आपलं दैनंदिन जीवन आज अतिशय घाई-गडबडीचं, दगदगीचं आणि मन- शरीर थकविणारं अस झालेलं आहे. निवांतपणा म्हणून फारच कमी वेळ वाट्याला येतो. मन प्रसन्न व प्रफ्फुलित असल की शरीरसुद्धा उत्साही असत. तेच-तेच दैनंदिन व रुटीन आयुष्याचा कंटाळा आला की मग आपण प्रवास-पर्यटनासाठी बाहेर पडतो. व्यक्तिपरत्वे पर्यटनासाठी विविध ठिकाण असू शकतात. पण सर्वांना भावेल किंबहुना अगदी लहान बालमित्रांपासून अबाल वृद्धांपर्यंत सर्वमान्य होईल अस ठिकाण सिंधुदुर्गात आहे. निसर्गाची निरव शांतता, मन प्रसन्न करणारी हिरवाई, खाडीचं शांत व निळशार पाणी, विविध प्रकारचे बगळे, पक्षी यांच दर्शन, सदाहरीत असलेलं कांदळवन याची अनुभूती घ्यायची असेल तर वेंगुर्ला बंदरा अलिकडे जुन मांडवी बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी आपल्याला भेट द्यावी लागेल. पण एक मात्र नक्की की या मांडवी खाडीतील कांदळवनाची सैर आपण जर अनुभवली तर ही कांदळवनाची सैर आपल्या आयुष्यातील एक सुखद आठवण बनून राहील हे मात्र नक्की...

मांडवी खाडीतील कांदळवन

मांडवी खाडीत भरगच्च अस कांदळवन बहरलेलं आहे. कांदळवनामुळे सागरी अन्न साखळी अधिक मजबूत होते सुनामी किंवा वादळी वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणावर अडविण्यास मदत होते. जलचर सृष्टीतील विविध जलचरांना (खेकडा विविध प्रकारचे मासे) याबरोबर विविध प्रकारच्या पक्षांनी (बगळे, स्विफ्ट, कावळे, घार, किंगफिशर, हॉर्नबील वगैरे) अन्नसाखळीस पोषक वातावरण यामुळे तयार होत. वेंगुर्ला येथील स्वामिनी महिला बचत गटाने मांडवी इको टुरीझमच्या माध्यमातून ही कांदळवनाची सैर सुरु केली आहे. यु. एन. डी. पी. च्या माध्यमातून या बचत गटाला तीन लक्ष रुपयांच्या दोन बिगर यांत्रिकी नौका, वीस लाईफ जॅकेट अस सहाय्य करण्यात आले आहे.

बचत गटाच्या श्वेता हुले यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले. माझे काका अतुल हुले तसेच यु. एन. डी. पी. (युनाटेड नेशन डेव्हल्पमेंट प्रोग्रॅम) चे सोहेल जमादार यांनी कांदळवन सैर बाबत मोलाच मार्गदर्शन करण्याबरोबरच आम्हाला यु. एन. डी. पी. कडून पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले. जानेवारी 2017 पासून आम्ही हा उपक्रम सुरु केला. शाळेच्या सहली, जेष्ठ नागरीक, पर्यटक, अनिल अवचट यांच्या सारखे साहित्यिक यांनी आतापर्यंत या कांदळवन सैरचा आनंद घेतला आहे.

बचत गटातील महिला नाश्ता, जेवणाची सोय करतात. बचत गटातील महिलाच कांदळवनाची शास्त्रशुद्ध माहिती देण्याबरोबरच नावही वल्हवातात. एक ते दीड तासाच्या या कांदळवन सैरमध्ये पर्यटकांना पाण मांजर, आठ ते दहा प्रकारचे बगळे, विविध प्रकारचे पक्षी यांच दर्शन होत. कांदळवनातील विविध प्रजातींची, अन्नसाखळी कशी तयार होते, कांदळवनाचे औषधी उपयोग याबाबतची सविस्तर माहिती बचत गटातील महिला देतात. बचत गटातील सर्व महिलांना नाव चालविण्याचे प्रशिक्षण, कांदळवनाचे औषधी उपयोग, त्यांच्या जाती याबाबत माहिती कशी द्यावी, याचे प्रशिक्षण याचबरोबर चायनीजसह इतर खाद्यपदार्थ कसे तयार करावेत व ते आकर्षक पद्धतीने कसे वाढावेत, याचही प्रशिक्षण दिले आहे.
कांदळवन प्रजाती
या कांदळवनात सोनारशिया अब्ला (पांढरी चिपी किंवा करपू स्थानिक नाव) अॅवेसेनिया मरीना (तिवरा), अॅवेसेनिया ऑफिसानालिस, एक्साकोरीया एगालोचा (हुरा), एकांतस (मरानी),रायझोफोरा विक्रोनाटा, कॅण्डेलिया कॅण्डर आदी प्रकारचे (मॅग्रुव्ह) कांदळवन प्रजाती पहायला मिळतात. कांदळवन हे सदाहरीत असते, त्याची पानगळ होत नाही. खाडीच्या दुतर्फा असलेल्या कांदळवनातून होडीच्या सहाय्याने अगदी हळूवारपणे फिरताना पर्यटकांना निसर्गातील शांततेची व विविध प्रकारच्या मासे व पक्षांच्या दर्शनाने वेगळा आनंद मिळतो. कांदळवनातील या सैरसाठी दोन नावा आहेत. या नावेत सुमारे 10 ते 15 लोक बसू शकतात. साधारण एक ते दीड तासांची सैर केली जाते. या पाहणीदरम्यान महिला बचत गटातील महिला कांदळवनाची तसेच प्रजातींची, पक्षी, मासे यांची शास्त्रशुद्ध माहिती पर्यटकांना देतात.

मालवणी पद्धतीचे जेवण

पर्यटकांसाठी मालवणी पद्धतीचे जेवण, नाश्ता यांचीही सोय या बचतगटातील महिला करतात. समुद्राच्या भरती ओहोटी वेळेनुसार ही सैर आयोजित केली जाते. या कांदळवन सैर करावयाची झाल्यास पुढील संपर्कासाठी ई- मेल किंवा या बचत गटातील महिला सदस्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. sohnsatardekar87@gmail.com किंवा shwetahule68@gmail.com भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे श्वेता हुले -8806465286, समर्थ सृष्टी वेंगुर्ला ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.

स्वामीनी बचत गटाच्या सर्व महिला स्वतः होडी चालवतात. माहिती अतिशय सुंदर पद्धतीने सांगतात. निसर्गाच्या शांत वातावरणात मनोहारी कांदळवनाच्या सुखद दर्शनाबरोबरच विविध पक्षांचे व माशांचे दर्शन मनाला सुखावून जाते. निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्वपूर्ण भूमिका बजावण्याबरोबरच पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पूरक असलेली ही कांदळवनातील सैर वेगळी अनुभूती देण्याबरोबरच मनाला प्रसन्न करते.

लेखक: मिलिंद बांदिवडेकर,

जिल्हा माहिती अधिकारी, सिंधुदुर्ग.

माहिती स्रोत: महान्युज