क्षेत्रफळ सिक्कीमचे भौगोलिक क्षेत्रफळ 7096 चौरस किमी असून राजधानी गंगटोक आहे. सिक्कीममध्ये लेपचा, भुतिया, नेपाळी व लिंबू या भाषा बोलल्या जातात. 2011 च्या जनगणनेनुसार सिक्कीमची लोकसंख्या 6,07,688 इतकी आहे. राज्यात साक्षरतेचे प्रमाण 82.20 टक्के इतके आहे. राज्यात चार जिल्हे आहेत. सिक्कीम हे राज्य 16 मे 1975 ला भारताचा अविभाज्य भाग झाले असून सिक्कीमचे सर्वात मोठे शहर गंगटोक हे आहे. सिक्कीम हे हिमालय डोंगररांगात वसलेले राज्य आहे. पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला तिबेट, पूर्वेला भूतान हे देश तर दक्षिणेला पश्चिम बंगाल हे भारतीय राज्य. सिक्किम हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे लहान राज्य आहे. (पहिल्या क्रमांकाचे लहान राज्य गोवा हे आहे.) तेराव्या शतकात उत्तर सिक्कीम मधील काबी लुंगत्सोक येथे तिबेटी राजकुमार ख्ये-बुमसा व लेपचा प्रमुख थेगाँग टेक या दोघांमध्ये सामंजस्याचा करार झाला. 1641 मध्ये पश्चिम सिक्कीम येथील युकसामला तीन महनिय संतांची भेट झाली. त्यांच्याकरवी ख्ये-बुमसाच्या सहाव्या पिढीतील वंशज फुतसाँग नामग्याल यांचा सिक्कीमचे पहिले चोग्याल म्हणून राज्यभिषेक झाला व त्यायोगे नामग्याल राजघराण्याचा उदय झाला. घटनाक्रमानुसार येथे लोकशाही स्थापित झाली व भारताचा अविभाज्य घटक म्हणून 1975 मध्ये मान्यता मिळाली. राज्यात कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. मका, भात, गहू, बटाटे. विलायची, मसाला, आले व संत्री ही प्रमुख पिके इथे घेतली जातात. देशातील विलायचीचे देशात सर्वात जास्त उत्पादन येथे होते. बटाटे, आले, संत्री व बिगर हंगामी भाजीपाला ही इतर नगदी पिके आहेत. सिक्कीममध्ये सेंद्रीय शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भुतिया, लेपचा, आइम, नेपाळी वांशिक जमातीची मिळून सिक्कीमची लोकसंख्या असल्याने माघ संक्रांती, दुर्गा पूजा, लक्ष्मी पूजा, आणि चैते दासाई ह्या नेपाळी सणांसोबत भुतिया जमातीचे पांग-ल्हाबसोल लोसूंग आणि लोसार हे सण मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. लेपचा लोकांचे नामसंघ, तेडाँग, हलो रूम फात हे सण साजरे होतात. सिक्कीम मधील नेपाळी लोक हिंदू सण साजरे करतात. स्थानिक सण म्हणता येतील असे काही सण आहेत. भीमसेन पूजा, सागा दावा, ल्हाबाब दुइचेन, द्रुपका तेशी, भूमचू आदी सण सिक्कीम मध्ये साजरी होतात. कांचनगंगा, गंगटोक, खबेलोम्गस्टॉक, बाखिम, युकसोम, युमथांग, दुबडी, झोंगरी, वार्से, त्वासिडीय, रूमटेकचा मठ, पेमायांगत्से मठ, सोमगी, त्सोमगो लेक, नथुला पास, रावंगला, फोडॉन्गचे मठ आदी सिक्कीमची महत्त्वाची पर्यटन केंद्रे समजली जातात. अनेक पर्यटक सिक्कीम राज्यातील विविध ठिकाणांना भेटी द्यायला येत असतात. सिक्कीम हे राज्य भारतातील सर्वात स्वच्छ राज्य आहे. शिस्त आणि प्रामाणिकपणासाठीही सिक्कीम प्रसिद्ध आहे. वळणदार रस्ते, उंच डोंगररांगा, खोल दऱ्या आणि निसर्गरम्य सौंदर्याचे वातावरण म्हणजे सिक्कीम. सिक्किम राज्यात अकरा भाषांसाठी राजमान्यता आहे. नेपाळी, सिक्कीमीज, हिंदी, लेप्चा, तमांग, नेवारी, राइ, गुरूंग, मगार, सनवार आणि इंग्रजी इतक्या भाषा सिक्कीमला बोलल्या जातात. राजमान्यता नसली तरी लिंबू, शेरपा, भोटीया, कागती, रोंग, तिबेटन या बोलीभाषाही बोलल्या जातात. राज्यात काही आदिवासी लोक राहतात. त्या आपल्या घटक बोली- मायबोली बोलतात. भाषा खालीलप्रमाणे भाषा - कोण बोलतं भोटिया - भोटिया/द्रूप्का कागती - कागती लेप्चा-रोंग - लेप्चा तिबेटन - तिबेटन भोटिया, चुंबीपा, दोपथापा, दुकपा, कगाटे, शेरपा, तिबेटन, ट्रोमोपा, योलमो, लेप्चा आदी आदिवासीही सिक्कीममध्ये राहतात. पाश्चिमात्य रॉक संगीत, भारतीय पॉप संगीत, नेपाळी रॉक आणि लेप्चा संगीतही सिक्कीम मध्ये लोकप्रिय आहे. सिंघी छाम हे मुखवटा नृत्य सिक्कीम मध्ये खूप लोकप्रिय आहे. सिक्कीममध्ये बर्फाचा सिंह हे सांस्कृतिक प्रतिक मानले जाते. म्हणून सिक्कीमच्या लोकनृत्यात सिंहाची प्रतिकृतीही नाचवली जाते. सिंहाचा बाह्य भाग हा कापडाने तयार केलेला असतो आणि त्यात दोन पुरूष आतून सिंहाकार देऊन नृत्य करतात. सुरीया नावाचे लोकवाद्य सिक्कीममध्ये खूप लोकप्रिय आहे. हे वाद्य हवेच्या दाबाने वाजते. म्हणजे तोंडाने हवा फुंकून आणि त्यांच्या छिद्रांवर बोट फिरवून ते विविध आवाजाने संगीत निर्माण करते. लोकगितांच्या चालीवर हे वाद्य वाजवले जाते. सिक्कीम हे राज्य छोटे असले तरी राज्यामधून बऱ्याच नद्या वाहतात. धरला, जालधका, लाचेन, लाचुंग, ल्होनाक, ताकचांग, रांगीत, रांगपो चू, रानीखोला, राटे चू, रेल्ली, रोरा चू, तालुंग, तिस्ता या नद्या सिक्कीम मधून वाहतात. राज्यात हिमालय पर्वत आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर सिक्कीममध्ये आहे. कांचनगंगा असे या हिमालय शिखराचे नाव आहे. (या व्यतिरिक्त अजून काही महत्त्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती.) लेखक - डॉ. सुधीर राजाराम देवरे स्त्रोत - महान्युज