदिक सोमाचे ग्रीक रूप असावे, असे मानले जाते. हेराच्या फसव्या सूचनेवरून सेमलीने झ्यूसला पूर्ण तेजात पाहण्याची इच्छा केली आणि ती जळून गेली. त्यानंतर झ्यूसने मुलाला आपल्या मांडीत वाढवले. क्रोनस व रीया यांची मुलगी डीमीटर हा धान्याची देवी होती. डीमीटर व झ्यूस यांची मुलगी पर्सेफोनी हिला हेडीझने पाताळात पळवून नेल्यावर डीमीटरने पृथ्वीवर पिके येऊ दिली नाहीत. हेराच्या मुली असलेल्या दोन इलिथिया मिळून प्रसूतीच्या वेळी उपस्थित राहणारी एक देवता मानलेली होती. लीटोने अपोलोला जन्म दिला, तेव्हा हेराने मत्सराने नऊ दिवसपर्यंत इलिथियाला अडवून ठेवले होते. हर्क्यूलीझच्या जन्माच्या वेळीही तिने तसेच केले होते. नशिबाच्या तीन देवता मोइरा या नावाने प्रसिद्ध होत्या. नेमेसिस ही नैतिक कल्पनेशी संबद्ध देवता होती. एटी ही देवता माणसांना चुका करायला लावी, तर लीएटी या तिच्या बहिणी त्या चुका दुरूस्त करीत. झ्यूस एखाद्या परीशी प्रणयक्रीडा करीत असला, तर हेराची दासी एको ही काही तरी वटवट करून व गाणे म्हणून हेराचे लक्ष दुसरीकडे गुंतवी. यामुळे हेराने तिला मुकी बनवून तुला दुसऱ्याच्या बोलण्यातील फक्त शेवटच्या वर्णाचा प्रतिध्वनी काढता येईल,असे सांगितले. तिला तरुण नार्सिससवरचे आपले प्रेम व्यक्त करता आले नाही व त्यामुळे त्याने तिला झिडकारले, शेवटी ती निराशेने मरण पावली. फक्त तिच्या आवाजाचा प्रतिध्वनी उरला. नार्सिससने एकोला झिडकारले, म्हणून देवांनी त्याला आत्मप्रतिमेच्या प्रेमात पडण्याची शिक्षा दिली. त्याने एकदा पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले आणि अखंडपणे तेथेच बसून तो ग्लानीने मरण पावला. त्याचे नार्सिसस या फुलात रूपांतर झाले. क्रोनस व रीया यांचा मुलगा हेडीझ हा अधोलोकाचा प्रमुख देव होता. त्याच्या पत्नीचे नाव पर्सेफोनी हे होते. थॅनॅटॉस (मृत्यू) हा हेडीझला प्रजा मिळवून देतो, हिप्नॉस (निद्रा) हा त्याचा भाऊ होय, कीरीझ हे आयुष्य संपलेल्या व्यक्तीला ठार करून पाताळात नेतात इ. कल्पना होत्या.हीपीरिऑन या टायटनपासून थीआ या त्याच्या बहिणीला हीलीऑस (सूर्य), सीलीनी(चंद्र) व ईऑस (उषा) ही तीन अपत्ये झाली. हीलीऑसच्या चुलत्यांनी त्याला समुद्रात बुडविले ; परंतु तेथून आकाशात जाऊन तो चमकू लागला, अशी कथा आहे. एन्डिमिऑन या सदैव झोपलेल्या आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी सीलीनी प्रत्येक रात्री येते, अशी एक कथा होती. चिरतरुण ईऑसने झ्यूसकडून टिथोनस या आपल्या प्रियकरासाठी अमरत्व मागितले; परंतु चिरतारुण्य न मागितल्यामुळे तो कालांतराने वृद्ध झाला. तेव्हा तिने निराश होऊन त्याला कोंडून ठेवले. शेवटी देवांनी दयाबुद्धीने त्याचे सिसॅडा नावाच्या किड्यात रूपांतर केले. स्पर्श करशील ती वस्तू सोन्याची होईल, असा वर पृथ्वीदेवतेचा मुलगा मीडास याला डायोनायससकडून मिळाला होता. वीरांना पूज्य मानून त्यांना आहुती दिली जात असे. ज्याच्यामध्ये शारीरिक सामर्थ्याचे मानवीकरण करण्यात आले होते, त्या हर्क्यूलीझने ऑलिंपिक क्रीडासामन्यांची स्थापना केली, असे मानले जाते. त्याने ९ फणा असलेला विषारी साप आणि लोखंडांचे अवयव असलेले नरमांसभक्षक पक्षी मारले. नेमिअन या सिंहाला मारून त्याच्या चर्माच्या वस्त्रामुळे तो अजिंक्य बनला. सोनेरी सफरचंदे गोळा करण्यासाठी ॲटलसने त्याला मदत केली, तेव्हा त्याने ॲटलसच्या खांद्यावरची पृथ्वी आपल्या खांद्यावर घेतली होती. पित्याचा वध व आईशी विवाह या गोष्टी ईडिपस या वीराकडून नकळत घडल्या. त्याच्यापासून त्याच्या आईला दोन मुले व दोन मुली झाल्या. संदर्भ : Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975. Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965. Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922 Gray, L. H. Ed. The Mythology of all Races, 13 Vols., Boston 1925-36. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967. James, e.o Prehistoric, Religions London, 1957. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963. Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950. Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth ,London 1963. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends, 4. Vols., London, 1976-78. लेखक: आ. इ. साळुंखे माहिती स्रोत: मराठी विश्वकोश