शिवपूर्वकालीन महाराष्ट्र : संघर्ष, समाजजीवन आणि संतपरंपरेचा सुवर्णकाळ महाराष्ट्राचा इतिहास हा पराक्रम, संस्कृती आणि समाजसुधारणांचा प्रेरणादायी प्रवास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्यापूर्वीचा काळ म्हणजे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र होय. हा काळ अनेक राजकीय उलथापालथी, सामाजिक बदल आणि धार्मिक जागृती यासाठी विशेष ओळखला जातो. महाराष्ट्राच्या इतिहासातील हा काळ समजून घेतल्यास शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीमागील परिस्थिती अधिक स्पष्टपणे लक्षात येते. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतेक भाग अहमदनगरच्या निजामशाही आणि विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात होता. उत्तरेकडून मुघल साम्राज्य दक्षिणेकडे आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत होते. याच काळात पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच यांसारख्या युरोपीय सत्तांनी व्यापाराच्या माध्यमातून प्रवेश केला होता. समुद्री व्यापार आणि बाजारपेठांवर नियंत्रण मिळवण्यासाठी या परकीय शक्तींमध्ये तीव्र स्पर्धा सुरू होती. या सततच्या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. सामान्य जनता सततच्या युद्धांमुळे त्रस्त झाली होती. लोकांच्या जीवनात स्थैर्य आणि सुरक्षिततेचा अभाव होता. या काळात समाजाची रचना मुख्यतः गाव, कसबा आणि परगणा या प्रशासकीय विभागांवर आधारित होती. गाव हे समाजजीवनाचे मुख्य केंद्र होते. बहुतेक लोक गावांमध्ये राहत असत. गावाचा प्रमुख पाटील असे, तर महसूल आणि नोंदी ठेवण्याचे काम कुलकर्णी करत असे. गावांमध्ये अनेक कारागीर राहत असत. सुतार, लोहार, कुंभार, चांभार अशा विविध व्यवसायांतील लोक गावातील गरजा पूर्ण करत. या कारागिरांना त्यांच्या सेवांच्या बदल्यात शेतीतील उत्पन्नाचा काही भाग मिळत असे, ज्याला "बलुते" असे म्हणत. अनेक गावे मिळून परगणा तयार होत असे. परगण्यातील प्रशासनाची जबाबदारी देशमुख आणि देशपांडे यांच्याकडे असे. हे अधिकारी सरकार आणि प्रजा यांच्यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत असत. ते जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवत असत; परंतु काहीवेळा या अधिकाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापरही होत असे. कसबे ही मोठी गावे किंवा व्यापारकेंद्रे होती. येथे बाजारपेठा वसलेल्या असत. शेतीबरोबरच व्यापार आणि विविध उद्योगधंदेही येथे चालत असत. शेटे आणि महाजन हे बाजारपेठांचे प्रमुख असत. या बाजारपेठांमुळे आर्थिक व्यवहारांना चालना मिळत होती. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात दुष्काळ हे एक मोठे संकट होते. शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्यामुळे पाऊस कमी पडल्यास लोकांचे जीवन अत्यंत कठीण होत असे. इ.स. १६३० मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळाने लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. अनेक लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागले. कुटुंबे विस्कळीत झाली, जनावरे मृत्युमुखी पडली आणि आर्थिक व्यवहार थांबले. अशा कठीण परिस्थितीत महाराष्ट्रातील संतपरंपरेने समाजाला नवीन दिशा दिली. समाजात अंधश्रद्धा, कर्मकांड आणि जातिभेद वाढले होते. लोक निराश आणि हतबल झाले होते. या परिस्थितीत वारकरी पंथाने समाजामध्ये आशा आणि समतेचा संदेश दिला. वारकरी पंथाची सुरुवात संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या कार्यातून झाली. या पंथाने समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. वारकरी परंपरेचे केंद्र पंढरपूर होते आणि विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत होते. भजन, कीर्तन आणि सहभोजनाच्या माध्यमातून समाजात एकतेचा आणि समतेचा संदेश दिला जात होता. संत ज्ञानेश्वरांनी "ज्ञानेश्वरी" या ग्रंथातून भगवद्गीतेचा अर्थ मराठीत समजावून सांगितला. त्यांनी सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अध्यात्म आणि भक्ती यांचे महत्त्व सांगितले. त्यांचे "पसायदान" हे आजही लोकांना प्रेरणा देणारे आहे. संत नामदेव हे उत्कृष्ट कीर्तनकार आणि समाजसुधारक होते. त्यांनी सर्व जाती-धर्मातील लोकांमध्ये समानतेची भावना निर्माण केली. त्यांनी आपल्या कीर्तनातून लोकांना भक्तीचा आणि मानवतेचा संदेश दिला. संत एकनाथ यांनी समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यांनी अभंग, भारूड आणि विविध साहित्य प्रकारांमधून समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या परंपरांवर टीका केली. मराठी भाषेचा अभिमान जागृत करण्याचे कार्य त्यांनी केले. संत तुकाराम हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या अभंगांमध्ये समाजातील वास्तव, मानवता आणि भक्ती यांचे सुंदर चित्रण दिसते. त्यांची "तुकाराम गाथा" ही मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा मानली जाते. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रातील ही सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक परिस्थिती पुढे स्वराज्य स्थापनेची प्रेरणा ठरली. समाजातील अस्थिरता, लोकांवरील अन्याय आणि स्वाभिमानाची भावना यामुळे स्वराज्याची गरज निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच परिस्थितीत स्वराज्याची संकल्पना मांडून जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. शिवपूर्वकालीन महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ संघर्षाचा इतिहास नाही, तर समाजजागृती, समता आणि नवचैतन्याचा इतिहास आहे. या काळातील संतांचे विचार, लोकजीवन आणि सामाजिक बदल आजही आपल्याला प्रेरणा देतात. इतिहासाच्या या महत्त्वपूर्ण कालखंडातून आपल्याला एकता, प्रयत्नशीलता आणि समाजहिताची शिकवण मिळते. श्री सुनील विठोबा वेळेकर शिक्षक, स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापार, ता. रामटेक, जि. नागपूर