दोस्तांनो, आपली पूर्व विदर्भातील भटकंती आता भंडारा जिल्ह्याकडे वळवुयात. भंडारा-तलावांचे सौंदर्य, धानाचे भांडार, घनदाट हिरवीगार वनराई, सैबेरीयन पक्षांचे गुंजन, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक तथा अध्यात्मिक स्थळे आणि तुती-रेशिम उद्योगाचे आकर्षक फलित असलेल्या कोषाच्या आकर्षक साड्या अशा एक ना दोन अनेक वैविध्यांनी नटलेल्या भंडारा या पूर्व विदर्भातील जिल्हाची आपण भ्रमंती करूयात ! भंडारा शहर प्राचीन काळापासून भंडारा शहरात अंबाबाई, पिंगळाई व निंबाई देवीची हेमाडपंती शैलीची मंदिरे आहेत. येथील कोरंभी देवीच्या दर्शनासाठीही बरेच भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. भंडाऱ्यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले आहे. येथील खांब तलाव म्हणून ओळखला जाणारा तलाव त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या खांबाकरीता प्रसिद्ध आहे. भंडारा शहरात छत्रनाथ गोसावी उर्फ अलोन बाबा यांनी स्थापन केलेला मठ आहे. अलोन बाबा मीठ खात नसल्यामुळे आजही त्यांचे अनुयायी येथे मीठ न खाण्याचा नियम मोठ्या भक्तीभावे पाळताना आढळतात.रावणवाडी येथील १०० वर्षे जुने राममंदिर असून या देवळात आजही भाविकांची गर्दी होते. चौण्डेश्वरी देवी मंदिर भंडाऱ्यापासून २० कि.मी. अंतरावर मोहाडी येथे श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या तीरावर वसलेले चौंडेश्वरी देवीचे मंदिर हे भक्तांचे विशेष आकर्षण ठरते ते नवरात्रीच्या काळात. इंग्रजांच्या काळापासून स्थित हे मंदिर भक्तांना आजही मोहिनी घालते ते तेथील रम्य परिसरामुळे. मंदिरासभोवतालचे मोठे आणि स्वच्छ प्रांगण.... रंगीबेरंगी फुलांनी बहरलेले आवार.... मन प्रसन्न करते. आंतरराष्ट्रीय ख्यातिचे शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे कला विशेषज्ञ प्रा.प्रमोद रामटेके यांनी आपल्या अजरामर कलेतून साकारलेले मातेचे आकर्षक डोळे अत्यंत सजीव आणि बोलके भासतात ! अंबागड किल्ला अंबागड किंवा 'आंबागड' हा भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात असणारा किल्ला सातपुडा पर्वतश्रेणीत एका डोंगरावर वसलेला आहे. हा तुमसरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पश्चिम दिशेस आहे.तुमसर सिवनी रस्त्यावरील गायमुख फाट्याने गेल्यास येथे पोचता येते. या किल्ल्याचा विस्तार सुमारे १० एकर परिसरात आहे.या स्थानाचे सामरिक महत्त्व जाणून, गोंड राजा बख्त बुलंद शहा याने येथे अंदाजे १,५०० फूट उंच डोंगरावर हा किल्ला बांधला. हा सुमारे इ.स. १७०० च्या सुमारास बांधला गेला असे म्हणतात. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा हा किल्ला दुर्लक्षिला गेलाय तो तेथील दुर्गम अशा ठिकाणामुळे. पवनी जिल्ह्यातील पवनी हे ठिकाण ‘पद्मावती नगरी’ म्हणून ओळखले जात असे. वैनगंगेच्या काठावर असलेले हे ठिकाण बौद्ध धर्मियांचे महत्त्वाचे क्षेत्र असून तिथे बौद्धकाळातील स्तूप आहे. तिथे कऱ्हाडा आणि बालसमुद्रथ असे दोन तलावही आहेत. सिंधपुरी बौद्धविहार हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असून येथील सांगडी किल्ला व चांदपूरचा तलावही प्रसिद्ध आहेत.पवनी तालुक्यातील अड्याळ येथील श्रीहनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. चैत्र शुद्ध नवमीला येथे यात्रा भरते व ही यात्रा घोड्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. पवनी येथेच आद्यकवी मुकुंदराज यांचे स्मारक आहे. माडगी बेट चारही बाजूंनी पाणी आणि मधोमध स्थित असा रम्य भूभाग ! अर्थात बेट. वैनगंगा नदीच्या पात्रात माडगी हे बेट निर्माण झाले आहे. येथे प्राचीन नृसिंह मंदिर असून येथे कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. कोका कोका हे जंगलात वसलेले प्रसिद्ध स्थळ आहे. या ठिकाणी भेट देण्याचा उत्तम कालावधी म्हणजे गोड गुलाबी थंडीचा डिसेंबर आणि जानेवारी महिना ! येथे डिसेंबर महिन्यात सैबेरियामधून येणारे पक्षी थंडीतील स्थलांतरादरम्यान येतात व जानेवारीच्या मध्यास परत जातात. अशा निराळ्या पक्षी दर्शनाचा आनंद घ्यायचा असेल तर हिवाळ्यात अवश्य भेट द्यावी आणि आपल्या सुसज्ज कॅमेऱ्यात सुंदर पक्ष्यांची क्षणचित्रे टिपुन घ्यावी. पवनी किल्ला भंडारा जिल्ह्यात पवनी तालुका असलेला पवनीचा प्रसिद्ध किल्ला, भंडाऱ्या पासून ४७ आणि नागपूर पासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. गावात शिरतानाच आपले स्वागत करतो तो पवन राजाचा किल्ला. त्यावरूनच पवनी हे गावाचं नाव पडलं आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता ह्या किल्ल्याच्या दरवाजातूनच जातो. हा किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे. किल्ल्याची एक भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला तलाव गावात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेतात. पवनी हे हीनयान पंथाचे आराधना केंद्र होते. अशोकाच्या काळात ते वैभवशाली बनले. सम्राट अशोकाचे येथे काही काळ वास्तव्य होते. त्याने मुलगी संघमित्रा हिला येथूनच श्रीलंकेला पाठवले, असे इतिहास सांगतो. दुसऱ्या उत्खननात इ.स. पूर्व पहिल्या शतकातला क्षत्रपकुमार रूपीअम्माचा स्तंभलेख (सध्या नागपूरच्या वस्तुसंग्रहालयात आहे.) आढळला. रूपीअम्मा हा कुषाणाचा क्षत्रप होता. त्याला सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीने पराभूत केले. या विजयानंतर त्याने नाशिक येथील गुहालेखात ‘वेनाटक स्वामी’ असे स्वत:ला संबोधले आहे. १९९४ मध्ये भारतीय पुराणवस्तू संशोधन विभागाचे डॉ.अमरेंद्रनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन झाले. यात इ.स.पूर्व १५०० पर्यंतचा इतिहास उपलब्ध करणारे सोन्याचे अलंकार, तांब्याची भांडी, पायऱ्यांच्या विहिरी, केशविन्यास करणारी महिलेची मूर्ती, अरब देशाशी व्यापार झाल्याचे स्पष्ट करणाऱ्या वस्तू आढळल्या. डॉ.मिराशी यांना हरदोला टेकडीच्या पश्चिमेस उत्खननात राजा भगदत्त यांचा शिलालेख मिळाला. उत्खनन काळात या प्रतिनिधीने डॉ.अमरेंद्रनाथ यांची भेट घेतली असताना ते म्हणाले होते, ‘इतका प्राचीन, सुरक्षित, अभंग किल्ला महाराष्ट्रात नाही.’ उत्खननात मिळालेले ‘अरेबियन पत्थर’ पवनीचा समुद्रमार्गाने अरब देशांशी व्यापार तर, हाडांपासून बनवलेल्या सुया, २३०० वर्षांपूर्वी वीणकामात हे क्षेत्र अग्रणी होते, हे दर्शवतात. असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला...अनेक राजवटींचा सहवास अनुभलेला पण आजच्या घडीला काहीसा दुर्लक्षित पवनीचा किल्ला एकदा तरी अवश्य मनाच्या नरेतज सामावून घ्यावा असाच ! सहानगड / सांगडी किल्ला भंडारा जिल्ह्यातील साकोली हे तालुक्याचे ठिकाण असून ते पुरातन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. किल्ल्याला सहानगड हे उपनाव आहे, स्थानिक बोली भाषेत सां म्हणजे लहान आणि गडी म्हणजे किल्ला या शब्दफोडीने सांगडी हे किल्ल्याचे नाव पडले.वैनगंगेच्या काठावर असलेले हे ठिकाण बौद्ध धर्मियांचे महत्त्वाचे क्षेत्र आहे. तिथे बौद्धकाळातील स्तूप आहे. कर्हाडा आणि बालसमुद्र या नावाचे दोन तलावही आहेत. सिंधपुरी बौद्धविहार हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथील सांगडी किल्ला, चांदपूरचा तलावही प्रसिद्ध आहे.सांगडी गावात प्रसिद्ध पुरातन मंदिरे आहेत त्यात २१ हनुमान मंदिरे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि रामदास स्वामींचा मठ पाहण्यासारखा आहे. औद्योगिक वसाहती भंडारा जिल्ह्यात गाडेगाव व तुमसर येथे औद्योगिक वसाहती असून जवाहरनगर येथे युद्धसाहित्य निर्मितीचा कारखाना आहे. भंडारा जिल्ह्यातील अतिशय जुने उद्योग म्हणजे तेंदूच्या पानांपासून विड्या बनविणे, धातुंची व तांब्या-पितळ्याची उपयुक्त भांडी बनवणे व त्या भांड्यांवरील कलाकुसरही वाखाणण्याजोगी असते. जिल्ह्यातील नद्या व तळ्यांमधील मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते. जंगलांमुळे लाकूड कटाई, बांबूपासून टोपल्या व चटई तयार करणे असे उद्योगही चालतात. कोसा या प्रकारचे रेशीम तयार करून कापड तयार करण्याचा व्यवसाय प्रसिद्ध आहे. कौले व विटा तयार करणे, हातमागावर कापड विणणे असेही व्यवसायचालतात. भात गिरण्या किंवा धान गिरण्या जिल्ह्यात सर्वत्र विखुरलेल्या आहेत. जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात देव्हाडा येथे वैनगंगा सहकारी साखर कारखाना आहे, तर तुमसर रोड येथे कागद निर्मिती कारखाना आहे. मँगनीज शुद्धीकरण, पोलाद उद्योग असे महत्त्वाचे उद्योगही जिल्ह्यात चालतात. गेल्या दशकात पोलाद उद्योगासाठी,अनेक मोठ्या कंपन्या जिल्ह्यात स्थापन झाल्या आहेत. भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीमुळे शेतीला सिंचनासाठी पाणी मिळते. तसेच मासे व झिंग्याच्या व्यवसायातून मासेमारी कुटुंबांचा चरितार्थ चालतो. उच्च प्रतीचे मँगनीजचे साठे याच जिल्ह्यात आहेत. तलावांचा व भात उत्पादक जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. टसर रेशमापासून साड्या व अन्य वस्त्रांचे पारंपरिक पद्धतीने विणकाम करण्यात येथील विणकरांचा हातखंडा आहे. जंगलातील वन व रेशिम विभागाच्या जमिनीवर असलेल्या ऐन व अर्जुन वृक्षावर टसर अळ्यांचे संगोपन करुन त्यापासून कोसा तयार करण्यात येतो. रेशिम उद्योग - रेशमी वस्त्र रेशमी साड्या मन मोहून टाकतात. या अत्यंत किचकट अशा व्यवसायात भंडारा अग्रेसर दिसतो. येथील टसर आणि कोसा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. निष्टी आणि दवडीपार ही दोन ठिकाणे रेशिम उद्योगासाठी प्रसिद्ध ! निष्टी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात निष्टी हे गाव आहे. या गावातील मासेमारी करणाऱ्या ११५ कुटुंबांनी रेशिम विभागाच्या ६०० हेक्टर जमिनीवर रेशीम व्यवसाय सुरु केला असून या व्यवसायात त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. मागील १५० वर्षांपासून ही कुटुंबे पिढीजात कोषाचे उत्पादन करीत आहेत. मासेमारी सोबतच रेशीम शेतीने त्यांना पुरक व्यवसाय उपलब्ध झाला आहे. कोष निर्माण करण्याची प्रक्रिया अवघड असली तरी चिकाटीने परिश्रम करुन मोठ्या प्रमाणात रेशीम कोष उत्पादन घेतले जात आहे. दवडीपार महाराष्ट्रातील एकमेव टसर बीज उत्पादन केंद्र भंडाऱ्यापासून १४ कि.मी. अंतरावर पवनी मार्गावर दवडीपार येथे आहे. २१६ हेक्टर क्षेत्रामध्ये असलेल्या या प्रकल्पात टसर अळीची अंडी उबवणे, अंड्यातून जन्माला येणाऱ्या अळ्यांची अर्जुन व ऐन वृक्षावर जोपासना करुन कोसा तयार करण्यात येतो. दवडीपार येथील केंद्रीय रेशीम बोर्डाच्या ‘बुनियादी बीज प्रगुणन एवं प्रशिक्षण केंद्र’ येथे उत्पादित होणाऱ्या अंड्यांचा पुरवठा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, नाशिक, पुणे, रायगड व रत्नागिरी येथे टसर रेशिमाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयामार्फत अनुदानावर केला जातो. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील शेतकरी टसर रेशीम शेतीकडे आकृष्ट झाला पाहिजे यासाठी केंद्रीय रेशीम बोर्डाच्या सहकार्याने आणि पुण्याच्या बायफ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे ज्यात दवडीपारचा रेशीम उद्योजक आणि शेतकरी महत्त्वाची भूमिका बजावत आहे !अशा या वैविध्यपूर्ण भंडारा या पूर्व विदर्भातील तलावांच्या आणि भात-मास्याच्या जिल्हाला अवश्य भेट द्या ! संकलन - तृप्ती अशोक काळे स्त्रोत - महान्युज