सिंधी समाज हा उद्यमी समाज असून स्वत:च्या उद्योग धंद्यात रमणारा हा समाज आहे. अनेकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने उद्योग धंद्यामध्ये आपला ठसा उमटविला आहे.

सिंधी समाजातील बहुतांशी महिला मात्र गृहिणी म्हणनूच भुमिका बजावितांना दिसतात. मात्र या भुमिकेला छेद देत श्रीमती हर्षा जेठवाणी या महिलेने मोठ्या हिंमतीने पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकले. महाराष्ट्र राज्यातून सिंधी समाजातील एकमेव महिला संपादक म्हणून त्या कार्यरत आहेत.

साप्ताहिक सिंधीराजा हे वृत्तपत्र 15 ऑगस्ट 1992 साली सुरू करून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण केले. पत्रकारितेचा कोणताही पूर्वानुभव पाठिशी नसताना, समाजात जनजागृती व्हावी, प्रबोधन व्हावे, या उर्मीने व कुटुंबातील सदस्यांच्या भरभक्कम पाठिंब्याने त्यांनी पत्रकारितेचे हे शिवधनुष्य लिलया पेलले.

साप्ताहिकाच्या माध्यमातून समाजाच्या अनेक अनिष्ठ रुढी-परंपरा यांवर ताशेरे ओढले. अनेकदा वाईटपणा स्विकारला परंतू न डगमगता त्यांनी समाजहिताचा वसा अखंडपणे चालू ठेवला. तब्बल 23 वर्षापासून हे वृत्तपत्र नियमितपणे प्रकाशित होत असून महाराष्ट्र शासनाच्या शासनमान्य यादीवर देखील आहे.

स्त्रियांनी स्वत:ला कमी न लेखता आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात वेगळा ठसा उमटविला पाहिजे. पुरुषप्रधान संस्कृतीत न डगमगता शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, अशी आंतरिक तळमळ आजही त्या व्यक्त करतात. बेटी-बचाओ, बेटी-पढाओ.. ही फक्त घोषणा न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आपल्या स्वत:च्या दोन्ही मुलींना उच्च शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे केले.

राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या माध्यमातून अनेकदा एकतेचे महत्व विषद करताना भारत देशाची अनेकता में एकता ही जगात असलेली ओळख दृढ होण्यासाठी प्रयत्न होणे देशहिताचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य पोलिस दलातर्फे गौरविण्यात आले आहे. तसेच पारोळा येथे पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांच्या लिखाणाबद्दल त्यांना दर्पण पुरस्कार मिळाला आहे.

त्या सध्या साप्ताहिक संपादक संघाच्या तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असून वृत्तपत्र विक्री करणाऱ्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप, गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार असे अनेक उपक्रम त्या राबवितात.

अखिल भारतीय सिंधी बोलीभाषा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात सिंधी भाषेचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून त्या सक्रीय आहेत. त्यांच्या 23 वर्षांच्या पत्रकारितेच्या कालखंडात त्यांचे पती नारायण जेठवाणी यांची मोलाची साथ मिळाली असून माहिती व जनसंपर्क कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनामुळे आपण या क्षेत्रात यशस्वी होऊ शकलो, अशा प्रामाणिकपणे त्या आपल्या भावना व्यक्त करतात.

लेखक: निलेश परदेशी, चाळीसगाव, जि.जळगाव, मो.नं. 7588646750

माहिती स्रोत: महान्यूज