भारतीय अवकाश भरारीच्या स्वप्नांना 'गरुडझेप' मिळवून देणारी नायिका म्हणजे कल्पना चावला. पहिली भारतीय महिला अंतराळवीर. अवकाश संशोधनासारख्या क्षेत्रातसुद्धा भारतीय महिला कुठेही कमी नाहीत, त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच सक्षमतेने आणि प्रभावीपणे काम करू शकतात, हे जागतिक पातळीवर सिद्ध करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारी अंतराळयात्री म्हणजे कल्पना चावला. तिचा आज (१ फेब्रुवारी ) रोजी १४ वा स्मृतिदिन. त्यानिमित्त तिच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढावा... कल्पना चावला हिचा जन्म हरयाणा राज्यातील करनाल या गावी झाला. बनारसीलाल चावला आणि संज्योती चावला या दाम्पत्याचे चौथे अपत्य. भावंडांमध्ये ती सर्वात लहान. तिचे शालेय शिक्षण १९७६ च्या दरम्यान टागोर स्कूलमध्ये झाले. तिने पंजाब एंजिनिअरिंग कॉलेज, चंडीगढ येथून वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात १९८२ साली पदवी आणि टेक्सास विद्यापीठातून अवकाश वैमानिकी अभियांत्रिकी (एरोस्पेस एंजिनिअरींग) या विषयात १९८४ साली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तिने १९८८ मध्ये कोलोरॅडो विद्यापीठातून अवकाश वैमानिकी अभियांत्रिकी या विषयात पीएच्.डी. पदवी मिळविली. कल्पनाचा विवाह फ्रान्सचे वैमानिक प्रशिक्षक ज्याँ पीर हॅरीसन यांच्याशी झाला होता. तिने अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले होते. त्यानंतर नासाच्या (NASA; नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) एम्स संशोधन केंद्रात शक्ति-निर्धारित संगणकीय द्रायू गतिकी (पॉवर लिफ्टेड कॉम्प्युटेशनल फ्ल्युइड डायनॅमिक्स) या विभागात कामाला सुरुवात केली. १९९३ साली तिचे ओव्हरसेट मेथड्स इनकॉर्पोरेशन, लॉस अल्टोस (कॅलिफोर्निया) येथे उपाध्यक्ष आणि संशोधन वैज्ञानिक म्हणून निवड झाली. कल्पनाने काम केलेल्या प्रकल्पांचे निष्कर्ष व शोध विविध परिषदांतील चर्चासत्र आणि शोधपत्रिकांमध्ये समाविष्ट करण्यात आले. डिसेंबर १९९४ मध्ये कल्पनाची निवड नासामध्ये अंतराळवीर म्हणून झाली. अंतराळवीरांच्या १५ व्या गटात तिने स्थान मिळविले. एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर आणि परीक्षेनंतर चावला तांत्रिक बाबींवर काम करणाऱ्या ॲस्ट्रॉनॉट ऑफिस, एव्हा (EVA, एक्स्ट्रा व्हेईक्युलरॲक्टिव्हिटी), रोबॉटिक्स अँड कॉम्प्युटर ब्रँच या कार्यालयात रुजू झाली. तिच्या कामात रोबॉटिक उपकरणांचा विकास आणि अंतराळ यानाला नियंत्रित करणाऱ्या सॉफ्टवेअरची शटल एव्हिऑनिक्स या प्रयोगशाळेत चाचणी घेणे समाविष्ट होते. १९९६ साली तिची निवड STS-८७ अवकाशाला यानावर मोहीम विशेषज्ञ आणि प्रमुख रोबॉटिक हस्तचालक म्हणून करण्यात आली. कल्पनाने आपले पहिले अंतराळ उड्डाण STS-८७ कोलंबिया या अवकाशयानमधून १९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर १९९७ एवढ्या कालावधीकरिता केले. या मोहिमेत अंतराळामध्ये भारहिनता कोणत्या प्रकारे भौतिक क्रियांना प्रभावित करते. याविषयीच्या तसेच सूर्याच्या बाह्य वातावरणीय प्रतलांचे निरीक्षण यावर भर दिलेला होता. सदस्यांपैकी दोन जणांनी एव्हाची (अवकाशात चालण्याची) कृती केली होती, त्यात चावलांचा समावेश होता. ही मोहीम अवकाशात ३७६ तास आणि ३४ मिनिटे राहिली तर अवकाशयानाने पृथ्वीभोवती २५२ वेळा परिभ्रमण केले. कल्पना चावलाचे दुसरे व अंतिम उड्डाण १६ जानेवारी ते १फेब्रुवारी २००३, या १६ दिवसांच्या कालावधीतले. ही मोहीम विज्ञान आणि संशोधनाला समर्पित होती. विविध पाळ्यांत काम करून मोहिमेतील सदस्य दिवसातील २४ तास काम करीत होते व त्यांनी त्यात जवळजवळ ८० यशस्वी परीक्षणे केली. मात्र या मोहिमेचा अंत दु:खद झाला. १ फेब्रुवारी २००३ ला कोलंबिया अवकाश यान परतीच्या मार्गावर असताना जमिनीवर उतरण्याच्या १६ मिनिटेआधी अवकाशयानात बिघाड झाल्यामुळे पेटले व दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात कल्पनासहित सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला. कल्पना चावला दोन्ही मोहिमांत एकूण ३० दिवस १४ तास ५४ मिनिटे अंतराळात होती. कल्पना चावला हिला मरणोत्तर काँग्रेशनल स्पेस मेडल ऑफ हॉनर, द नासा स्पेस फ्लाईट मेडल आणि नासा डिस्टिंगविशड सर्व्हिस मेडल या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हरयाणा शासनाने त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कुरुक्षेत्र येथे कल्पना चावला स्मारक तारामंडळ उभारले आहे. भारताचे नाव विश्वात गाजवणाऱ्या या रणरागिणीला आजच्या स्मृती दिनी विनम्र अभिवादन. (संदर्भ ग्रंथ -कल्पना चावला इंडियाज फर्स्ट वूमेन ऍस्ट्रोनट -दिलीप एम साळवीबायोग्राफी ऑफ कल्पना चावला -आर पी एच एडिटोरिअल बोर्ड) संकलन- मयूर गोपीचंद गव्हाणे. स्त्रोत - महान्युज