फॅशन आणि सौंदर्य याचा जवळचा संबंध आहे. आकर्षक आणि खुले व्यक्तिमत्व घडण्यासाठी अनेकजण आपली वेशभूषा, राहणीमान, पेहराव, रंगसंगती याच्याकडे कटाक्षाने जाणीवपूर्वक लक्ष देत असतात. इथे प्रत्येकाला सुंदर दिसावे असे मनोमन वाटते. ‘पायांच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम पादत्राणे करत असतात. काळानुरूप यात बदल होत आलेत. आजकाल कोल्हापुरी पायताण अगदी युरोपातही विकले जाते. नवनवीन रुपात जुन्या कलात्मकतेचा खुबीने वापर करत पादत्राणे नव्या पिढीला साजेशी अशी बाजारपेठेत येत असतात. अर्थात ही रचना करण्याचे काम फूटवेअर डिझायनर करतो. या क्षेत्रात कलेचे अंग आणि बाजारपेठेच्या मागणीची जाण असणाऱ्यास जास्त वाव आहे. पादत्राणे निर्मितीत आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. मित्रहो तुम्हीही उत्कृष्ट फूटवेअर डिझायनर बनून नावलौकिक मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या क्षेत्रातील संधींविषयी खास करिअरनामा या लोकप्रिय सदरातून..

पात्रता

बारावीनंतर फूटवेअर डिझायनिंगच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो. देशातील नामांकित फुटवेअर प्रशिक्षण संस्थात प्रशिक्षण दिले जाते. पदव्युत्तर पदवी, पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या विविध कोर्सेसचा कालावधी एक ते तीन वर्षापर्यंत असतो. पदव्युत्तर पदविका करण्यासाठी पदवीधर असणे गरजेचे आहे. एफडीडीआई मध्ये प्रवेशासाठी ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट द्यावी लागते. ही परीक्षा पार केल्यास समूहचर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीनंतर प्रवेश दिला जातो.

कोर्स

नोएडा आणि चेन्नई स्थित फुटवेअर अँड डेवलपमेंट इन्स्टीट्युट, द सेन्ट्रल फुटवेअर ट्रेनिंग सेंटर, द सेंटर फॉर लेदर रिसर्च इन्स्टीट्युट या ठिकाणी पदवी अंतर्गत कोर्स उपलब्ध आहेत. पदव्युत्तर पदवी फुटवेअर सायन्स अँड इंजिनिअरिंग यामध्ये करता येते. तसेच एमएफटी हा अठरा महिन्यांचा डिप्लोमा कोर्सही करता येतो. त्याचबरोबर ह्युमन रिसोर्स डेवलपमेंटचे काही कोर्सही करता येतात. फुटवेअर टेक्नॉलॉजी सुपरवायझरी, लेदर टेक्नॉलॉजीत डिप्लोमाही उपलब्ध असतो.

कार्य

फुटवेअर इंडस्ट्रीत अनेक स्तरावर काम चालते उदा. डिझायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग. ग्राहकाची आवड, रुची आणि मागणी पाहून पॅटर्न डिझाईन करावे लागतात. या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी नवनिर्मिती कौशल्य, मार्केट ट्रेड, संगणक हाताळण्याची तयारी त्यातील कौशल्य असणे गरजेचे आहे. कष्टाची तयारी मात्र ठेवावी लागते. डिझाईनिंग, मशीन हाताळणी, मार्केटिंग कौशल्य इथे महत्वाचे ठरते. फाईन आर्टसची पार्श्वभूमी असल्यावर फायद्याचे ठरते.

संधी

जागतिक मंदी असतानासुद्धा या क्षेत्रात संधींची उपलब्धता कमी नव्हती. इंडियन फुटवेअर रिटेल मार्केट मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. भारतात अनेक नामांकित कंपन्या कार्यरत आहेत. तसेच परदेशी ब्रँडही देशात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे. काही काळाच्या अनुभवानंतर स्वतंत्ररित्या व्यवसायही करता येईल.

वेतन

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुरवातीस १५ ते २० हजारापर्यंत वेतन मिळू शकते. तसेच व्यवसायात कार्यरत झाल्यास उत्पन्नाच्या अमर्यादित संधी आहेत.

प्रशिक्षण संस्था

• फुटवेअर डिझाईन अँड डेवलपमेंट इन्स्टीट्युट एफडीडीआई, नोएडा

• सेन्ट्रल फुटवेअर ट्रेनिंग इन्स्टीट्युट, आग्रा

• फुटवेअर डिझाईन अँड डेवलपमेंट इन्स्टीट्युट, वांद्रे मुंबई

• नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली

• इन्स्टीट्युट ऑफ गव्हर्नमेंट लेदर वर्किंग स्कूल, मुंबई

• कॉलेज ऑफ लेदर टेक्नॉलॉजी, कोलकाता

• अण्णा विद्यापीठ, चेन्नईसचिन के. पाटील, संपर्क- ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज