वेशीवरच्या पाऊलखुणा : कविश्वर जयरामांचे गाव : मार्कंड पिंप्री सह्याद्रीच्या तीन मुख्य रांगा, तर ११ उपरांगांमध्ये दडलेले किल्ले नाशिक जिल्ह्यात एखाद्या वृक्षाच्या फांद्यांप्रमाणे पसरलेले आहेत. या प्रत्येक किल्ल्याला अन् या रांगांना एक इतिहास आहे. यांच्यात ऐश्वर्य, बुद्धिमत्ता अन् जगण्याचा प्राणवायू दडला आहे. त्यामुळे त्यांच्यामागे ऐश्वर्यसंपन्न इतिहास आहे. मार्कंड किल्ला अन् त्याच्या पायथ्याचे मार्कंड पिंप्री गाव याच्याच पाऊलखुणा दाखवितात. शहाजी महाराजांच्या दरबारातील कवीश्रेष्ठ जयराम पिंडें याच गावचे. मात्र चारशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या खाणाखुणा पूर्णपणे मिटल्या असल्यातरी येथील हेमाडपंती मंदिर तो इतिहास जागा करतो. हा परिसर ऐतिहासिकच नाही तर निसर्गरम्य आणि आदिवासी समाजाचे अनेक पैलू उलगडणाराही आहे. म्हणूनच हा कवी अन् शहाजी महाराजांपर्यंतचा त्यांचा प्रवास भावतो. नाशिक-नांदूरी (संप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याचे गाव) हे ७० किलोमीटर अंतर आहे. नांदूरीत गेल्यावर गडाकडे न जाता पुढे तीन किलोमीटर गेल्यावर उजव्या हाताला मार्कंड पिंप्रीची कमान आपले स्वागत करते अन् तेथून पाच किलोमीटर आत गेल्यावर मार्कंड पिंप्री गाव लागते. हा प्रवास निसर्गरम्य आहे; कारण आपण सप्तश्रृंगी गडाच्या मागे म्हणजे अगदी देवीच्या समोर येऊन उभे राहतो. मार्कंड प्रिंपीला मार्कंड म्हणण्यामागे एक कारण म्हणजे या गावाच्या हद्दीत मार्कंड किल्ला येतो. त्यामुळे गावचे नावही मार्कंड. किल्ल्याला मार्कंड असे नाव पडले याबाबत पुराणात असे म्हटले जाती की, मार्कंडेय किल्ल्यावर मार्कंड ऋषींचे वास्तव्य होते. मार्कंडेय ऋषी सप्तशृंगी मातेला रोज स्तोत्रे आणि पुराणे ऐकवत असत. त्यामुळे या किल्ल्याला धार्मिक महत्त्वही आहे. या किल्ल्यावर मार्कंड ऋषींचे छोटेखानी मंदिरही आहे. मंदिरात मार्कंड ऋषींची मूर्ती आहे. मंदिराचे प्रवेशद्वार व संतश्रृंगी मंदिराचे प्रवेशद्वार एकाच रेषेत असल्यासारखे वाटतात. मात्र, पिंप्री कशामुळे म्हटले गेले हे मात्र उलगडत नाही. जवळच खालच्या बाजूला पाले पिंप्री गावही आहे. बहुतेक मार्कंड किल्ल्याशी संबंधित लोक मार्कंड पिंप्रीत राहात असावीत अन् मजूरमंडळींची पाले खालच्या पिंप्रीत असावीत म्हणून अशी रचना असावी, असा अंदाज येथील भौगोलिक रचनेवरून बांधता येतो. मात्र सध्या दोन्ही गावात आदिवासी समाज राहतो. नांदूर रस्त्यावरील गावाच्या कमानीवर अतिप्राचीन हेमाडपंती शिवमंदिर असे लिहिले असल्याने येथून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधले जाते. मात्र हे मंदिरच गावचे एकमेव वैशिष्ट्य नाही, तर इतिहासात सुर्वणाक्षरात नाव कोरलेल्या राजा गोविंद, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडिल शहाजी राजांच्या दरबारातील कवीश्रेष्ठ जयराम पिंडे व मार्कंड किल्लाही या गावाची वैशिष्ट्ये आहेत. मार्कंड किल्ल्याची इतिहासातील कामगिरीची फारशी माहिती मिळत नाही. किल्ला म्हणण्यासारखे येथे आता काहीच नाही. मात्र, इतिहासात नक्कीच मोठी कामगिरी या किल्ल्याने पार पाडली असावी,असा अंदाज मोडकळीस आलेला किल्ल्याचा दरवाजा, बुरूज व तटबंदीवरून करता येतो. येथे गुहा व पाण्याच्या टाक्याही आहेत. ही तप करण्याची जागा असावी, असे वाटते. इ. स. ८०८ मध्ये तिसरा गोविंद राष्ट्रकूट याने चांदूर पर्वतश्रेणीतील मार्कंड गडावरून काढलेल्या ताम्रपटात या किल्ल्याचा उल्लेख आला आहे. राजा गोविंद ताम्रपटात या किल्ल्याला मयूरखंडी म्हणतो. यावरून मार्कंड किल्ल्याला मयूरखंडी असेही नावे होते हे लक्षात येते. तर मार्कंड किल्ल्याचा अजून एक उल्लेख आढळतो तो शके १५८० (म्हणजे इ. स. १६५८) दरम्यान जयरामपिण्ड्येकृत ‘राधामाधवविलासचंपू’ या ग्रंथात. कवी जयराम म्हणतात, ‘महाराष्ट्रदेशादागत्य प्राह, महाराष्ट्रदेशादागतो जयरामो नाम कवीश्र्वर’ यात कवी आपण महाराष्ट्र देशाहून शहाजीमहाराजांच्या सान्निध्यात आल्याचा उल्लेख या ओळींमध्ये करतो व पुढे म्हणतो, ‘जामदग्नि र्वत्सगोत्रसंभव: पिंड्योपनामको जयरामो नाम कवि:’ यात काव्य कर्त्यांचे नाव जयराम, आडनाव पिंड्ये, गोत्र जामदग्निवत्स अशी स्वत:बद्दल माहिती देतो. ‘मार्केडेयाहिंवतादिसप्तपर्वताध्यक्षतां अविरतं वितन्यमानो गंभरराय इत्याभिधाप्रसिद्ध: स्वामिभि र्नयनपथं नीत: भविष्यति, चंडीपर्वतपुरतो मार्केडेयोस्ति पर्वतो विपुल: तत्रोद्भवेन जयरामेण’ यात कवी म्हणतो, सप्तशृंगीच्या समोरील मार्केंड्याच्या डोंगराखाली या कवीचे गाव होते. कवीच्या आईचे नाव गंगाबा व बापाचे नाव गंभीरराव. मार्कंडेयपर्वतापासून अहिवंतपर्वतापर्यंत जे सात किल्ले आहे. त्याचे अध्यक्षत्व म्हणजे किल्लेदारी या गंभीररावांकडे होती, अशी माहिती कवी जयराम येतो. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज निजामशाहीत राज्य विस्तारात गुंतले असताना त्यांच्या संपर्कात गंभीरराव आले असावेत. यामुळे नाशिकचे हे पिंड्यांचे घराणे भोसल्यांच्या परिचयाचे झाले. शहाजीराजांनी कर्नाटकांत बंगळूरप्रांतात राज्यस्थापना केली. यावेळीही शहाजीराजांनी साहित्य आणि कला यांची जोपासना केली. त्यांचा दरबार कवी आणि कलावंत यांचं हक्काचं आश्रयस्थान होता. यादरम्यान, मार्केंडपर्वतनिवासी असलेले जयराम कवी त्यांच्या आश्रयाला गेल्याचा उल्लेख जयरामांनी आपल्या कवितांमधून करतात. मात्र हा प्रवास सोपा नव्हता. शहाजीराजांनी त्यांना आपल्या दरबारात आश्रय देण्यापूर्वी त्यांची कठीण परीक्षा घेतल्याचे जयराम सांगतात. यात अव्वल ठरल्याने त्यांना कविश्वर ही पदवी देण्यात आली असावी. जयराम यांनी ‘राधामाधव विलासचम्पू’ नावाची कलाकृती निर्माण केली. या काव्यात त्यांनी शहाजीराजांसंबंधी दिलेली माहिती आवर्जून वाचावी अशी आहे. शहाजीराजांच्या दरबारात ३५ कवी होते. त्या सर्वांची नावेही जयराम पिंडे यांनी नोंदविल्याने शहाजीमहाराजांच्या कलासक्त असण्याचा पुरावा मिळतो. जयराम पिंडे आपल्या ‘पर्णालपर्वतग्रहण आख्यान’ या संस्कृत ग्रंथात सांगतात, येथून राजगडास जाऊन मी (स्वतः कविश्वर जयराम पिंडे) यांनी शिवछत्रपतींचे दर्शन घेतले. यावरून कवी जयराम छत्रपती शिवाजी महाराजांच्याही संपर्कात असल्याचे दिसते; मात्र त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल फारसे लिहिलेले नाही. मात्र, त्यावेळच्या अनेक नोंदी इतिहास जागा करायला उपयोगी ठरतात. मे १६७२ पर्णालपर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. अशा अनेक लहानसहान नोंदींमुळे नाशिकचा हा कवी इतिहासात अजरामर झाला आहे. मार्कंड पिंप्री हे गाव पाहताना या राजकवीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मार्कंडगावात एक भव्य हेमाडपंती मंदिर आहे. हे मंदिर ११ अथवा १२ व्या शतकातील असावे असा अंदाज बांधता येतो. मंदिरातील दालन नक्षीकामाने सजलेले खांब व मूर्तीने सजले आहेत. मंदिराचा घुमट कोसळला आहे. मात्र, गर्भगृह अजून जसेच्या तसे आहे. त्यात पिंड असून, मंदिराबाहेर पिंडीकडे पाहणारा नंदी आहे. मंदिराच्या आजूबाजूला मंदिराचे अवशेष विस्कळीत पडले आहेत. मंदिरासमोर दोन कुंड आहेत. मंदिरातील पिंडीमागे एक लहानशी घळ असून, त्यात पाणी साचत असते. भर उन्हाळ्यातही हे पाणी कमी होत नाही. यातील पाणी कुंडांमध्ये जाते. त्यामुळे ग्रामस्थांना सध्या दुष्काळातही या प्राचीन मंदिराच्या पाण्याचा आधार आहे. या मंदिरासमोर आणखी एक शिवमंदिर आहे. याचीही मोठ्याप्रमाणात पडझड झालेलेली आहे. मंदिरातील पिंड मात्र दक्षिणमुखी आहे. ही पिंड नंतरच्या काळातील असावी, असेही वाटते. या मंदिराबाहेर दगडात सूर्ययंत्र कोरलेले होते. याच्या अभ्यासासाठी येथे ऋषीमुनी येत असे म्हटले जाते. मात्र काही वर्षांपूर्वी ते तेथून कोणीतरी पळविल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात आदिवासी समाज असल्याने त्यांच्या संस्कृतीच्या खाणाखुणाही आजूबाजूला अनुभवता येतात. लहान मोठ्या विरगळ, तसेच चिराही येथे पहायला मिळतात. येथील कोकणा आदिवासींमध्ये मृत्यूनंतर तोंडदाखविण्याचा कार्यक्रम पूर्वी केला जायचा मात्र आता ही परंपरा बंद झाली आहे.मार्कंडऋषींचे गाव, बाराव्या शतकातील प्राचीन मंदिरांचे गाव, राजा गोविंद यांचे गाव, आठ आठ किल्ल्यांच्या किल्लेदार असलेल्या गंभीरराव यांचे गाव, जयराम पिंडे या कवीचे गाव, आदिवासींच्या लोकपरंपरांचे हे गाव अनुभवताना अंगावर काटा येतो. या गावांचे हे वेगळेपणही ठळकपण समोर येण्याची गरजही व्यक्त होते. लेखक : रमेश पडवळ