जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरळी, ता. बिलोली जि. नांदेड UDISE 27150800501 लेखन : राजू गौतम भद्रे | मोबाईल : ८१८०९८१३५९ मुख्याध्यापक : श्री करोड रमेश नागन्ना | मोबाईल : 9284260163 एकूण विद्यार्थी : ६३ | मेल : bhadre.raju@gmail.com यशोगाथा - शालेय परिसराचा नाविन्यपूर्ण उपयोग प्रास्ताविक आजच्या बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांची गरज भासत आहे. विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान देणे पुरेसे नसून त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून, आनंददायी वातावरणात शिकण्याची संधी देणे आवश्यक आहे. या विचारातून आमच्या शाळेत “शालेय परिसराचा नाविन्यपूर्ण उपयोग” हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेच्या परिसरातील प्रत्येक घटक विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपयुक्त बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. शाळेचा परिसर हा केवळ इमारतीपुरता मर्यादित न ठेवता तो विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत शिक्षण प्रयोगशाळा बनविण्यात आला. शाळेचे मैदान, परिसरातील झाडे, इमारतींच्या भिंती, मोकळी जागा, तंत्रज्ञानाची साधने आणि वाचनासाठी तयार केलेले कोपरे यांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणलोत. खेळाचे मैदान - शारीरिक विकासाचा कणा शाळेच्या परिसरात प्रशस्त आणि सुबक असे खेळाचे मैदान आहे. या मैदानाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी प्रभावीपणे करण्यात येतो. मैदानामध्ये कबड्डी, खो-खो, लगोरी आणि लंगडी या पारंपारिक खेळांसाठी योग्य प्रकारे आखणी करण्यात आली आहे. विद्यार्थी दररोज या खेळांमध्ये उत्साहाने सहभागी होतात. खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य सुधारते तसेच त्यांच्यात संघभावना, शिस्त, सहकार्य, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धात्मक वृत्ती निर्माण झाली असून त्यांचा शाळेतला सहभाग वाढलेला दिसून येतो. झाडांच्या खोडावरील लेखन म्हणजे चालता-बोलता अध्ययन शाळेच्या परिसरात करंजी, शिसव, वड अश्या प्रकारचे झाडे आहेत. या झाडांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याच्या विकासासाठी करण्यात आला आहे. परिसरातील झाडांच्या खोडांवर विविध मराठी व इंग्रजी शब्द आणि शैक्षणिक संकल्पना रंगवण्यात आल्या आहेत. विद्यार्थी शाळेच्या परिसरात फिरताना किंवा खेळताना या शब्दांचे वाचन करतात. विशेषतः लहान वर्गातील विद्यार्थ्यांना शब्द ओळखणे आणि वाचनाचा सराव करणे यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढला असून त्यांची वाचन गती सुधारली आहे. BALA (Building as Learning Aid) शाळेच्या वर्गखोल्या आणि इमारतींच्या भिंती तसेच इमारतीच्या खांबावर (पोलवर) BALA (Building as Learning Aid) संकल्पनेनुसार आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. या रंगकामामध्ये विविध शैक्षणिक घटकांचा समावेश करण्यात आला आहे. भिंतींवर गणितीय आकृती, संख्या, मोजमाप, अक्षरमाला, प्राणी-पक्षी, फळे-भाज्या, नकाशे आणि इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यासक्रम रेखाटण्यात आला आहे. तसेच ही माहिती चित्रांच्या माध्यमातून दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी खेळता-खेळता विविध शैक्षणिक संकल्पना सहज आत्मसात करतात. वर्गाबाहेरील भिंती देखील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे प्रभावी साधन बनल्या आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख होणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळेतील सर्व वर्गांमध्ये LCD टीव्ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोबतच दोन संगणक संच शाळेला लोकसहभागातून मिळाले आहेत. या माध्यमातून अध्यापन करताना विविध शैक्षणिक व्हिडिओ, ॲनिमेशन आणि चित्रफितींचा वापर केला जातो. दृश्य माध्यमांमुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक स्पष्टपणे समजतो. कठीण संकल्पनाही सोप्या पद्धतीने समजावून सांगता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस वाढला आहे. Puzzles for Children विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यासाठी शाळेत “Puzzles for Children” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये इयत्ता तिसरी आणि चौथीतील विद्यार्थी ऑनलाईन गणितीय कोडी सोडवतात. यामध्ये एकाच कोड्यात गणितातील चारही मूलभूत क्रिया एकाच कोड्यात सोडवता येतात. या कोड्यांमुळे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, विचारशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होते. गणित विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झाली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आवडीचा वाचन कट्टा विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय निर्माण करण्यासाठी शाळेच्या परिसरात वाचन कट्टा तयार करण्यात आला आहे. येथे विद्यार्थी दुपारच्या रिकाम्या वेळेत ग्रंथालयातील अवांतर वाचनाची पुस्तके घेऊन शांतपणे वाचन करतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित झाली आहे. वाचनामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढला आहे. सोबतच भाषिक कौशल्ये आणि कल्पनाशक्ती सुधारली आहे. गावातील पालक सुद्धा या वाचन काट्याचा उपयोग करून घेतात. शालेय परसबाग – पर्यावरण शिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्यासाठी आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळेच्या परिसरात अल्पावधीत माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबाग तयार करण्यात आली आहे. या परसबागेमध्ये वांगे, टमाटे, कोबी, मिरच्या, मेथी, पालक, कोथिंबीर आणि कांदे यांसारख्या भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. या बागेची देखभाल पालक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून केली जाते. विद्यार्थी झाडांना पाणी घालणे, तण काढणे आणि बागेची निगा राखणे यामध्ये सहभागी होतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शेतीविषयक प्राथमिक ज्ञान मिळते तसेच श्रमाचे महत्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होते. लोकसहभाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरळी येथे माझी विद्यार्थ्यांची बैठक घेऊन माझी विद्यार्थी समिती बनवण्यात आली. समितीमध्ये गावातील अनेक शिक्षणप्रेमी व जे चांगल्या पोस्टवर आहेत त्यांना संधी दिली. शिवाजी पांडागळे सर स्वतः पुढाकार घेतला. सर माध्यमिक शिक्षक असून त्यांना शाळेविषयी आपुलकी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच खरं सर्वांगीण शिक्षण मिळते म्हणूनच या शाळा टिकल्या पाहिजेत हा त्यांचा उद्देश आहे. सरांच्या पुढाकारातून जवळपास दोन लक्ष रुपये शाळेसाठी देणगी उभारण्यात आम्ही यशस्वी झालोत. मिळालेल्या देणगीतून शाळेची अंतर्बाह्य रंगरंगोटी, परसबाग, वृक्षारोपण, LCD TV, saundbox आणि स्वच्छतागृहात पाण्याची सुविधा उपलब्ध करून घेण्यात आले. तसेच ग्रामपंचायत तर्फे देण्यात आलेल्या CCTV कॅमेरा, WIFI सुविधा आणि दोन ५५ इंच चे LCD TV चा विद्यार्थी सुरक्षा व ऑनलाईन अध्ययन अध्यापन सहज शक्य झाले. उपक्रमाचे परिणाम या सर्व उपक्रमांमुळे शाळेच्या शिक्षण वातावरणात सकारात्मक बदल झाला आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील सहभाग वाढला आहे आणि शिकण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या नाविन्यपूर्ण प्रयत्नांमुळे शाळेला विविध स्तरांवर यश मिळाले आहे. “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमामध्ये आमच्या शाळेने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. हे यश शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. तालुकास्तरीय परीक्षांसाठी मा. पाटील साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बिलोली यांची टिम मूल्यांकनासाठी आली. यामध्ये मा कौटकर साहेब विस्तार अधिकारी कुंडलवाडी, मा. काळे साहेब विस्तार अधिकारी बिलोली व मा. स्वामी सर केंद्रप्रमुख हुनगुंदा यांचा सहभाग होता. जिल्हास्तरीय परीक्षणासाठी लोहा तालुक्याचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेडची टिम मूल्यांकनासाठी आली. आलेल्या पथकाने शालेय परिसर, विद्यार्थी गुणवत्ता व भौतिक सुविधा सोबतच शिक्षकांची मेहनत पाहून शाळेचे खूप खूप अभिनंदन केले. गुणवत्तेच्या बाबतीत पहायचे झाल्यास निपुण भारत अभियान अंतर्गत फेब्रुवारी महिन्यापर्यंत शाळेतील ६९ टक्के विद्यार्थी प्रगत स्तराववर पोहोचले आहेत. ही बाब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत झालेली वाढ स्पष्टपणे दर्शवते. निष्कर्ष शाळेचा परिसर हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक ठरू शकतो. योग्य नियोजन आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून शाळेच्या परिसराचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे करता येतो. “शालेय परिसराचा नाविन्यपूर्ण उपयोग” हा उपक्रम आमच्या शाळेसाठी एक प्रेरणादायी यशोगाथा ठरली आहे. उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवता येते याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्न करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरळी, ता. बिलोली जि. नांदेड