शिवपूर्वकालीन भारत : वैभव, शौर्य आणि इतिहासाची प्रेरणादायी गाथा भारताचा इतिहास हा जगातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध इतिहासांपैकी एक मानला जातो. अनेक राजवंश, संस्कृती, युद्धे आणि महान व्यक्तिमत्त्वांनी भारताच्या इतिहासाला आकार दिला आहे. शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीचा काळ "शिवपूर्वकालीन भारत" म्हणून ओळखला जातो. हा कालखंड अनेक महत्त्वाच्या घटना, बलाढ्य राजसत्ता, परकीय आक्रमणे आणि शूर वीरांच्या संघर्षांनी समृद्ध आहे. या काळातील घडामोडींमुळे पुढे स्वराज्य स्थापनेची पायाभरणी झाली. शिवपूर्वकालीन भारतात विविध भागांमध्ये अनेक राजसत्तांनी राज्य केले. बंगालमध्ये पाल राजघराणे प्रसिद्ध होते. त्यांनी शिक्षण, कला आणि संस्कृतीला मोठा पाठिंबा दिला. मध्य भारतात गुर्जर-प्रतिहारांनी आपली सत्ता विस्तारली होती. उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल, परमार आणि चौहान ही घराणी विशेष प्रसिद्ध होती. या घराण्यांनी भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली. राजपुतांमधील पृथ्वीराज चौहान हा अत्यंत पराक्रमी राजा होता. त्याचे नाव इतिहासात शौर्य आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते. त्याने तराईच्या पहिल्या युद्धात मुहम्मद घोरीचा पराभव केला होता. मात्र दुसऱ्या युद्धात त्याला पराभव स्वीकारावा लागला. तरीही त्याचे पराक्रम भारतीयांच्या मनात आजही प्रेरणादायी आहेत. दक्षिण भारतात चोळ घराण्याची सत्ता मोठ्या प्रमाणावर विस्तारली होती. राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे चोळ घराण्यातील अत्यंत कर्तबगार राजे होते. त्यांनी सशक्त आरमार उभारले आणि समुद्री शक्ती वाढवली. त्यांच्या सामर्थ्यामुळे मालदीव बेटे आणि श्रीलंका जिंकण्यात यश आले. दक्षिण भारतातील होयसळ घराण्याने देखील अनेक भागांवर आपले वर्चस्व निर्माण केले. महाराष्ट्रात राष्ट्रकूट आणि यादव घराण्यांची सत्ता होती. राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राज्याचा मोठा विस्तार झाला. पुढे यादव घराण्याने महाराष्ट्रात वैभवशाली राज्य निर्माण केले. देवगिरी ही यादवांची राजधानी होती. यादवांच्या काळात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा मोठा विकास झाला. या काळाला मराठी साहित्याचा सुवर्णकाळ असे म्हटले जाते. महानुभाव आणि वारकरी संप्रदायांचा उदयही याच काळात झाला. संतांनी समाजात समानता, प्रेम आणि भक्तीचा संदेश दिला. शिवपूर्वकालीन भारतात परकीय आक्रमणांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आठव्या शतकात अरब सेनानी मुहम्मद बिन कासिम याने सिंध प्रांत जिंकला. यानंतर तुर्क, अफगाण आणि मुघल आक्रमक भारतात आले. त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. या आक्रमणांमुळे भारतातील राजकीय परिस्थितीत मोठे बदल झाले. गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक वेळा आक्रमणे केली. त्याने मथुरा, वृंदावन आणि सोमनाथ येथील संपन्न मंदिरांवर स्वाऱ्या करून प्रचंड संपत्ती लुटली. बख्त्यार खल्जीने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठाचे विशाल ग्रंथालय जाळून टाकले. त्यामुळे ज्ञान आणि शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला. पुढे दिल्ली सुलतानशाहीची स्थापना झाली आणि नंतर मुघल सत्तेचा उदय झाला. मुघल सम्राट अकबर हा एक दूरदृष्टी असलेला आणि सहिष्णू शासक होता. त्याने सर्व धर्मांतील लोकांना समान वागणूक दिली. विविध धर्मांतील चांगल्या विचारांचा स्वीकार करून त्याने "दीन-इ-इलाही" या संकल्पनेची निर्मिती केली. त्यामुळे समाजात धार्मिक सहिष्णुतेचा संदेश गेला. या कालखंडात अनेक शूर व्यक्तिमत्त्वांनी आपल्या पराक्रमाने इतिहासात अमर स्थान मिळवले. महाराणा प्रताप हे त्यांपैकी एक होते. त्यांनी मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. हल्दीघाटीचे युद्ध त्यांच्या शौर्याचे प्रतीक मानले जाते. त्यांनी कधीही परकीय सत्तेसमोर शरणागती पत्करली नाही. चांदबिबी ही अत्यंत धाडसी आणि कर्तबगार महिला होती. मुघलांनी अहमदनगरच्या किल्ल्यावर हल्ला केल्यावर तिने मोठ्या धैर्याने किल्ल्याचे संरक्षण केले. तिच्या नेतृत्वगुणांमुळे ती इतिहासात अजरामर झाली. राणी दुर्गावती हिने देखील मुघलांविरुद्ध संघर्ष केला. तिने आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी शौर्याने लढा दिला. पराभव निश्चित असतानाही तिने शरणागती पत्करली नाही. तिचा स्वाभिमान आणि त्याग आजही प्रेरणादायी आहेत. औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्याचा मोठा विस्तार झाला. मात्र त्याला अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. आहोम, शीख, राजपूत आणि मराठ्यांनी त्याच्या विरोधात संघर्ष केला. शिखांचे गुरू गोविंदसिंग यांनी "खालसा दल" स्थापन करून आपल्या अनुयायांना संघटित केले. याच काळात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य स्थापनेची सुरुवात झाली. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. पुढे मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने मुघल सत्तेला मोठे आव्हान दिले. शिवपूर्वकालीन भारताचा इतिहास आपल्याला अनेक महत्त्वाचे धडे देतो. या इतिहासातून आपल्याला शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रप्रेम, सहिष्णुता आणि संघर्ष यांचे महत्त्व समजते. इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला संकटांचा सामना करण्याची प्रेरणा दिली आहे. इतिहास हा केवळ भूतकाळाचा अभ्यास नसून तो भविष्य घडविण्याचा मार्गदर्शक असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने इतिहासाचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे. आपल्या देशाच्या महान परंपरा आणि संस्कृती जपणे हीच खरी इतिहासाला आदरांजली ठरेल. श्री सुनील विठोबा वेळेकर शिक्षक, स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापार, ता.रामटेक, जि. नागपूर