जळगाव शहरालगतचे लांडोरखोरी हे जळगाव वनविभागाच्या अखत्यारीत असलेले ७० हेक्टरमध्ये पसरलेले वनक्षेत्र. वन्य प्राणी जीव, विविध स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षांच्या अधिवासाने समृद्ध असलले क्षेत्र. लांडोरखोरीच्या एका बाजूस विस्तीर्ण पसरलेला मेहरूण तलाव. शिरसोली रोड आणि मोहाडीरोड यांच्यामध्ये असलेल्या या लांडोरखोरी वनक्षेत्राला विकसित करून पर्यटन स्थळ करावे अशी जळगावकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. गेल्या काही वर्षापासून यासाठी काहींनी प्रयत्न केले होते. मात्र या ७० हेक्टर जागेत असलेल्या वन्यजीवांना धक्का लागू न देता हे वनोद्यान विकसीत कसे करता येऊ शकेल याचा विचार केला तो जळगाव वनविभागात बदलून आलेल्या उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी यांनी. दोन वर्षापूर्वी सुरू केलेला हा उपक्रम आज पूर्णत्वास आला आहे. आणि आज जळगावकर नागरिकांना एक अनोखे वनोद्यान विकसित करून खुले केले आहे.

लांडोरखोरी वनोद्यान हे ७० हेक्टर क्षेत्रावर जैवविविधतेने नैसर्गिक अधिवास क्षेत्र आहे. जळगाव वनविभागाने गेले पाच वर्षांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न करून हिरवा पट्टा विकसित केला आहे. समृद्ध जैवविविधतेने संपन्न अशा खैर, नीम, अंजन, बोर, बाभूळ, काटेसावर, शेवगा, आपटा, हेंकळ या सारख्या ७० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी आहेत. तर रानडुकर, चिंकारा, निलगाय, ससा, मुंगुस, मोर सारख्या सस्तन प्राण्यांचा वावर, दगड पाल, साधी पाल, उद्यान सरडा, शामेलीयन, धामण, कवड्या, तस्कर सारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या १५ पेक्षा जास्त प्रजातीही येथे आहेत. तसेच चंडोल, कापशी, सोनपाठी सुतार, कोतवाल, युरोपियन चाष, शिक्रा इत्यादी स्थानिक व स्थलांतरी पक्षांच्या ६८ प्रजाती येथे आढळून येतात. या ७० हेक्टरपैकी दहा हेक्टरमध्ये हे वनोद्योन विकसित केले गेले आहे.

या वैशिष्ठ्यपूर्ण संकल्पना असलेल्या उद्यानात वरच्या टप्प्यात पाच हेक्टरमध्ये बांबू उद्यान, अंजीर उद्यान आणि ताड उद्यान केले आहे. बांबू उद्यान संकल्पनेत ४२ प्रकारच्या बांबूंच्या प्रजाती लावण्यात आलेल्या आहेत तर अंजीर उद्यानात ३५ प्रकारच्या अंजीर प्रजाती आणि ताड उद्यानात ३२ प्रकारच्या प्रजातींची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय अनेक वनस्पतींची जाणिवपूर्वक लागवड व संगोपनही या उद्यानात करण्यात येत आहे.

दोन टप्प्यात असलेल्या या वनोद्यानात तीन हेक्टर क्षेत्रात, लाखवन, त्रिफळा उद्यान, गणेशपूजनासाठी लागणाऱ्या वनस्पतींचे गणेशवन, नंदनवन, पंचवटी वन, २७ नक्षत्र आणि १२ राशी लक्षात घेऊन ग्रह तारे आणि नक्षत्र यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वनस्पती व त्यांची नक्षत्ररचनेनुसार केलेली आकर्षक मांडणी नक्षत्रवनात आहे. जाणिवपूर्वक विविध प्रकारचे गुलाब जमा करून उभारलेले गुलाब उद्यान, सुगंधी वनस्पतींचे सुगंधीत वन, रामायण महाभारतात उल्लेखलेल्या अनेक वनस्पती रामायण व महाभारत उद्यानात आहेत. तसेच शीख, जैन, बौद्ध धर्मग्रंथात उल्लेख असलेल्या वनस्पती सर्वधर्म समभाव उद्यानात विकसित केल्या आहेत. तर हर्बल उद्यानात १०८ आयुर्वेदातील वनस्पती आहेत. त्यामुळे हे उद्यान म्हणजे वनस्पती अभ्यासकांना एक पर्वणी ठरणार आहे.

वनखात्याने विविध उद्यानांच्या माध्यमातून हे वनोद्योन विकसित करतांना या उद्यानाला भेट देणाऱ्यांमध्ये लहान मुलेही आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी एका विभागात जशी खेळणी लावली आहेत, तशी मोठ्यांसाठी खुली व्यायामशाळा उभारली आहे. या जीमसाठी लागणारे साहित्य नागपूरहून आणण्यात आले आहे. सकाळ-सायंकाळ नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात पर्यावरणाच्या जाणिवेसह स्वास्थ्य जाणिवेला देखील प्रोत्साहन मिळावे. याकरीता तीन कि.मी.चा जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. तर येत्या दोन महिन्यात पाच किमी आणि आठ किमीचा जॉगिंग टॅक तयार करण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. नैसर्गिक चढउतार कायम ठेऊन पावसाळ्यात वाहत जाणारे पाणी अडवून त्याचादेखील खुबीने वापर करून घेतलेला दिसून येतो. या उद्यानात शेततळे तयार करून त्यात पाणी साठवून ठेवण्यात दूरदर्शीपणाही दाखविण्यात आलेला आहे. ज्येष्ठ नागरीकांना बसण्यासाठी पॅगोडा तयार करण्यात आला आहे. निरीक्षणासाठी मनोरे, लाकडाचा वापर करून केलेले पूलही या उद्यानात दिसून येतात. या विस्तीर्ण उद्यानात हिंडतांना बसण्यासाठी बाक, प्रसाधनगृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. लवकरच कॅन्टीनही सुरू करण्यात येणार आहे. त्यात आलेल्या नागरिकांना उद्यानात फेरफटका मारल्यानंतर चहा, कॉफी व नास्त्याची सोय उपलब्ध होणार आहे.

एकूणच लांडोरखोरी हे जळगाव शहराजवळ एक वैशिष्ट्यपूर्ण असे निसर्गाच्या सान्निध्यात व निसर्गाबद्दल माहिती देणारे केंद्र ठरणार आहे. सुंदर आणि गुढ अशा जैवविविधतेची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. वने, वनातील वनस्पती, त्यांचे औषधी महत्व, त्यांची आर्थिक, सामाजिक उपयुक्तता यांची देखील माहिती मिळणार आहे. यातून नकळत नागरिकांची पर्यावरण संवर्धनाची आस्था अधिक दृढ होईल, यादृष्टीने जळगाव वन विभागाने उभा केलेला प्रकल्प महत्वपूर्ण आहे. तसा एखादा कल्पक अधिकारी लाभला तर तो काय करू शकतो याचे हे मूर्तीमंत उदाहरण इतरांसाठी आदर्श ठरले आहे. येणाऱ्या काळात निसर्ग शिक्षणकेंद्र म्हणून हे वनउद्यान काम करेल आणि भेट देणाऱ्या लोकांसाठी स्वास्थ्य केंद्र म्हणूनही कार्यरत राहील, असा विश्वास वाटतो.

लेखक: विजय पाठक

माहिती स्रोत: महान्युज