ज्या विद्यार्थ्याला नागरी सेवेत प्रवेश करावयाचा आहे, त्याला विविध क्षेत्रातील घटनांची आवड असावी. त्याच्यासभोवती घडणाऱ्या घटनांबाबत तो जागरूक असावा. त्याच्याकडे देश आणि देशातील जनता याबाबत पुरेशी माहिती असावी. हे लक्षात घेऊनच मुलाखत मंडळ या प्रक्रियेत उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वातील विविध गुण वैशिष्ट्यांवर भर देते... प्रशासकीय क्षेत्रात काम करण्यासाठी संबंधित उमेदवाराची वैयक्तिक पात्रता मुलाखतीमध्ये उमेदवाराने पॅनल मेंबरना तो किंवा ती या पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार आहे हे पटवून देणे आवश्यक असते. यावेळी उमेदवाराने आपण शिस्तबद्ध असून कोणतेही कार्य संघटितपणे करून घेऊ शकतो हे दर्शविणे आवश्यक असते. उमेदवाराची मानसिक जागरूकता उमेदवाराची समाजात घडणाऱ्या विविध घटनांबाबतची जागरूकता, जाणीव, इच्छाशक्ती, दृष्टिकोन आणि अभिक्षमता तपासली जाते. उमेदवाराची अभिक्षमता म्हणजे त्याला दिलेले उद्दिष्ट तो उपलब्ध साधनांच्या साहाय्याने वेळेच्या मर्यादेत राहून पूर्ण करू शकतो की नाही हे तपासले जाते. आकलन क्षमता उमेदवाराची आकलन क्षमता म्हणजे त्याला विचारलेला प्रश्न त्याला पूर्णपणे समजला आहे की नाही, त्या पाठीमागचा हेतू लक्षात घेऊन प्रतिसाद देणे आवश्यक असते. येथे प्रश्न म्हणजे परिस्थिती आणि उत्तर म्हणजे प्रतिसाद अशा पद्धतीने मुलाखतीला सामोरे गेल्यास आपली आकलन क्षमता योग्य असल्याचे दर्शविता येते. त्यामुळे मुलाखतीस सामोरे जाताना उमेदवाराने प्रश्न काळजीपूर्वक आणि नीट ऐकला पाहिजे. स्पष्ट आणि तार्किक सादरीकरण येथे स्पष्ट सादरीकरण म्हणजे एखादा विचार किंवा मुद्दा अतिशय सोप्या साध्या भाषेत प्रभावीपणे मांडताना मी एखाद्या घटनेचे परिणामकारक विश्लेषण करू शकतो हे उमेदवाराला दर्शवायचे असते. प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा आणि मी कोणाचे अनुकरण न करता स्वतः विचार करू शकतो. माझ्याकडे सर्जनशीलता आहे हे दर्शविणे येथे आवश्यक असते. संतुलित विचार पद्धती मुलाखतीमध्ये उमेदवाराला कोणतीही माहिती विचारण्याची शक्यता असते. कोणतेही उत्तर हे पूर्वग्रहदूषित असू नये. ते नेहमीच संतुलित, सकारात्मक आणि उपयुक्त स्वरूपाचे असावे. त्यातून उमेदवाराची सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती स्पष्ट होते. माहितीची सखोलता व विस्तार उमेदवाराची ही क्षमता तपासण्यासाठी मुलाखत मंडळ उमेदवाराने त्याच्या अर्जात लिहिलेल्या विविध मुद्यावर प्रश्न विचारते. विशेषतः छंद, पदवीचे विषय, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी यावरील प्रश्न हे उमेदवाराच्या ज्ञानाचा विस्तार तपासण्यासाठी असतात. उमेदवार बदलत्या समाज प्रवाहाशी जुळवून घेणारा आहे की नाही, अलीकडच्या काळातील घटनांबाबत तो पुरेसा सजग आहे की नाही हे पॅनेल तपासते. सामाजिक सौहार्द आणि नेतृत्वक्षमता अधिकाऱ्याला सामाजिक सौहार्दाचे भान ठेऊन निर्णय घ्यावे लागतात. तसेच सामाजिक न्यायासाठी उपेक्षित घटकांचा विचार करावा लागतो. उमेदवार याबाबतीत जागरूक आहे हे त्याच्या उत्तरात कुठेतरी दिसणे आवश्यक असते. बौद्धिक आणि नैतिक सत्यनिष्ठा सत्यनिष्ठा ही उमेदवाराच्या सामाजिक आणि मानसिक जडणघडणीचे प्रतिबिंब असते. प्रशासनात काम करताना उमेदवार समाजासाठी कितपत योगदान देऊ शकतो हे तपासताना सत्यनिष्ठा महत्त्वाची ठरते. येथे उमेदवाराचा बौद्धिक निर्देशांक, सामाजिक कौशल्य, वैचारिक क्षमता आणि भावनिक स्थैर्य महत्त्वाचे ठरते. देहबोली उमेदवाराचा पोषाख, बैठक, नजर, चेहऱ्यावरील भाव आदी बाबींचा विचार करून संबंधित उमेदवार चांगला प्रशासकीय अधिकारी होऊ शकेल की नाही हे ओळखले जाते. मुलाखतीच्या विविध घटकांचा यशातील वाटा विचारात घेतल्यास देहबोलीचा त्यातील वाटा सुमारे 60 टक्के असतो, 20 टक्के ज्ञान, तर 20 टक्के संवादकौशल्य अशी सर्वसाधारण विभागणी असते. त्यामुळे देहबोलीद्वारे सकारात्मक दृष्टिकोन प्रदर्शित करण्यावर उमेदवाराने भर देणे महत्त्वाचे आहे. संवाद कौशल्य मुलाखतीत अत्यंत प्राथमिक व साधारण प्रश्न विचारले जातात. उमेदवारास उत्तर देण्यास पूर्ण वेळ देण्यात येतो. या मुलाखतीत कोणत्याही प्रश्नाचा क्रम पूर्व-निर्धारीत नसतो. उमेदवाराला स्वतःविषयी किंवा सामाजिक-आर्थिक-राजनैतिक-सांस्कृतिक विषयांवर विचार व्यक्त करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. मुलाखतीची स्वयंतयारी मुलाखत कोणत्या जागेसाठी आहे, त्या जागेचा तपशील काय, अपेक्षेप्रमाणे उमेदवाराची प्रतिमा काय असायला हवी, उमेदवार म्हणून आपण निश्चितपणे त्यामध्ये बसू शकतो का याचा विचार उमेदवाराने करावा. लेखक - डॉ.आनंद पाटील स्त्रोत - महान्युज