नळदुर्ग

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक ठिकाण. लोकसंख्या ७,३६७ (१९७१). क्षेत्रफळ ३४·७० चौ. किमी., स. स. पासून उंची ६७०·५६ मी. असून येथील हवामान आरोग्यवर्धक आहे.

हे तुळजापूरच्या आग्नेयीस सु. ३२ किमी. मुंबई-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे. येथील बोरी नदीकाठावरील चौदाव्या शतकातील नळदुर्ग हा किल्ला प्रसिद्ध असून या किल्ल्यावरूनच या ठिकाणास नळदुर्ग नाव पडले असे म्हणतात.

१८५३ पर्यंत नळदुर्ग जिल्ह्याचे आणि १९०५ पर्यंत तालुक्याचे हे मुख्य ठिकाण होते. नळदुर्ग दख्खन पठारावरील तटबंदी केलेल्या सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. यावर चालुक्य, बहमनी व आदिलशाही इत्यादींची सत्तांतरे झाली.

दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहाने बोरी नदीवर धरण बांधून पाणीपुरवठ्याची कायमची सोय केली. स्वतःच्या सुखसोयींसाठी त्याने किल्ल्यात बांधलेला पाणी-महाल हे येथील मुख्य आकर्षण आहे. येथे १९४६ पासून नगरपालिका आहे. कर्नल मेडोज टेलरच्या कारकीर्दीत (१८५३-५७) याची फार भरभराट झाली. त्याने येथील बाजारपेठ सुधारून व्यापारास चालना दिली आणि या किल्ल्याचा मनोवेधक वृत्तांतही लिहिला.

नळदुर्गच्या आसमंतात ज्वारी, गहू, कापूस इ. पिके होतात. येथे दवाखाना, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहे. राम, महादेव व हनुमान यांची मंदिरे येथे आहेत. वनवासकाळात रामाचा येथे काही दिवस मुक्काम होता, असे म्हटले जाते. येथे रामनवमीचा उत्सव होतो व पौष पौर्णिमेस खंडोबाची यात्रा भरते.

लेखक - य. रा. कांबळे

स्त्रोत: मराठी विश्वकोश