मादागास्कर आफ्रिका खंडाच्या आग्नेयीस असलेले लोकशाही प्रजासत्ताक द्वीपराष्ट्र. ४३° १२ पू. ते ५०° १७′ पू. रेखांश, ११°५७′ द. ते २५° ३८′ द. अक्षांश यांदरम्यान पसरलेल्या पश्चिम हिंदी महासागरातील मादागास्कर या प्रमुख बेटाशिवाय याच्या वायव्य किनाऱ्यालगतच्या नोसी बे व पूर्व किनाऱ्यालगतच्या सेंट मारी या बेटांचा तसेच लगतच्या इतर लहान बेटांचा समावेश या देशात होतो. हे आफ्रिकन राष्ट्र असून मादागास्कर बेट आफ्रिका खंडापासून सु. ४०० किमी. रुंदीच्या मोझँबीक खाडीने वेगळे झाले आहे. क्षेत्रफळ ५,८७,०४१ चौ. किमी. असून मादागास्कर हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. बेटाची दक्षिणोत्तर कमाल लांबी १,५९९ किमी., पूर्व–पश्चिम कमाल रुंदी ५७९ किमी. व सरासरी रुंदी ४४९ किमी. आहे. लोकसंख्या ९४,७२,००० (१९८३ अंदाज). अँतनॅनरीव्हो (पूर्वीचे ⇨ तानानारीव, लोकसंख्या ४,००,०००–१९७८) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. देशाला सु. ४,१८० किमी. लांबीचा सागरकिनारा लाभला आहे. भूवर्णन मादागास्कर बेटाचे (१) मध्यवर्ती पर्वतीय वा पठारी प्रदेश, (२) पूर्व किनारपट्टी व (३) पश्चिम किनारपट्टी असे प्राकृतिक विभाग पडतात. मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशात तीन प्रमुख पर्वतश्रेण्या असून त्यांची सस.पासून सरासरी उंची ९०० ते १,५०० मी. पर्यंत आढळते. बेटाच्या उत्तर भागातील त्सारातानाना गिरिपिंडात मारोमोकोत्रो हे देशातील सर्वोच्च (२,८७६ मी. ) शिखर आहे. या प्रमुख शिखराशिवाय १,८३० मी. पेक्षा जास्त उंचीची बरीच शिखरे आहेत. या प्रदेशाच्या पूर्व उतारावर अनेक खोल दऱ्या, घळ्या व धबधबे निर्माण झालेले आढळतात. देशाच्या मध्यवर्ती भागात अंकारात्रा हा विस्तृत पर्वतप्रदेश असून त्सीआफजाव्होना (२,६४३ मी.) हे त्यातील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. हा देशातील प्रमुख जलविभाजक आहे. या पर्वतीय आणि पठारी भागाच्या पश्चिमेकडील उतारापेक्षा पूर्वेकडील उतार अधिक तीव्र स्वरूपाचे आहेत. मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशाच्या पूर्वेकडील महासागर किनाऱ्यापर्यंतच्या चिंचोळ्या प्रदेशाचा पूर्व किनारपट्टीमध्ये समावेश होतो. या किनारपट्टीची सरासरी रुंदी ५० किमी. आहे. या प्रदेशात झिजलेल्या टेकड्या, पुळणी व विस्तृत खारकच्छे आहेत. ही खारकच्छे किनाऱ्याला समांतर असणाऱ्या ६४४ किमी. लांबीच्या पांगालान कालव्याने एकमेकांशी जोडली आहेत. फाराफांगाना गावाच्या दक्षिणेकडील किनारा अधिक खडकाळ असून तेथे कड्यांची, उंच वालुकागिरींची व लहानलहान उपसागरांची निर्मिती झालेली आढळते. ही किनारपट्टी पर्वतीय प्रदेशाला समांतर व अगदी सरळ असून केवळ उत्तरेकडे आंतोंझील उपसागर हाच काय तो जमिनीत घुसलेला पाण्याचा मोठा भाग आहे. मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशापासून पश्चिमेस मोझँबीक खाडीच्या किनाऱ्यापर्यंतच्या प्रदेशाचा समावेश पश्चिम किनारपट्टीत होतो. पूर्व किनारपट्टीच्या मानाने ही बरीच रुंद (१०० ते २०० किमी.) व दंतुर असून तिच्यावर गाळाची मैदाने, पठारे, खचलेले प्रदेश यांसारखे विविध भूविशेष आढळतात. या किनारपट्टीच्या वायव्य भागात विस्तृत मैदाने असून तेथील किनाऱ्यावर उपसागर, नदीमुखखाड्या, ज्वालामुखी बेटे व प्रवाळ खडकांची निर्मिती झालेली आढळते. या प्रदेशाचा दक्षिणेकडील किनारा बराच सरळ आहे. मृदा व खनिजे किनारपट्टीच्या प्रदेशात जलोढीय व उंच प्रदेशातील नद्यांच्या खोऱ्यांत सुपीक मृदा असून त्यांत जांभ्या मृदेचे गुणधर्मही आढळतात. पर्वतीय प्रदेशात जांभ्या मृदेचे प्रमाण अधिक आहे. लाव्ह्यापासून बनलेल्या मृदेनेही बेटांचे विस्तृत क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे मादागास्करला ‘तांबड्या मातीचे बेट’ म्हणूनही संबोधले जाते. पर्वतीय पठारी प्रदेशाची झीज खूपच झालेली आढळते. मध्यवर्ती पठारी प्रदेशात व पूर्व किनारपट्टीवर नाइस, ग्रॅनाइट, फ्लिंट व इतर स्फटिकी शैलसमूह, तर पश्चिम भागात अवसादी खडकांचे प्रमाण अधिक आहे. अभ्रक, ग्रॅफाइट, क्रोम, इल्मेनाइट, झिर्कॉन, वैदूर्य, सोने, गार्नेट इत्यादींचे साठे देशात आहेत. नद्या मध्यवर्ती पठारी व पर्वतीय प्रदेश हा देशातील प्रमुख जलविभाजक असून त्याला अनुसरूनच देशात पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी अशा दोन नदीप्रणाली निर्माण झाल्या आहेत. पूर्ववाहिनी नद्या तीव्र उतारावरून वाहत असून त्या लांबीने कमी व द्रुतवाही आहेत. या नद्या किनाऱ्याजवळील खारकच्छाला किंवा महासागराला जाऊन मिळतात. पात्रात अनेक प्रपात आणि द्रुतवाह आढळतात. मांद्रारे, मॅनानारा, फाराओनी, ईव्हूंद्रू, मानांजारी या प्रमुख पूर्ववाहिनी नद्या असून जलवाहतुकीसाठी यांचा फारच कमी उपयोग होतो. याउलट पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या मंद उतारावरून वाहत असून त्या बऱ्याच लांब आहेत. सोफिया, माहाझांबा, बेत्सीबूका, मानांबाहो, त्सीरीबीहीना, मांगोकी, ऊनीलाही या प्रमुख पश्चिमवाहिनी नद्या होत. या नद्यांबरोबर वाहून येणाऱ्या गाळामुळे पश्चिम भागात विस्तृत मैदानांची निर्मिती झालेली आहे. या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार झालेले असून त्यांच्या मुखाजवळ वारंवार वाळूच्या दांड्यांची निर्मिती होताना आढळते. या नद्या सु. १६० किमी. पर्यंत जलवाहतुकीस उपयोगी ठरतात. मादागास्कर बेटावर अनेक सरोवरांची निर्मिती झालेली आढळते. त्यांपैकी बरीचशी ज्वालामुखी सरोवरे आहेत. तानानारीवच्या ईशान्येस असलेले आलाओत्रा हे पर्वतीय प्रदेशातील सर्वांत मोठे सरोवर आहे. तूलेआरच्या दक्षिणेस किनाऱ्यावरच असलेले त्सीमानाम्पेत्सोत्सा हे खाऱ्या पाण्याचे परंतु निर्गमद्वार नसलेले मोठे सरोवर आहे. याशिवाय ईतासी, किंग्कूनी, ईहूत्री ही सरोवरे उल्लेखनीय आहेत. हवामान नोव्हेंबर ते एप्रिल या काळात येथे उष्ण व आर्द्र ऋतू, तर मे ते ऑक्टोबर यांदरम्यान थंड व कोरडा ऋतू असतो. मादागास्करच्या हवामानावर आग्नेय व्यापारी वारे व वायव्य मोसमी वाऱ्यांचा परिणाम झालेला दिसतो. मे ते ऑक्टोबर यांदरम्यान आग्नेय व्यापारी वारे अधिक जोराने वाहतात. या वाऱ्यांपासून देशाच्या पूर्व किनाऱ्यावर भरपूर पाऊस पडतो (वार्षिक सरासरी २५० सेंमी.). पठारी भागाकडे वाहताना आर्द्रतेचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे पठारी भागात केवळ झिमझिम पाऊस व धुके आढळते. या काळात अँतनॅनरीव्हो येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १४० सेंमी. असून पश्चिम भाग मात्र कोरडाच राहतो. मोसमी वाऱ्यापासून देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी होते. देशाचा नैऋत्य भाग मात्र खूपच रुक्ष राहिलेला असून तेथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५ सेंमी. इतके कमी असते. देशाच्या वायव्य भागात सर्वाधिक तापमान असते. जुलै हा वर्षातील सर्वाधिक थंडीचा, तर डिसेंबर हा सर्वांत उष्ण महिना असतो. डिसेंबर ते मार्च या काळात हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या चक्री वादळांपासून देशाच्या पूर्व किनाऱ्यावर मुसळधार वृष्टी होऊन विनाशक पूर–परिस्थिती निर्माण होते. देशाच्या हवामानावर अक्षांशापेक्षा उंचीचाच अधिक परिणाम झालेला दिसतो. किनाऱ्यावरील सरासरी तापमान २१° ते २७° से., तर पठारी भागातील सरासरी तापमान १३° ते १९० से. असते. किनाऱ्यावरील हवामान उष्ण व दमट, तर अंतर्गत भागातील हवामान समशीतोष्ण प्रकारचे असते. स्त्रोत: मराठी विश्वकोश