ग्रीसची पश्चिमेकडील बेटे. ३८० उ. व २०० पू.; क्षेत्रफळ सु. २,२६० चौ. किमी.; लोकसंख्या १,८३,६३३ (१९७१). या द्वीपसमूहात कॉर्फ्यू (केर्किरा), सेफालोनिया (केफालीनिया), झँटी (झाकिंथॉस), ल्यूकस, इथाका (इथाकी), कीथीरा, अँटीकीथीरा, पाक्सोस (पॉक्सॉय) व अँटीपाक्सोस ही बेटे आहेत. त्यांपैकी सात प्रमुख बेटांस हेप्टानीसस (सप्तद्वीपे) म्हणत. यांपैकी कीथीरा बेट भूमध्य समुद्रात असून इतर आयोनियन समुद्रात आहेत. ही सर्व बेटे क्रिटेशस व तृतीय काळातील असून कॉर्फ्यूवर ज्युरॅसिक खडक आहेत. शेल, हॉर्नब्लेंड, चुनखडक व डोलोमाइट हे खडक मुख्यतः तेथे आढळतात. सर्व बेटे पर्वतमय असून सेफालोनियावरील मौंट आयनॉसची उंची १,६२० मी. आहे. यांपैकी बऱ्याच बेटांवर वारंवार भूकंप होतात. १९५३च्या भूकंपात इथाका, सेफालोनिया व झँटी येथील शहरांची फार नासधूस झाली होती. पिकाऊ जमीन अत्यल्प असल्याने पुरेसे धान्योत्पादन होत नाही. हवामान उबदार आहे व पाऊस सु. १००-१२५ सेंमी. पडतो. ऑलिव्ह, द्राक्षे, अंजीर, बदाम ही येथील प्रमुख पिके होत. फळफळावळ, ऑलिव्हतेल व द्राक्षाची दारू निर्यात होतात. येथे थोडी मेंढपाळी व मासेमारी चालते; परंतु उद्योगधंद्यांची वाढ फारशी झालेली नाही.

ग्रीसच्या प्राचीन इतिहासात ही बेटे महत्त्वाची होती. त्यानंतर ती बायझंटिन, तुर्क, व्हेनेशियन, फ्रेंच, रशियन, ऑटोमन व इंग्लिश अशा विविध सत्तांखाली होती. १८१५ पासून पॅरिसच्या तहान्वये ही बेटे ‘युनायटेड स्टेट्स ऑफ द आयोनियम आयलंड्स’ या नावाने ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली आली. १८१७ मध्ये त्यांना संविधान, सीनेट व विधिमंडळ मिळाले. ब्रिटिशांशी झालेल्या १८६३च्या तहानुसार जॉर्ज पहिला हा ग्रीसचा राजा झाला, तेव्हा त्या तहातील तरतुदीनुसार १८६४ मध्ये ही बेटे ग्रीसला मिळाली.

लेखक : आ.रे.डिसूझा

स्त्रोत : मराठी विश्वकोश