ऑटोमन साम्राज्यात अल्बेनियन भाषेवर बंदी घालण्यात आली. पुढे झोग राजांच्या काळात मात्र तिचा शिक्षणसंस्थांमधून अभ्यास होऊ लागला. सोळाव्या व सतराव्या शतकांपासूनच अल्बेनियन साहित्य मुख्यत: निर्माण झालेले दिसते. लोकसाहित्यातील गीते, पोवाडे व कथा एवढेच पारंपारिक साहित्य या भाषेत आहे. ऑस्ट्रियाचे राजकीय महत्त्व वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांनीही धार्मिक स्वरूपाचे साहित्य लिहिले.

आधुनिक काळातील अल्बेनियन साहित्यिकांत नाइम फ्रेशेरी (१८४६—१९००) या श्रेष्ठ भावकवीची गणना होते. त्याचा ‘पशुधन व मायदेश’ या शीर्षकार्थाचा Bageti Bujqesi हा काव्यग्रंथ प्रसिद्ध आहे. ग्येर्गी फिश्ता (१८७१—१९४१) हा महाकवी असून, Lahuta e Malcis हे त्याचे महाकाव्य होय. ‘रानातील बासरी’ असा त्याच्या शीर्षकाचा अर्थ. फन नोली (१८८२ — ) याने शेक्सपिअर व इतर यूरोपियन लेखक यांच्या साहित्याचे अल्बेनियन भाषेत भाषांतर केले आहे.

संदर्भ : Newmark, L. Structural Grammar of Albanian, Bloomington, Indiana, 1957.

लेखक: वि. गो. पांडे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश