व्हिएटनामी साहित्याला अनामी (आन्नामी) साहित्य असे पूर्वी म्हणत. मध्ययुगाच्या पूर्वीच्या काळात राजदरबारी सुशिक्षित लोकांमध्ये काव्याची मोठी प्रतिष्ठा होती; या काव्याला जुन्या मौखिक परंपरेचा आधार होता. चौदाव्या शतकात व्हिएटनामी भाषा लेखनिविष्ट झाल्यावर मात्र चिनी परंपरेची छाया काव्यावर पडली आणि एक कथनपर काव्यप्रकार सिद्ध झाला. (त्रुयेन-नोय ‘दाक्षिणात्य लिपिचिन्हांतील आख्यान’.) सतराव्या-अठराव्या शतकांत तो पूर्णत्वास पोहोचला. एन्गायेन दू (१७६५-१८२०) कवीचे किम व्हान किएउ (‘किएउचे आख्यान’) हे काव्य विशेष नावाजले गेले. पुढे फ्रेंचांच्या धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणानंतर चिनी परंपरेचा प्रभाव कमी झाला आणि रोमन लिपीचा वापर आला. मात्र मूळ व्हिएटनामी काव्यपरंपरेचे सत्त्व टिकून राहिले.

संदर्भ: 1. Emeneau, M.B. Studies in Vietnamese (Annamese) Grammar, Cambridge, 1951.

2. Hoa, Nguyen-Dinh, Hoa’s Vietnamese-English Dictionary, 1959; Reprinted, Tokyo, 1966.

3. Thompson, L.C. A Vietnamese Grammar, London 1965.

लेखक: अशोक रा. केळकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश