झाईरे काँगो लोकसत्ताक गणतंत्र व त्यापूर्वीचे बेल्जियन काँगो. आफ्रिकेतील काँगो नदीच्या खोऱ्याचा बहुतेक भाग व नाईलच्या वरच्या खोऱ्याचा थोडासा भाग व्यापणारे राष्ट्र. क्षेत्रफळ सु. २३,४५,४०९ चौ. किमी. लोकसंख्या सु. २,१६,३७,९०० (१९७०). हा देश ५° ३०' उ. ते १३° २८' द. व १२° १०'पू. ते ३१° १५' पू. यांदरम्यान आहे. शेजारच्या काँगो प्रजासत्ताकापासून वेगळे ओळखू येण्यासाठी राजधानीवरून याला काँगो (किन्शासा) व त्याला काँगो (ब्रॅझाव्हिल) म्हणत. १९७१ पासून या देशाने झाईरे हे नाव धारण केले आहे. याच्या उत्तरेला मध्य आफ्रिका संघराज्य व सूदान आणि पूर्वेस युगांडा, रूआंडा, बुरूंडी, टांझानिया व झँबिया हे देश आणि अल्बर्ट, एडवर्ड, किवू, टांगानिका व म्वेरू या सरोवरांचे पूर्वेकडील भाग आहेत. दक्षिण झँबिया व अंगोल हे देश असून पश्चिमेस अवघ्या ४० किमी. किनाऱ्यावर अटलांटिक महासागार, अंगोलाचा काबिंदा हा तुटक प्रांत, काँगो (ब्रॅझा.) व मध्य आफ्रिका संघराज्य आहेत. काँगो (झाईरे) नदीच्या मुखाचा दक्षिण किनारा अंगोलाकडे आहे. किन्शासा (पूर्वीचे लिओपोल्डव्हिल) ही राजधानी आहे. या लेखात शक्य तो देशासाठी झाईरे व नदीसाठी काँगो ही नावे वापरली आहेत. या देशात सापडणाऱ्या विशिष्ट खनिजांमुळे त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व होतेच. पहिल्या अणुबाँबसाठी लागलेले युरेनियम शाबा (कटांगा) येथील खाणीतून आलेले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या अनेक आफ्रिकी राष्ट्रांतील प्रश्न नऊ देशांशी सरहद्द भिडलेल्या या देशात अधिकच तीव्रतेने जाणवू लागले आणि संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या सशस्त्र साह्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्याचा फारच बोलबाला झाला. भूवर्णन काँगो नदी एका विस्तृत द्रोणीसारख्या पठारावरून वाहते. तुंबा आणि माइएन्डॉम्डी (लिओपोल्ड– २) या सरोवरांभोवतीच्या झाईरेच्या मध्यभागाची उंच ३३८ मी. पर्यंत आहे. काँगोच्या जलवाहनप्रदेशाचा सु. ६७% भाग या देशात आहे. माताडीपासून खालच्या भागात नदीच्या उजव्या बाजूस मायूंबेचा डोंगराळ प्रदेश आहे. अरुंद किनारी मैदानाच्या मागे क्रिस्टल पर्वत आहे. अंगोलाच्या सरहद्दीवर, देशाच्या दक्षिण भागात सु. ७०० मी. उंचीचे क्वांगो पठार व कासाई आणि शाबा पठारे आहेत. यांतच लूबूंबाशी (१,१०० मी.), मानीका (१,४६० मी.), कुंडेलूंगू (१,५५० मी. ) आणि किबारा (१,७०० मी.) ही छोटी पठारे समाविष्ट असून त्यांच्या दरम्यान कामालोंडा-उपेंबा द्रोणीप्रदेश, लूफीरा मैदान, म्वेरू सरोवर व लूआपूला खोरे हे सखल भाग आहेत. उत्तरेकडे काँगोचे खोरे चॅडपासून व नाईलच्या खोऱ्यापासून ऊबांगी- वेले या बुटक्या पठारांनी अलग झालेले आहे. पूर्वेकडे खोऱ्याची कड एकदम उंच झालेली असून तेथे आफ्रिकेच्या मोठ्या खचदरीच्या काठावर २,४८३ मी. उंच मिटुंबा पर्वताची एक रांगच उभी आहे. या खचदरीच्या खळग्यांतून टांगानिका, किवू, एडवर्ड व ॲल्बर्ट ही सरोवरे साचलेली आहेत. किवू सरोवराच्या उत्तरेस लाव्हाच्या विस्तीर्ण थरांतून व्हीरुंगाची ज्वालामुखी शिखरे वर आलेली आहेत. ॲल्बर्ट व एडवर्ड सरोवरांच्या दरम्यान युगांडाच्या सरहद्दीवर रूवेनझोरीची पर्वतराजी असून त्यात या देशातील सर्वोच्च, सतत बर्फाच्छादित असलेले शिखर मौंट एन्गालीएमा असून त्याची मौंट मार्गारीटा व मौट अलेक्झांड्रा ही अनुक्रमे ५,१०९ मी. आणि ५,१७५ मी. उंचीची टोके आहेत. देशाच्या मध्यभागातही छोटी पठारे, पायऱ्यापायऱ्यांसारखे प्रदेश, क्वचित दलदलींनी भरलेली दऱ्याखोरी व त्यांवर लोंबलेले कडे असे दृश्य दिसते. काँगो खोरे क्रिटेशस कालखंडात तयार होऊ लागले. तृतीय-कल्पातील भूमीच्या हालचालींमुळे पूर्वेकडील पर्वत व द्रोण्या तयार झाल्या. किवू भागातील ज्वालामुखी क्रिया तृतीयक कालाच्या शेवटी सुरू झाली व ती अद्याप चालूच आहे. झाईरेतील खडकांचा पृष्ठभाग अगदी कुजून गेला असून येथे जीवाश्म जवळजवळ सापडतच नाहीत. बोमा आणि समुद्रकिनारा यांच्या दरम्यान सामुद्री रचनेचा एक अरुंद किनारी पट्टा आढळतो ; त्यात कधीकधी डामराचे झिरपे दिसतात. कँब्रियनपूर्व रूपांतरित तळखडकांत पुष्कळदा ग्रॅनाइट आढळतो. पृष्ठभागावरील विस्तृत थरात वाळू, चिकणमाती व वालुकाश्म आढळतात. कासाई व किसांगानी भागात क्रिटेशस व जुरासिक काळात सागरी आक्रमण झाले असावे असे दिसते. खोऱ्याच्या मध्यभागात तृतीयक व चतुर्थक काळातील थर आढळतात. त्यात पृष्ठभागाजवळ लॅटेराइट तयार झालेला दिसतो. तथापि झाईरेची भूशास्त्रीय माहिती अद्याप अपुरी आहे. दक्षिण शाबाच्या वलीकृत कँब्रियनपूर्व चुनखडकांत व वालुकाश्मात तांबे, कोबाल्ट, युरेनियम, शिसे, रेडियम, प्लॅटिनम, कॅडमियम आणि जस्त यांची धातुके सापडतात. उत्तर शाबा आणि दक्षिण किवूमध्ये कॅसिटेराइट आढळते. किबाली-इतुरी आणि उत्तर व दक्षिण किवूमध्ये सोने सापडते. याशिवाय मँगॅनीज, कथिल, चांदी , कोलंबाइट, टँटेलाइट, टंगस्टन, जर्मेनियम यांचेही उत्पादन झाईरेत होते. औद्योगिक कामासाठी लागणारे हिरे व कोबाल्ट यांबाबत बिगर कम्युनिस्ट देशांत झाईरेचा प्रथम क्रमांक आहे. स्वस्त जलविद्युत् उपल्बध होण्यापूर्वी शाबात कारखान्यांस इंधन म्हणून लागणारा कोळसा सापडत असे. किनारी व खचदारी भागात खनिज तेल आणि कोळसा सापडण्याचा संभव आहे. झाईरेतील मृदा सामान्यतः निकृष्ट आहे. दाट वनप्रदेशातील मृदा क्षरणकारकांच्या अभावी जागीच राहते. तेथे वरच्या थरांतील क्षार पाण्याबरोबर खालच्या थरांत जातात. काँगो नदीच्या काठी व उपनद्यांच्या खोऱ्यांत गाळाच्या जमिनीचे सुपीक विभाग आहेत. तसेच खचदरीच्या बाजूस, विशेषतः किवू भागात, ज्वालामुखीजन्य सुपीक मृदा आढळते. तोच येथील शेतीप्रधान विभाग आहे. काँगो (झाईरे) नदी देशाच्या आग्नेय भागात लूआलाबा नावाने उगम पावते व एका प्रचंड अर्धवर्तुळाकार मार्गाने सु. ४,६७० किमी. वाहत जाऊन बोमाजवळ अटलांटिक महासागरास खाडीमुखाने मिळते. प्रथम विषुववृत्त ओलांडून ती वायव्य आणि मग पश्चिम दिशांस वाहू लागली म्हणजे तिला काँगो हे नाव मिळते. उत्तरेकडून तिला ऊबांगी व दक्षिणेकडून कासाई या प्रमुख उपनद्या मिळतात. या दोघींनाही अनेक मोठमोठ्या उपनद्या मिळतात. यांशिवाय काँगोला उत्तरेकडून आरूवीमी, लिंडी, लोईका, इतिंबीरी, माँगाला, गिरी आणि दक्षिणेकडून लोमामी, लूलाँग्गा, रूकी, इकलेंबा या प्रमुख उपनद्या मिळतात. लहानमोठ्या जलप्रवाहांचे एक प्रचंड जाळेच या देशात निर्माण झालेले दिसते. याचे कारण म्हणजे काँगो विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंनी वाहत जाते आणि दोन्ही बाजूंनी तिला तिच्या उपनद्या आपापल्या उपनद्यांसह येऊन मिळतात. हा विषुववृत्तीय प्रदेश बारमहा भरपूर पावसाचा आहे आणि सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीबरोबर दोन्हीकडील नद्यांना आलटून पालटून मोठमोठे पूर येतात. यामुळे काँगो नदी सतत जलपूर्ण असते. समुद्रात भरपूर पाणी येऊन ओतण्याबाबत ती जगात फक्त अमेझॉनच्याच खालोखाल क्रमांकाची आहे. काँगो व तिच्या उपनद्या अनेक ठिकाणी खोल निदऱ्यांतून वाहतात आणि धबधब्यांवरून व प्रपातांवरून एकदम वेगाने खाली येतात. यामुळे एकूण सुप्त जलविद्युत् शक्तीबाबत त्यांचा जगात पहिला क्रमांक लागतो. यापैकी फारच थोडी शक्ती सध्या कार्यान्वित आहे. खचदरीतील सरोवरांशिवाय काँगोत म्वेरू, उपेंबा, माइएन्डॉम्डी (एनडाँबी ) वा (लिओपोल्ड–२) व तुंबा ही महत्त्वाची सरोवरे आहेत. हवामान विषुववृत्तीय भागात तपमान वर्षभर सु. २५० से. असते. त्यात फारसा बदल होत नाही . त्यातल्यात्यात फेब्रुवारीत तपमान वाढते. वार्षिक पर्जन्यमान सु. १८० सेंमी. असते. पाऊस वर्षभर असतोच; परंतु तो एप्रिल-मे व ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यांत अधिक पडतो. उत्तरेकडे व दक्षिणेकडे जावे तसतसे सरासरी तपमान आणि वार्षिक सरासरी तपमान कक्षाही वाढत जाते. जास्त पावसाचे दिवस वर्षातून दोनदा अधिक स्पष्ट जाणवतात. जानेवारी- फेब्रुवारीत पाऊस कमी पडतो. जून-जुलै-ऑगस्ट हा काळ कोरडा जाऊ लागतो. समुद्रकाठच्या प्रदेशात थंड बेंग्वेला प्रवाहाचा परिणाम जाणवतो. तेथे आणि आग्नेय भागात जून ते ऑक्टोबर बहुधा बिनपावसाचा काळ असतो. जुलै आणि ऑगस्टमध्ये तपमान सर्वांत कमी असते. शाबा पठारावर हवामानातील हा फरक अधिक स्पष्ट होतो; वार्षिक पर्जन्यमान १४० सेंमी. पर्यंत असते; परंतु पावसाचा व बिनपावसाचा काळ वर्षातून दोनदा न येता एकेकदाच येतो. पर्वतीय प्रदेशात सरासरी तपमान १९० से. व पाऊस सु. १३० सेंमी. असतो. स्त्रोत: मराठी विश्वकोश