मॅसॅचूसेट्स अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या ईशान्य कोपऱ्यातील न्यू इंग्लंड प्रदेशातील सहा राज्यांपैकी एक राज्य. लोकसंख्या ५७,३७,०३७ (१९८०). पूर्व-पश्चिम लांबी ३०५ किमी., दक्षिणोत्तर रुंदी १७७ किमी., क्षेत्रफळ २२,६४६ चौ.किमी. पैकी अतर्गत जलाशय १,१९१ चौ. किमी. राज्याचा आकार साधारणपणे आयताकृती आहे. मॅसॅचूसेट्सच्या उत्तरेस व्हर्माँट व न्यू हँपशर ही राज्ये, पूर्वेस अटलांटिक महासागर, दक्षिणेस कनेक्टिकट व ऱ्होड आयलंड व पश्चिमेस न्यूयॉर्क ही राज्ये आहेत. राज्याचे आग्नेयीकडील वक्राकार केप कॉड हे द्वीपकल्प अटलांटिक महासागारात १०० किमी. घुसलेले आहे. प्यूरिटन पंथीयांनी मॅसॅचूसेट्स उपसागर किनाऱ्यावर प्रथम आपली वसाहत केल्याने हे ‘उपसागर राज्य’ किंवा ‘प्यूरिटन राज्य’ म्हणून ओळखले जाते. याशिवाय ‘बेक्ड बीन स्टेट’, ‘ओल्ड कॉलनी स्टेट’ असेही या राज्याचे नामोल्लेख केले जातात. ‘मॅसॅचूसेट्स’ म्हणजे मोठ्या टेकडीवर किंवा टेकडीजवळ. ब्लू टेकड्यांमध्ये आणि बॉस्टनच्या परिसरात राहणाऱ्या मॅसॅचूसेट या इंडियन जमातीवरून राज्याचे हे नाव आलेले आहे. इंग्लंडमधील प्यूरिटन लोकांनी सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात मॅसॅचूसेट्स वसाहतीची स्थापना केली. भूवर्णन मॅसॅचूसेट्स भूमीवर अनेक टेकड्या व नद्यांची खोरी आढळतात. पूर्वेकडील अटलांटिक किनाऱ्यापासून पश्चिमेकडे प्रदेशाची उंची वाढत जाते. पूर्वेकडून पश्चिमेकडे राज्याचे पाच नैसर्गिक विभाग पाडता येतात : (१) अटलांटिक कोस्टल प्लेन : हिमनदीमुळे वाळूचे संचयन झालेल्या आग्नेयीकडील ‘केप कॉर्ड’ द्वीपकल्पाचा या विभागात समावेश होतो. (२) न्यू इंग्लंड सी बोर्ड लोलँड्स : अटलांटिक किनाऱ्यापासून अंतर्गत भागातील सु. ४८ किमी. पर्यंतच्या मंद उताराचा प्रदेश यात येतो. (३) न्यू इंग्लंड अपलँड्स : राज्याच्या मध्यवर्ती भागातील विस्तृत प्रदेशांचा समावेश यात होतो. या प्रदेशाची सरासरी उंची ३०५ मी. असून ती मध्यभागाकडे क्रमाक्रमाने वाढत गेलेली दिसते. पश्चिमेकडे कनेक्टिकट नदीखोऱ्यात उंची बरीच कमी झालेली दिसते. (४) ग्रीन मौंटन : यामध्ये कनेक्टिकट व हूसिक-हूसटॉनिक नद्यांमधील वनाच्छादित सुंदर, ओबडधोबड परंतु गोलाकर बर्कशर हिल्स आणि ग्रीन मौंटन ह्या डोंगराळ प्रदेशांचा समावेश होतो. ॲपालॅचिअन पर्वत आणि व्हर्माँटमधील ग्रीन मौंटनचा हा विस्तारित भाग आहे. (५) टॅकॉनिक हिल्स : हूसिक-हूसटॉनिक खोऱ्याच्या पश्चिमेस न्यूयॉर्क राज्याच्या सरहद्दीदरम्यान हा नैसर्गिक विभाग आहे. या रांगेतील मौंट ग्रेलॉक हे राज्यातील सर्वोच्च शिखर (१,०६४ मी.) आहे. नद्या राज्यात सर्वत्र नद्यांचे जाळेच निर्माण झालेले आढळते. उल्लेखनीय अशा १९ नद्या असून त्यांपैकी कनेक्टिकट, चार्ल्झ व मेरिमॅक या नद्या महत्त्वाच्या आहेत. उत्तर-दक्षिण दिशेत वाहणारी कनेक्टिकट ही राज्यातील सर्वांत मोठी नदी असून डिअरफील्ड, वेस्टफील्ड, चिकपी व मिलर्झ ह्या तिच्या मुख्य उपनद्या आहेत. पूर्वेकडील बर्कशर या डोंगराळ प्रदेशातून हूसटॉनिक ही दक्षिणेकडे, तर हूसिक ही उत्तरेकडे वाहणारी नदी आहे. राज्याच्या ईशान्य भागातून वाहणाऱ्या मेरिमॅक या नदीचा उगम न्यू हँपशर राज्यात असून या राज्याच्या ईशान्य कोपऱ्यात न्यूबरी पोर्टजवळ ती अटलांटिक महासागराला मिळते. नॅशूआ आणि काँकर्ड या तिच्या उपनद्या आहेत. चार्ल्झ व मिस्टिक या नद्या बॉस्टनजवळ मॅसॅचूसेट्स उपसागाराला मिळतात. चार्ल्झ नदीला अनेक नागमोडी वळणे असून या नदीने बॉस्टन व केंब्रिज ही शहरे वेगळी केली आहेत. राज्यातील पूर्वेकडील उंचवट्याच्या भागातून ब्लॅकस्टोन नदी वहाते. मॅसॅचूसेट्स राज्याला सु. ३,२०० किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. बॉस्टनच्या उत्तरेकडील किनारा खडकाळ असून तेथे अनेक छोटीछोटी बंदरे आहेत, तर दक्षिणेकडील किनारा वालुकामय असून तेथे काही खाडीसारखे भागही आहेत. धोकादायक अशा खडकांवर व ‘शोल’ वर अनेक ठिकाणी दीपगृह व बोये आहेत. किनाऱ्याजवळ अनेक बेटे असून त्यांपैकी एलिझाबेथ, मार्थाज व्हिन्यार्ड व नॅनटुकिट ही मोठी आणि महत्त्वाची आहेत. राज्यात सु. १,१०० पेक्षा अधिक सरोवरे किंवा तळी आहेत. नद्यांचे, सरोवरांचे व तळ्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झालेले आढळते. बऱ्याच सरोवरांची नावे खूपच मोठी आहेत. उदा., चारगॉग गॉन मॅन चॉग गॉग चॉबन अंगगमॉग किंवा चॉबन अ गंगमॉग सरोवर. या सरोवराच्या नावाचा अर्थ असा होतो की, ‘तुम्ही तुमच्या काठावर मासे पकडा, मी माझ्या काठावर मासे पकडतो, मध्यभागी कोणीही मासेमारी करावयाची नाही.’ क्वाबिन (१०१ चौ. किमी.) व वॉचूसिट हे येथील मोठे मानवनिर्मित जलाशय आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी क्वाबिनचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. वॉल्डन पाँड हे छोटेसे परंतु प्रसिद्ध तळे आहे. याशिवाय इतर अनेक जलाशय निर्माण करण्यात आलेले आहेत. हवामान समशीतोष्ण कटिबंधीय स्थानामुळे हवामान थंड आहे. उन्हाळ्यातील सरासरी तापमान २१° से., तर हिवाळ्यातील सरासरी तापमान -१° से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०७ ते ११७ सेंमी. असून तो वर्षभर सारख्या प्रमाणात पडतो. हिवाळ्यात हिमवृष्टी होते. किनाऱ्यावर अधूनमधून हरिकेनची निर्मिती होते. १९३८ व १९४४ मधील हरिकेन वादळे राज्याला फारच हानिकारक ठरली. मृदा राज्यातील मृदा सामान्यपणे कमी प्रतीची, वालुकामय व रेतीमिश्रित आहे. नद्यांच्या खोऱ्यात गाळाची सुपीक मृदा असून कनेक्टिकट खोरे हा राज्यातील सर्वांत सुपीक भाग आहे. किनाऱ्यावर हिमनदीच्या संचयनाचे बरेच प्राचीन अवशेष आढळतात. पीटयुक्त मृदेचे प्रमाणही बरेच आहे. खतांचा वापर करून जमिनीतून विविध प्रकारची पिके घेतली जातात. राज्यात महत्त्वाची खनिजे नाहीत. ग्रॅनाइट, संगमरवर, चुनखडक, चिकणमाती, वाळू, वालुकाश्म ह्या बांधकामासाठी उपयुक्त ठरणाऱ्या खनिजांचे साठे बरेच आढळतात. १९८२ मध्ये खनिजउत्पादन ८९० लक्ष डॉलर किंमतीचे झाले. स्त्रोत: मराठी विश्वकोश