केन्या पूर्व आफ्रिकेतील स्वतंत्र प्रजासत्ताक. क्षेत्रफळ ५,८२,६४७ चौ. किमी., पैकी १४,७९२ किमी. जलव्याप्त. लोकसंख्या १,१६,९४,००० (१९७१ अंदाज). हा देश ४० उ. ते ४० द. व ३४० पू. ते ४१० पू. यांदरम्यान असून याच्या मध्यातून विषुववृत्त गेलेले आहे. याच्या उत्तरेस इथिओपिया व सूदान, पश्चिमेस युगांडा व व्हिक्टोरिया सरोवर, दक्षिणेस टांझानिया व पूर्वेस सोमाली गणराज्य आणि हिंदी महासागर आहेत. नैरोबी ही केन्याची राजधानी आहे. भूवर्णन केन्याचे तळखडक कायनाइट, अॅस्बेस्टस, ग्रॅफाइट व अभ्रकयुक्त नाइस व शिस्ट असून पश्चिम भागात त्यांवर तीव्र वलीकरण झालेल्या सोने व तांबे यांनी युक्त ग्रॅनाइटी व इतर खडकांचे आच्छादन आहे. पूर्वेकडील सखल भागात रेतीखडक व इतर सागरी गाळखडक आहेत. ईशान्य भागातही स्तरित खडक आहेत. या भागाचे अनेकदा समतलीकरण व उत्थान झाले आहे. केन्यातील प्रसिद्ध खचदरी व तिच्या दोन्ही बाजूंचा डोंगराळ प्रदेश प्लायोसीन व प्लाइस्टोसीन काळात निर्माण झालेला असून त्यावेळच्या लाव्ह्यांनी उंच प्रदेश व्यापला आहे. काही बेसाल्ट खडक मायोसीन काळातील आहेत. बऱ्याच उंच प्रदेशात, खचदरीत व रूडॉल्फ सरोवराच्या दोन्ही बाजूच्या विस्तृत प्रदेशात तृतीयक काळातील लाव्हे आढळतात. त्यामुळे तेथील मृदा सच्छिद्र व सुपीक झाली आहे. पश्चिमेचा पर्वतमय प्रदेश, नैर्ऋत्येचे विस्तीर्ण उंच पठार, त्याला दुभंगणारी दक्षिणोत्तरी खचदरी, उत्तरेचा व आग्नेयीचा कमी उंचीचा रुक्ष प्रदेश आणि व्हिक्टोरिया सरोवराच्या व हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरील अरुंद सखल किनारपट्ट्या अशी केन्याची सर्वसाधारण भूपृष्ठरचना आहे. हिंदी महासागरावर केन्याचा सु. ५०० किमी. किनारा आहे. मोंबासा व मालिंदी ही प्रमुख बंदरे आहेत. सखल व सुपीक किनारपट्टी ३ ते १६ किमी. रुंद असून तिच्या पश्चिमेस सु. ५०० किमी. पर्यंत प्रदेश उंच होत जातो. त्यात तीत टेकड्यांचा डोंगराळ भाग आहे. देशाच्या नैऋत्य विभागात सु. ३,३०० मी. उंचीचे पठार असून ६०० मी. उंचीचा आग्नेय व उत्तर विभाग रुक्ष आहे. या पठाराच्या मध्यभागातून, उत्तर-दक्षिण दिशेने आफ्रिकेची प्रसिद्ध खचदरी गेलेली आहे. ह्या खचदरीच्या पश्चिमेस, पठारी भागाची उंची कमी होत जाऊन शेवटी व्हिक्टोरिया सरोवर व त्याच्या काठची सखल किनारपट्टी आहे. युगांडाच्या सीमेवर मौंट एलगन हा ४,३२१ किमी. उंचीचा पर्वत आहे. खचदरीच्या पूर्वेस अॅबर्डेअर पर्वताची सरासरी ३,००० मी. उंचीची रांग असून तिच्या पूर्व उताराच्या अखेरीस ५,२०० मी. उंचीचा मौंट केन्या हा पर्वत आहे. विषुववृत्ताजवळ असूनही उंचीमुळे त्याचा माथा सतत हिमाच्छादित असतो. खचदरीची रुंदी ५० ते ६५ किमी. असून ती बाजूच्या प्रदेशापेक्षा ६०० ते ९०० मी. खोल आहे. खचदरीत कामासिया टेकड्यांची रांग व मृत ज्वालामुखींची अनेक विवरे आणि मागाडी, नैवाशा, एल्मेंटीटा, नाकूरू, हॅनिंग्टन, बॅरिंगो ही सरोवरे आहेत. उत्तर भागात २५० किमी. लांबीचे रूडॉल्फ सरोवर आहे. त्याच्या पश्चिमेस युगांडाच्या सीमेपर्यंत डोंगराळ प्रदेश आहे. पूर्वेकडील रुक्ष पठारी भागात कुलाल २,२९० मी. व मार्सांबित १,७४० मी. एकाकी उभे आहेत. हिंदी महासागराला मिळणाऱ्या ताना, आती-सबाकी-त्सावोनी व गॅलाना, लोरीअनच्या दलदलीकडे वाहणारी इवासो-निरो आणि व्हिक्टोरीया सरोवरास मिळणाऱ्या सोईया, गॉरी आणि याला ह्या केन्यातील प्रमुख नद्या होत. खचदरीतील प्रवाह तेथील काही सरोवरांस मिळतात. केन्या विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंस जवळजवळ सारखाच दूरवर पसरलेला असला, तरी त्याच्या हवामानात, भूरचनेप्रमाणेच विविधता दिसून येते. उष्ण कटिबंधीय दमट हवामान, खंडांतर्गत कोरडे व उष्ण हवामान आणि पठारी व पर्वतमय प्रदेशांतील थंड हवामान असे प्रकार येथे दिसून येतात. किनारपट्टीवर तपमान २६.६० से. असते. तेथे वार्षिक सरासरी तपमानकक्षा फक्त ३.३० से. असते. परंतु दैनिक सरासरी तपमानकक्षा ६.७० से. असते. पठारी भागात तपमान उंचीवर अवलंबून असते. १,६७५ मी. उंचीवरील नैरोबी येथे ते १९० से. असते तर २,७६० मी. उंचीच्या विषुववृत्तावरील भागात ते १३.३० से. असते. रुक्ष, ओसाड भागात तपमान २१०से. ते २७०से. पर्यंत असते. देशाच्या बऱ्याच मोठ्या भागात ७६ सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. उत्तरेकडील रुक्ष भागात तो २५ सेंमी. पर्यंत पडतो. किनारपट्टीच्या भागात १०० सेंमी. पर्यंत पाऊस पडतो; अगदी रुक्ष भागात जेमतेम १२-१३ सेंमी. तर व्हिक्टोरिया सरोवराजवळच्या काही भागांत १७५ सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. ऋतूंचा फरक तपमानापेक्षा पावसामुळे जाणवतो. विशेषतः एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या दोन कालखंडांत विशेषतः पाऊस पडतो. समुद्रकिनाऱ्यालगत नारळाची झाडे, कच्छवनश्री, सदाहरित वृक्ष व ९०० ते १,८०० मी. उंचीच्या भागात १—१.५ मी. उंचीचे गवत, खुरटी झाडेझुडपे उगवतात, तर रुक्ष विभागात फक्त खुरटे गवतच उगवते. पठारी विभागात बऱ्याच प्रदेशात २—२.५ मी. उंचीचे विशिष्ट सॅव्हाना गवत व त्यात मधूनमधून काटेरी झाडे आढळतात. त्यापेक्षा उंच भागात बांबू, इमारती लाकडांचे वृक्ष, कर्पूरवृक्ष, आफ्रिकन ऑलिव्ह, पोडो, सीडार इ. वृक्ष आढळतात. केन्याचे गवताळ व अरण्यमय प्रदेश नानाविध व विपुल प्राण्यांनी गजबजलेले आहेत. हत्ती, गेंडा, झेब्रा, रानरेडा, गॅझेली, ऑरिंक्स इ. अनेक जातींची हरणे, विल्डेबीस्ट (नू), हार्डबीस्ट, इंपाला, ईलँड हे तृणभक्षक व सिंह, चित्ता, बिबळ्या, तरस, कोल्हा इ. मांसभक्षक प्राणी येथे आढळतात.नद्या-सरोवरांत सुसरी व हिप्पो आहेत. बॅबून व अन्य जातींची माकडे अरण्यात दिसतात. सारस, बगळा, शहामृग, गरुड, गिधाड व इतर अनेक पक्षी आहेत. तसेच मांबा, कोब्रा, पफ् अॅडर, अजगर हे सर्प व विविध जातींचे कीटक आहेत. इतिहास केन्याच्या प्रागितिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. सातव्या शतकात अरब आणि इराणी व्यापाऱ्यांनी पूर्व किनारपट्टीवर वसाहती करण्यास सुरुवात केली आणि झांझिबार, इराणचे आखात व तांबड्या समुद्राच्या विभागात व्यापार सुरू केला. १४९८ मध्ये वास्को द गामा मालिंदी येथे आला. त्यापूर्वी चिनी व हिंदी व्यापारी येथे येत असत. पुढील २०० वर्षे येथे पोर्तुगीज व अरब यांची सत्तास्पर्धा सुरू होती. १७४० मध्ये अरबांनी सर्व पोर्तुगीजांनी येथून हाकलून लावल्यावर, ओमान साम्राज्यांतर्गत झांझिबारच्या सुलतानाचा अंमल येथे सुरू झाला.एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास जर्मन व ब्रिटिश मिशनऱ्यांनी व संशोधकांनी केन्याच्या अंतर्भागात व व्हिक्टोरिया सरोवराच्या परिसरात प्रवेश केला. त्यांच्यापूर्वी अरब आणि स्वाहिली लोक मोंबासाहून व्हिक्टोरिया सरोवर, किलिमांजारो व एलगन पर्वतांपर्यंत हस्तिदंताच्या शोधार्थ जात, परंतु कष्टमय प्रवास व मसाई लोकांची भीती यांमुळे ते तो प्रयत्न सोडून देत. अठराव्या शतकाच्या मध्यास उत्तरेकडून केन्याच्या मध्यभागात आलेल्या लढाऊ भटक्या मसाई टोळीवाल्यांचे वर्चस्व वाढू लागले. त्यांनी कृषिप्रधान बांटूंवर धाडी घातल्या. नांदींच्या वाटेस ते गेले नाहीत. तावेता व तीतांनी अरण्यांचा आणि डोंगराचा आश्रय घेतला. किकुयूंनी त्यांना बऱ्याच यशस्वीपणे तोंड दिले. रोगांच्या साथींनी सर्व लोक हवालदिल झाले. याच वेळी यूरोपीय प्रबळ झाले व १८८८ मध्ये येथे इंपीरिअल ब्रिटिश ईस्ट आफ्रिकन कंपनीचा कारभार सुरू झाला. १८९० मध्ये ब्रिटिश व जर्मन यांचा करार झाला व १८९५ मध्ये हा प्रदेश ब्रिटिश ईस्ट आफ्रिका या नावाने जाहीर झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस येथे लोहमार्ग बांधले जाऊ लागले आणि यूरोपीय व आशियाई लोकांच्या वसाहती वाढू लागल्या. १९२० मध्ये या प्रदेशास ब्रिटिश क्राउन कॉलनी हे नाव प्राप्त झाले. दोन्ही महायुद्धांदरम्यानच्या काळात राज्यकारभारात यूरोपीयांच्या बरोबरीने स्थान मिळविण्याचे आशियाईचे प्रयत्न हाणून पाडण्यात यूरोपीय यशस्वी झाले. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर मूळच्या आफ्रिकी लोकांनीच सत्ता संपादनासाठी संघर्ष सुरू केला. टॉम म्बोया व जोमो केन्याटा यांच्या नेतृत्वाखालील माऊ-माऊ चळवळीला पुढे हिंसक स्वरूप प्राप्त झाले व १९५२ ते १९५९ पर्यंत तेथे आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली गेली. १९५४, १९५७ व १९६० मध्ये येथे संविधानाचे तीन मसुदे पुढे ठेवले गेले. परंतु १९६० मध्ये दिलेला संविधानाचा मसुदा मान्य झाला. १९६३ च्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळविणाऱ्या टॉम म्बोया व नंतर जोमो केन्याटा यांच्या नेतृत्वाखालील केन्या आफ्रिकन नॅशनल युनियन (कानू) पक्षाने १२ डिसेंबर १९६३ रोजी ब्रिटिश राष्ट्रकुलांतर्गत स्वतंत्र केन्या देशाचा कारभार हाती घेतला व जोमो केन्याटा त्याचा मुख्य प्रधान झाला. चार दिवसांनी केन्या संयुक्त राष्ट्रांचा सभासद झाला व १२ डिसेंबर १९६४ रोजी याचे गणराज्य स्थापन झाले. जोमो केन्याटा हा केन्याचा पहिला अध्यक्ष निवडला गेला. किनाऱ्याजवळचा १६ किमी. रुंदीचा प्रदेश झांझिबारच्या सुलतानाच्या सत्तेखाली होता, परंतु केन्या प्रोटेक्टोरेट म्हणून ब्रिटिशच त्याचा कारभार करीत. सुलतानाने हा प्रदेश पुढे केन्याच्या हवाली केला आणि ब्रिटिशांनी युगांडा, इथिओपिया, इटली यांच्याशी ठरविलेल्या सीमांपर्यंत सर्व केन्या एकसंध झाला. केन्या आफ्रिकन डेमोक्रॅटिक (काडू) हा विरोधी पक्ष राज्यकर्त्या कानू पक्षात १९६५ साली विलीन झाला. १९६६ मध्ये उपाध्यक्ष ओगिंगा-ओडिंगा याने राजीनामा देऊन केन्या पीपल्स युनियन पार्टी – केपीयू – हा पक्ष स्थापन केला. त्याला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळाली. १९६९ मध्ये टॉम म्बोया या मंत्र्याचा खून झाला. केपीयूवर बंदी घालण्यात आली व ओडिंगा आणि त्याचे सहकारी यांस तुरुंगात डांबण्यात आले. डिसेंबर १९६९ च्या निवडणुकात केन्याटा व कानू पक्षाचे लोक अविरोध निवडून आले. स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षात ७०,००० लोकांना ब्रिटिश पासपोर्ट देण्यात आले. त्यांपैकी बरेच आशियाई होते. १९६७ मध्ये ब्रिटिश सरकारने या लोकांच्या ब्रिटन प्रवेशावर नियंत्रणे घातली. केन्याच्या नागरिकांशिवाय इतरांना कामाचे परवाने न देण्याच्या केन्या सरकारच्या धोरणामुळे या लोकांना धड कोणत्याच देशात राहता येईना. त्यांचा प्रश्न अद्याप अनिर्णितच आहे. स्त्रोत: मराठी विश्वकोश