पारंपरिक तांबटकामात मुख्यत्वे तांब्या–पितळेच्या भांड्यांची निर्मिती अंतर्भूत असते. ही भांडी तयार करणारा तांबट प्रथम तांब्याचा किंवा पितळेचा पत्रा घेऊन त्यावर तयार करावयाच्या भांड्याच्या आकाराचे वर्तुळ काढतो. नंतर ते कात्रीने कापून घेतो व मग ते दगडी खोलगट ऐरणीवर ठेवून हातोड्याने ठोकतो; त्यामुळे पत्र्याला खोलगट आकार येऊ लागतो. अपेक्षित आकार येईपर्यंत हे काम चालू असते. यानंतर त्यावर पुन्हा निराळ्या आकारांच्या आणि वजनाच्या हातोडीने तीन ते चार वेळा ठोके दिले जातात. सामान्यतः प्रत्येक भांड्याचा वरचा व खालचा असे दोन भाग अलग अलग ठोकले जातात. ते दोन्ही भाग पितळ, टाकणखार व नवसागर यांच्या साह्याने डाखकाम करून व ते एकमेकांस जोडून त्यांतून एकसंध भांडे तयार करण्यात येते. लांब गळ्याचे मोठे भांडे मात्र तीन भागांत तयार केले जाते. भांडे जोडून तयार झाल्यावर तांबट कोळशाची पुड किंवा चिंच यांनी घासून ते चकचकीत करतो व शेवटी लहान हातोडीने पुन्हा त्यावर ओळीने ठोके मारुन ते चमकदार बनवितो.

नित्य उपयोगाच्या घरगुती भांड्यांखेरीज प्रासंगिक उपयोगासाठी असलेली भांडी, उदा., अत्तरदाणी, गुलाबदाणी, पिकदाणी ही देखील तांबट तयार करतात. ही भांडी नक्षीदार आणि आकर्षक आकाराची असतात. तसेच देवपूजेची भांडी व उपकरणे उदा., पळी, पंचपात्र, ताम्हन, तांब्या, समई, नीरांजन, धूपदाणी, हळद–कुंकवाचा करंडा, गंधाची तबकडी, फुलांसाठी तबक, पुष्पपात्र वा फुलोरी, अभिषेकपात्र तसेच झारी इ. भांडी बहुतेक तांब्याची वा पितळेची असतात. त्यांचा आकार, घाट व त्यांवरील कलाकुसर विशेष कलात्मक नसली, तरी मनोवेधक असते.

लेखक : १) गो. चिं. कानडे

मराठी स्रोत : मराठी विश्वकोश