वेशीवरच्या पाऊलखुणा : ढोऱ्या डोंगराची ओंडली इतरांच्या सुखासाठी स्वत:चा इतिहास पाण्याखाली घालणारी अनेक गावे आपल्या आजुबाजुला आहेत. जुनी घरे, मंदिरे, गाववेशी अन् वीरांच्या वीरगळींचा वारसा असं सर्वकाही धरणासाठी ठेऊन अनेक गाव डोंगराकडे सरकली. डोळ्यात अन् डोळ्यासमोर तरळणारं पाणी हाच एक इतिहास त्यांच्या कवेत दिसतो. ओंडली या गावाबाबतही असंच काहीस घडलं; मात्र ज्या डोंगरालगत हे गाव वसलं त्या ढोऱ्या डोंगराची त्याला भक्कम साथ मिळाली अन् अनोखा इतिहासही लाभला. अध्यात्म अन् महानुभवपंथीयांसाठी तपश्चर्येची पंढरी म्हंटले गेलेल्या ढोऱ्या डोंगराने ओंडलीकरांना नवी ओळख मिळवून दिली आहे. त्र्यंबकेश्वर ही अनेक संतांची तपोभूमी आहे. या तपोभूमीत पाऊल ठेवाताना भाविक जेवढे तल्लिन होतात तेवढेच पर्यटकही दररोजच्या दगदगीतून बाहेर येत निसर्गाच्या कवेत आनंद लुटतात. निसर्गसौंदर्याने इंच न इंच माखलेल्या पहिने-घोटी रस्ता अनुभवणे ही एक वेगळीच अनुभुती असते. पेगलवाडी, पहिने, काजोळी, मास्तरवाडीसारखे लहान लहान पाडे आपल्याला त्र्यंबकेश्वरची हद्द फिरवतात. याच रस्त्यावर म्हसुर्लीपासून इगतपुरी तालुका सुरू होतो. पुढे शेवगेडांग, वांजोळी, आहुर्ली व आवलीकडून सातुर्लीमार्गाने घोटीरोडवर वैतरणानगर फाटा लागतो. पेगलवाडी ते आवलीपर्यंत वळण, लहान लहान घाट अन् पाण्याची साथ आपल्याला अनोखी सफर घडवितो. मात्र ही सफर फक्त निसर्गसौंदर्याने बहरलेली नाही. तर त्याला एक अध्यात्मिक अन् तपश्चर्येचाही अद्भुत स्पर्श आहे. आवलीच्या थोडेपुढे गेल्यावर एक फाटा लागतो. सरळ रस्ता घोटीकडे जातो तर उजव्या हाताला वैतरणानगर रस्ता आपल्याला ओंडली गावाकडे घेऊन जातो. पेगलवाडी ते वैतरणानगर फाटा रस्त्यावरील लहान लहान पाड्याप्रमाणेच साठ-सत्तर घरांचं ओंडली हे गाव आहे. धरणासाठी डोंगरकुशाला आलेल्या या गावांचे सुखदु:ख सारखंच. तरीही कसलीही तक्रार नाही. त्याच्या दिनचर्येकडे पाहिलं की आपण उगाच जगण्याचं दळण दळतोय असं वाटायला लागतं. एखाद्या पाड्यावर डोंगरकुशीत असंच विसावं असं वाटायला लागतं. पण, इतिहासाला पारखा झालेला माणूस अस्वस्थ असतो हे निवृत्ती सखाराव राव व पंडित शिरसाट जेव्हा इतिहास हरविलेल्या ओंडलीबद्दल सांगतात तेव्हा ती अस्वस्थाता लक्षात येते. आताचे ओंडली वैतरणा डॅमच्या पाणथळावर वसलेलं होतं. १९७३ मध्ये स्थलांतरीत होताना फक्त मारूतीची मूर्ती घेऊन डोंगरकुशाला आलं. नव्यानं संसार थाटले अन् आता गावचा हरविलेला इतिहास पुन्हा नव्यानं निर्माण करण्यासाठी झुंजमुंज करीत आहे. गावाला फक्त आधार आहे तो ओंडली ज्या डोंगराच्या कुशीत पहुडलं त्या ढोऱ्या डोंगराचा. हा परिसर एक जंगलच आहे. त्यामुळे गावकरीही फारसे या डोंगराकडे फिरकत नाहीत. सरपणापुरते अन् गुरे चरायला तेवढा तो आधार ठरतो. ओंडली गावाकडून वैतरणा रस्त्याला थोड पुढं गेलं की डाव्या हाताला ढोऱ्या डोंगरपायथ्याला ठाकूरवाडी दिसते. आठ-दहा घरांची ठाकूरवाडी हा आदिवासीपाडा आहे. त्यांचं सर्वकाही ढोऱ्याच आहे. किसन गावंडेंच्या छोट्याशा घराबाहेर एक देवळी आहे अन् ती देवळी मातीने अन् झेंडूच्या फुलांनी सजविलेली दिसते. ठाकूर समाज दिवाळीत अशी सजावट देवळीला करते म्हणून त्याला दिवाळी म्हणतात. पणती लावण्यासाठीची ती जागा सजविण्याची ही अनोखी पद्धत आदिवासी समाजाचे अंतरंग उलगडते. ढोऱ्या डोंगराबद्दल गावकरी आदराने बोलताना दिसतात. येथे अनेक साधू येतात, खूप काळ थांबतात, असेही ते सांगतात. मात्र गावकरी कधीही डोंगरावर गेलेले नाहीत. दाट झाडीत हरविलेल्या ढोऱ्याचे हे गूढ त्यांच्या मनातही कायम आहे. ढोऱ्या म्हणजे वाघ. विदर्भात लक्ष्मीपूजनानंतर येणाऱ्या बलिप्रतिपदेला गायगोधन उत्सव साजरा केला जातो. गायीम्हशींना रंगरंगोटी करून हेल्यांना गावात मिरविले जाते. यावेळी प्रत्येकाच्या दारापुढे शेणाचा ढोऱ्या काढण्यात येतो. मिरवणूक प्रत्येक घरासमोर आली की घरासमोरील ढोऱ्याला हेल्याने नष्ट केले, असे मानले जाते. ‘हे हे हल्या, संबाळ, हल्या! गाव असा नि माणसं अशी, नातीगोती जडतंत कशी!’ अशी म्हणण्याची पद्धत येथे आहे. यावेळी बहुरूप्याचा खेळही होतो. यात मानवी वाघही नाचतो. या मानवी वाघाची रंगरंगोटी करताना रंगकामात पट्टेदार वाघ, ढोऱ्या वाघ, झेंडू वाघ, बिट्टु वाघ आदींचा समावेश असतो. यावरून ढोऱ्या म्हणजे वाघ याला पुष्टी मिळते. मात्र ओंडलीमध्ये असं कोणतं जनावर अथवा उत्सव होत नाही. तेथे फक्त साजरा होतो हनुमानाचा उत्सव. आमचं सगळं काही पाण्यात विसर्जीत झालयं, असे त्यांचे पाणावलेले डोळे सांगायला लागतात. मात्र ढोऱ्या डोंगराचा इतिहास आपल्याला आठशे वर्षे मागे घेऊन जातो. महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामींचा ‘लीळाचरित्र’ हा महाराष्ट्र संस्कृतीचे पदर उलगडणारा तसेच प्राचीन जीवनाचे चित्र चितारणारा आद्यग्रंथ आहे. या ग्रंथात श्रीचक्रधर स्वामींच्या सृष्ट्युत्पत्तीच्या मीमांसेचे दिव्य दर्शन घडते. तसेच साधकांच्या साधनेस उपयुक्त अशा ‘विकास विकल्प शून्य: स्वभावमात्रे: निरालंबी: देवता स्मरणे: जो जन्मक्षेपी: तयासी परमेश्वरू पुनरपी आपुला संबंध देति:’ हे साधकाने निष्ठेने आचरावयाच्या आचार सूत्राचे, ‘असतीपरी’चे, सुलभ तितकेच मोलाचे मार्गदर्शन करते. चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्राच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली ती प्रथम आचार्य श्रीनागदेवाचार्यांच्या प्रेरणेने अन् प्रकांड पंडित श्री महिंद्रभट्टांच्या प्रयत्नांतून. श्रीनागदेवचार्य हे चक्रधरांचे पट्टशिष्य व पंथाचे पहिले आचार्य. तर वैराग्यदेव उर्फ आचार्य परशरामबासा हे श्रीनागदेवचार्यांचे पुत्र. आपल्या संस्कृतीत भोगापेक्षा त्यागाला अधिक महत्त्व आहे म्हणून महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटले जाते. यात सर्वच संतांनी परमेश्वराला आपलेसे करण्यासाठी मोक्षालाही प्रचंड महत्त्व दिले आहे. त्यामुळे चक्रधरस्वामींनी म्हटले,‘साकर होईजे ते निके: की साकर अनुभवीजे ते नीके:’ म्हणजे साखरेची गोडी अनुभवावयाची असेल तर साखर होऊन कसे चालेल? त्यासाठी साखरेपेक्षा वेगळेच असावे लागेल. मात्र मोक्ष मिळविण्यासाठी श्रीचक्रधरांनी आचरण व त्यागाशिवाय परमेश्वराची प्राप्ती होत नाही हे सांगताना यासाठी सर्व संग परित्याग करून संन्यास घेणे, देहदमन, इंद्रियदमन, मनोदमन करून परमेश्वर विहित आचार धर्माचे पालन करणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे. म्हणून ते म्हणतात, ‘ज्ञानेविन वैराग्य काइ करावे बापेया?’ म्हणजेच स्वामींनी वैराग्यासाठी ज्ञानाची आवश्यकता सांगितली आहे. हेच ज्ञान मिळविलेल्या वैराग्यदेवांनी आपले वडिल श्रीनागदेवाचार्यांकडे मोक्ष मिळविण्यासाठी ढोऱ्या डोंगरावर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा श्रीनागदेवाचार्यांनी हे मोक्ष मिळविण्याचे वय नव्हे, असे म्हणत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या स्वामींनी दिलेले शिकवणीकडे दुर्लक्ष कसे करू असे म्हणत त्यांनी वडिलांना नि:शब्द केले अन् ढोऱ्या डोंगरावर तपश्चर्या करून अंतिम चर्या करीत मोक्ष मिळविला. ही घटना १२३४ मधील असून, तेव्हा वैराग्यदेवाचे वय अवघे १३-१४ वर्षे होते. गेल्या ७८२ वर्षापासून महानुभवपंथातील अनेक विभूतींनी मोक्ष मिळविण्यासाठी ढोऱ्या डोंगरावर अंतिम चर्या करीत तेथेच देह ठेवला. आजही ढोऱ्या डोंगरावर अस्थीपंजर (सापळे) सापडतात, अशी माहिती महानुभाव पंथाचे अभ्यासक प्रा. बाळकृष्ण अंजनगांवकर यांनी दिली. ढोऱ्या डोंगर अनुभवतानाही हाच अनुभव आला. स्मृतिस्थळातील आचार मालिकेत ढोऱ्या डोंगराचा उल्लेख ‘वृषभाख्य’ असाही केलेला आहे. `देशाच्या शेवटा: झाडाच्या तळवटा: देऊळाचा कोणटा: इए तिन्ही सेऊनि असावे’ असा उल्लेख चक्रधर स्वामी मोक्षासाठी स्थानाची निवड कशी करावी याबाबत केला आहे. आचारबंदात देशाचा शेवट याचे विश्लेषणात म्हटले आहे की, `शेवट म्हणजे श्रीनगर: (आताचे सिन्नर) जुन्नर: कल्याण: खांदार: तीन भाग मऱ्हाट तो सेवट:’ या भाष्यात आलेल्या श्रीनगर (सिन्नर) परीक्षेत्रात ढोऱ्या डोंगराचा समावेश होतो. एकेकाळी अकोला (जि.नगर) मार्गे येणारे साधक सिन्नर, पांढुर्ली, नांदगांव बु., मुकणे मार्गे ढोऱ्या डोंगराकडे येत असत. चक्रधर स्वामी म्हणतात, मोक्षासाठी ढोऱ्या डोंगरावर म्हणजेच कैवल्यगढावर जाताना ‘बाई:ऐसाकवण मायेचां पोटी उपजैल जो देशावरि खांडे काढौनि जाये:’ म्हणजेच खांडे काढून म्हणजे जीवावर उदार होऊ आचरणासाठी (तपश्चर्येसाठी) देशावरी म्हणजे देशाच्या शेवटी जाऊन राहील,’ असा मनोनिग्रह करणारा कोण पुरूष निर्माण होईल? ढोऱ्या डोंगरावर तपश्चर्येला जाणे म्हणजेच देशरक्षणासाठी रणांगणात जाण्यासारखे आहे, असेही ते सांगतात. वैराग्यदेवानंतर अचलमुरारी (शके १३१४) व्यास व त्यानंतर वैद्य दत्तोबास (शके १३५४) यांनी ढोऱ्यावर देहत्यागापर्यंत तपश्चर्या केली आहे. ३-३ वर्षांची ३ वेळात चर्या करता येते. यादरम्यान जर मोक्ष मिळाला नाही तर चौथी चर्या करायची नसते. अशावेळी त्या विभूतीने पंथ व पंथ संघटनेसाठी आयुष्य व्यतीत करावे, असेही चक्रधरस्वामींनी म्हटले आहे. ईश्वरप्राप्तीसाठी वैराग्याचरण करीत काटीतळी देह सुकविण्याचे अवघड आचरण श्री कवीश्वरभास्कर भट्ट बोरीकरांनी केलेले वर्णन स्मृतिस्थळात आल्याचेही प्रा. अंजनगांवकर यांनी सांगितले. आजही ढोऱ्या डोंगरावर तपश्चर्येसाठी साधू महंत तेथील गुहांमध्ये राहतात. ठाकूरवाडीकडून ढोऱ्या डोंगरावर तपश्चर्येसाठी आलेल्या साधूंच्या कुटीपर्यंत जाता येते. डोंगराच्या कपारीत तपश्चर्येसाठी लहान लहान अशा तीन-चार गुहा असल्याचे साधू सांगतात. इगतपुरीतील पंचकृष्ण ज्ञान प्रबोधन अभियान संस्थेतर्फे २००१ पासून ढोऱ्या डोंगराचे तसेच महानुभपंथाचे माहात्म्य समाजासमोर यावे यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सामुदायिक प्रायश्चित विधी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ढोऱ्या डोंगराचे माहात्म्य अजूनही ओंडलीकरांपासून अज्ञात असले तरी हा डोंगर त्यांना जगण्याची आस देतो, असे ते आवर्जून सांगतात. महानुभाव पंथीयांसाठी ढोऱ्या मोक्ष मिळविण्याचे ठिकाण असल्याने त्याचे महत्त्व त्यांच्यासाठी अनन्यसाधारण आहे. कोणाला जगण्याचे तर कोणाला मोक्षाची अनुभुती देणारा ओंडलीचा ढोऱ्या मनात घर करून जातो. ही जागा खरंच खूप शांत अन् मन तपश्चर्येत तल्लिन करणारी आहे. आपण जगण्यासाठी जगतो की दररोज एक ध्येय समोर असतं म्हणून जगतो याचे उत्तर आपल्याला ढोऱ्या डोंगर देऊन जातो. लेखक : रमेश पडवळ