(५ डिसेंबर १८०३—२७ जुलै १८७३). रशियन कवी. ओव्हस्टग येथे एका सरदार घराण्यात जन्म. मॉस्को विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. राजनैतिक सेवेच्या निमित्ताने जर्मनी व इटली या देशांत त्याने बावीस वर्षे वास्तव्य केले व तदनंतर तो रशियास परतला. तो लहानपणापासूनच कविता लिहू लागला होता. १८५४ साली व १८६८ मध्ये त्याचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले. त्याची बरीचशी कविता निसर्गपर आहे. तिच्यात दोन जगे आहेत. एका जगात त्याला सर्वत्र नियमन आणि सौंदर्य आढळते. दुसरे जग म्हणजे आत्यंतिक विघटनाचे; गोंधळाचे. माणूस या दुसऱ्या एकाकी दुरावलेल्या जगात राहतो. तिथून त्याला दुसऱ्या माणसांशी संवाद साधणे शक्य होत नाही. त्याच्या ‘सायलेन्शियम’ किंवा ‘द स्पोकन थॉट बिकम्स अ लाय’ (१८३०) या कवितेत ह्या संवादलोपाचे भान दिसून येते. त्याच्या प्रणयपर कविताही उल्लेखनीय आहेत. त्याची शैली आर्ष व प्रतिमाप्रचुर असून तो एक श्रेष्ठ भावकवी मानला जातो. सेंट पीटर्झबर्ग येथे त्याचे निधन झाले.

लेखिका : कुमुद मेहता

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश