जळगाव शहरापासून अवघ्या पाच किलेामीटर अंतरावर असणारे उजाड कुसुंबे हे साधारण 1200 लोकवस्तीचे गाव. आजपर्यंत अंधारात असलेली ही लोकवस्ती व या गावाचे लोक प्रकाशापासून हजारो मैल दूर होती. परंतु जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीतून येथे वीज आली आणि स्वातंत्र्यदिनी तब्बल 70 वर्षांनी ही लोकवस्ती प्रकाशमान झाली.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक गावात वीज पोहचली पाहिजे यास शासनाने प्राधान्य दिले आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून राज्यातील प्रत्येक गावात वीज पोहोचली पाहिजे यास प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी शासन व प्रशासकीय पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे.

या गावातील सर्व रहिवाशी स्वत:च्या व आपल्या कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी मजुरी, बिगारी, गवंडी इतर कामे करतात. या गवातील लोकांजवळ शेती नाही त्यामुळे त्यांना मजुरी करावी लागते. प्रामुख्याने या गावात आदिवासी समाज आढळतो. त्यात तडवी, भिल, पावरा हा समाज आहे. गेल्या 70 वर्षापासून या गावात वीज पोहचली नव्हती.

उजाड कुसुंबे या गावात वीज नसल्याने या गावातील लहानथोरांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीतून या वस्तीसाठी अडीच किलोमीटर वीज वाहिनी उभारुन 100 केव्हीएचे वितरण रोहित्र बसविण्यात आले. या रोहित्रामुळे 300 ते 350 कुटूंबाना वीज सुविधेचा लाभ मिळत आहे. यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.संजय तडवी, उपकार्यकारी अभियंता श्री. एस. के. पाटील तसेच जळगाव ग्रामीण भागाचे कनिष्ठ अभियंता श्री.संकेत राऊत यांच्या प्रयत्नाने हे गाव प्रकाशात आले आहे. या गावात कॉम्पटन ग्रीव्हजच्या काळात वीज आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परतु तो यशस्वी झाला नव्हता. परंतु यावेळी जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे या गावात अखेर वीज आली.

या गावात वीज आल्याने गावातील नागरिकांनी शासनाचे व महावितरणाचे आभार मानुन गावात आनंदोत्सव साजरा केला. जणु आमच्या गावात वीज नसल्याने आम्ही पारतंत्र्यात होतो, पण आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गावात वीज येऊन आमच्या समस्यांपासून आम्हाला ख-या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले. अशी भावना व्यक्त करत गावाक-यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया

फिरोज तडवी (महाविद्यालयीन विद्यार्थी) - गेल्या कित्येक वर्षापासून या गावात वीज नसल्याने हे गाव आहे असं वाटतच नव्हत. फक्त दिवसाच अभ्यास आम्ही करु शकत होतेा. अंधार झाल्यावर जणु सर्वच् कामे थांबुन जात होती. वीज नसल्याने आमचे गाव हे अनेक सुविधांपासून वंचित होते. परंतू आता वीज आल्याने आमच्या गावात पण दिवाळी आल्यासारखे वाटत आहे. या वीजेमुळे आता आम्हाला केव्हाही अभ्यास करता येतो.

नसीम तडवी (प्राथमिक शाळेत जाणारी लहान मुलगी) - पहिले वीज नसल्याने रात्री बाहेर जायला भिती वाटायची. गावात वीज आल्याने आम्हाला खुप आनंद झाला. माझ्या मामाच्या गावाला वीज असल्याने आम्ही तिकडे जायचे पण आमच्याकडे वीज नसल्याने ते आमच्या गावी यायचे नाही. पण आता वीज आल्याने ते पण येवु लागले आहे.

सौ. वत्सलाबाई शेनपडू कोळी (सरपंच) - गेल्या 70 वर्षापासून या गावात लाईट नव्हती त्यामुळे हे गाव अनेक सुविधांपासून वंचित होते. येथे उत्सव सुध्दा साजरे करता येत नव्हते. परंतू वीज आल्याने या गावात या वर्षापासून हे सण साजरे व्हायला सुरुवात झाली. वीज आल्याने या गावात त्यांना पाण्याची व्यवस्था, नळ कनेक्शन, चक्की इत्यादी सुविधांचा लाभ घेता येत आहे.

वनराज पाटील (तलाठी) - अनेक वर्षापासून या गावाने वीजेसाठी मागणी केली होती. पण मागणी होवुनही वीज न आल्याने हे गाव तहाश झाले होते. परंतू शासनाने या गावात वीज पोहोचविल्यामुळे या गावातील लोकांना खुप आनंद झाला. या गावातील लोकांनी बॅन्ड लावून वीज आल्याचे स्वागत केले.

आता या गावात अखंडीत वीज पुरवठा होत असल्याने या गावातील लोकांना याचा लाभ होत असुन कृषि क्षेत्रात वीजेच्या उपलब्धतेमुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारात वाढ होऊन त्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत होणार आहे.शासन आणि महावितरणाच्या अथक प्रयत्नाने स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनी या गावात वीज आली आणि हे गाव वीजेच्या प्रकाशात चमकु लागले.

लेखक - विलास बोडके,

जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव.

माहिती स्रोत : महान्यूज