(६ जानेवारी १९२८– ). एक चतुरस्र लेखक, वृत्तपत्रव्यवसायी, लघुकथालेखक, लघुनिबंधकार, अखिल भारतीय कीर्तीचे नाटककार, नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. शिक्षण मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे झाले. १९४३ मध्ये शालेय शिक्षणात खंड पडला. शालेय शिक्षणापेक्षा घरातील वाङ्मयप्रेमी वातावरणाचे संस्कार प्रेरक ठरले. त्यांचे वडील प्रकाशक, लेखक, हौशी नट–दिग्दर्शक होते. वडिलांच्या पुस्तकांच्या दुकानात बसणे, मुद्रिते तपासणे इत्यादींमधून वाङ्मयग्रहणाचे व लेखनाचे पाठ तेंडुलकरांना मिळाले. प्रसिद्ध साहित्यिक वि. वि. बोकील हे त्यांना पुण्यास शिक्षक म्हणून लाभले. बोकिलांप्रमाणेच दि. बा मोकाशी ह्यांच्या कथालेखनाचे तसेच अनंत काणेकर व शिवराम वाशीकर ह्यांच्या संवादलेखनाचे संस्कार तेंडुलकरांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वावर झालेले आहेत. १९५७ पर्यंत त्यांचे वास्तव्य पुण्यात होते; पुढे काही काळ मुंबईत. पुणे–मुंबई, मुंबई–पुणे असा अनिश्चित भ्रमंतीचा काही काळ लोटल्यानंतर १९६६ पासून मुंबई हेच वास्तव्याचे व कामाचे कायम स्थान बनले. मुंबईतील वास्तव्यामुळेच तेंडुलकरांचा प्रयोगशील रंगभूमीशी व ‘रंगायन’, ‘आविष्कार’, ‘भारतीय विद्या भवन कला केंद्र’, ‘अनिकेत’ यांसारख्या नवनाट्याविषयी आस्था बाळगणाऱ्या संस्थांशी व त्यांतील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचा संबंध आला. रंगभूमीशी आंरभापासूनच आत्मीयतेने निगडित असूनही तेंडुलकरांनी नाटकांकडे व्यावसायिक दृष्टिकोणातून पाहण्याचे कटाक्षाने टाळलेले आहे. वृत्तपत्रीय लेखन आणि नियतकालिकांचे संपादन हेच त्यांचे आरंभीचे आणि नंतरचेही उपजीविकेचे प्रमुख साधन. कोवळी उन्हे (१९७१), रातराणी (१९७१), फुगे साबणाचे (१९७४) यांसारखे त्यांचे स्फुट ललितनिबंधसंग्रह यातूनच जन्माला आले. तेंडुलकर हे नियतकालिकांशी निगडित राहिल्याने त्यांनी लघुकथास्वरूपाचे किंवा व्यक्तिचित्रणात्माक पद्धतीचेही बरेच लेखन केलेले आहे. त्यातील काही काचपात्रे (१९५८), द्वंद्व (१९६१), मेषपात्रे (१९६५), गाणे (१९६६), फुलपाखरू (१९७०) इ. नावांनी संकलित केले गेले आहे. दिवाकरांच्या नाट्यछटाही त्यांनी संपादिल्या आहेत.

तेंडुलकरांचे प्रधान कार्यक्षेत्र रंगभूमी हेच. १९५५ पासून आजतगायत ते नाट्यलेखन करीत आहेत. त्यांच्या नाट्यलेखनाचा प्रारंभ एकांकिकालेखनाने झाला. नभोवाणीकरिता लिहिलेली ‘रात्र’ ही त्यांची पहिली एकांकिका. ती बरीच लोकप्रिय ठरली. ध्वनिमाध्यमाचे तीत चातुर्याने उपयोजन केले आहे. रात्र आणि इतर एकांकिका हा त्यांचा पहिला एकांकिकासंग्रह (१९५७). नंतर अजगर आणि गंधर्व (१९६६) व भेकड आणि इतर एकांकिका (१९६९) हे दोन एकांकिकासंग्रह प्रसिद्ध झाले. तेंडुलकरांनी पाटलाच्या पोरीचे लगीन (१९६५), चिमणा बांधतो बंगला (१९६६), चांभारचौकशीचे नाटक (१९७०), मुलांसाठी तीन नाटिका (१९७३) इत्यादींसारखी काही बालनाट्येही लिहिला आहेत. तेंडुलकरांनी काही अनुवादापर नाट्यलेखनही केलेले आहे. त्यात टेनेसी विल्यम्सच्या स्ट्रीट कार नेम्ड डिझायरचा वासनाचक्र या नावाने केलेला अनुवाद विशेष लक्षणीय आहे. मोहन राकेश यांच्या आधे अधुरेचा व गिरीश कार्नांड यांच्या तुघलखचाही त्यांनी मराठी अनुवाद केला आहे. सामना, निशांत, शांतता कोर्ट चालू आहे यांसारख्या बोलपटांची कथानकेही त्यांनी अलीकडेच लिहिली आहेत. त्यांच्या ह्या तिन्ही चित्रपटकथांना पारितोषिके लाभलेली आहेत. सध्या यूनेस्कोने सोपविलेल्या दूरचित्रवाणीविषयक कार्यात ते मग्न आहेत.

तेंडुलकरांचे प्रसिद्धी दृष्ट्या पहिले नाटक श्रीमंत (१९५५) हे बरेच गाजले. त्यानंतर त्यांची माणूस नावाचे बेट (१९५६), मधल्या भिंती (१९५८), चिमणीचं घऱ होतं मेणाचं (१९६०), मी जिंकलो–मी हरलो (१९६३), कावळ्यांची शाळा (१९६४), सरी ग सरी (१९६४), एक हट्टी मुलगी (१९६७) ही नाटके रंगभूमीवर आली. त्यांतील माणूस नावाचे बेट हे रंगभूमीवरील स्थित्यंतराचे निदर्शक मानावे लागेल. यात तेंडुलकरांनी वास्तवतेचा संपूर्ण पुरस्कार केलेला आहे. चिमणीचं घर होतं मेणाचं हे प्रयोगशीलतेच्या दृष्टीने व एक हट्टी मुलगी हे व्यक्तिदर्शनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तेंडुलकरांना अखिल भारतीय स्वरूपाची कीर्ती मिळवून देणारे शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक १९६८ साली रंगभूमीवर आले. या नाटकाला कमलादेवी चट्टोपाध्याय पारितोषिक मिळाले आहे. भारतीय भाषांत त्याची भाषांतरे झाली आहेत. त्याच्या पाठोपाठ अशी पाखरे येती (१९७०), गिधाडे (१९७१) ही नाटके पुढे आली. गिधाडेतील उग्रकठोर वास्तववादी चित्रणाने बरीच खळबळ उडवून दिली. अशी पाखरे येती हे गिधाडेच्या उलट प्रकृतीचे नाटक. तेंडुलकर एकाच वेळी भिन्नभिन्न प्रकृतीची नाटके निर्माण करू शकतात याचेच हे निदर्शक. गिधाडेपेक्षाही तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर (१९७२) व घाशीराम कोतवाल (१९७३) या नाटकांनी अधिक प्रक्षोभ निर्माण केला. सखाराम बाइंडर तर काही काळ सेन्सॉरच्या अवकृपेस पात्र ठरले. घाशीराम कोतवाल हे नाना फडणीसांच्या जीवनावर आधारलेले नाटक. ऐतिहासिक दृष्ट्या हे चित्रण विवाद्य ठरले; पण या नाटकात केला गेलेला लोकनाट्यातील घटकांचा अवलंब प्रशंसनीय ठरला. दंबद्वीपचा मुकाबला (१९७४), मल्याकाका (१९७४) व बेबी (१९७६) ही त्यांची अलीकडेच प्रसिद्ध झालेली नाटके. त्यांच्या नाट्यकृतींची एकूण संख्या विसांहून अधिक भरेल.

आशय–अभिव्यक्ती दृष्ट्या तेंडुलकरी नाटकात बरीच स्थित्यंतरे झालेली आहेत. तेंडुलकर हे मूलतः वास्तववादी परंपरेचे नाटककार आहेत. प्रसंगवशात त्यांनी कल्पनारम्यतेचा आश्रय केलेला असतो; पण तो वास्तवाचा पाया बळकट करण्यासाठीच. सामान्य स्तरातील पांढरपेशा वर्ग आणि त्याची सुखदुःखे-विशेषतः दुःखेच–हा त्यांच्या चित्रणाचा व चिंतनाचा मुख्य विषय. साध्या दैनंदिन घटनेतील नाट्य समर्थपणे पेलणे हा त्यांच्या नाट्यलेखनाचा धर्म. त्यांच्या प्रारंभकालीन नाटकांत जी हळवी भावविवशता दिसते ती उत्तरोत्तर कमी होत जाऊन चित्रणात उग्र, कठोर वास्तवता अधिक प्रमाणात येऊ लागल्याचे जाणवते. मानवी मनातील व जीवनातील हिंस्त्रता, विकृती, कुरूपता यांचे निडर दर्शन त्यांची आजची नाटके घडवितात (गिधाडे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल इ.) त्यात काव्य आणि कारुण्य यांच्या छटाही अधूनमधून मिसळलेल्या दिसतील, तंत्रदृष्ट्याही ते नवेनवे प्रयोग करीत असतात.

या तेंडुलकरी नाटकाचे सारे विशेष शांतता कोर्ट चालू आहे मध्ये कलात्मक रीत्या एकत्र आलेले आहेत. व्यक्तीचे किंवा व्यक्तीसमूहाचे बाह्य आचार–उच्चार व त्याच्या अंतर्मनातील प्रवाह यांतील विरोध, विसंगती, उपरोध परिणामकारक रीत्या या नाटकात चित्रित झाले आहेत.

भारतीय समाजातील हिंसाचार ह्या विषयावरील संशोधनार्थ त्यांना नेहरू अभ्यासवृत्ती देण्यात आली होती (१९७४–७५).

लेखक : गो. म. कुलकर्णी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश