'कुठेही जा पळसाला पाने तीनच.... ' ही एक पूर्वापार प्रचलित म्हण आहे. ह्या म्हणीचा लक्ष्यार्थ असा आहे की , 'कुठे जा तीच परिस्थिती ! ' काहीही बदल नाही. आपल्याला वाटतंय, हे फक्त आपल्याकडेच आहे...ते सगळीकडे आहे हे दर्शविण्यासाठी खरी ही म्हण...... पण, शहरातील किती तरुणांना या म्हणीतला 'पळस 'माहित आहे व पळसाला तीन पाने असतात ती ?........पळसच माहिती नाहीये. गावचं पोर सोडलं तर , शहरातील या छोटया पडद्यावर कायम खिळलेल्या तरुणांना काय माहीत पळस, ऐन, धावडा ? दऱ्याखोऱ्यातील गरीब जनतेच्या खपाटलेल्या पोटाचा आधार. हीच ती तीन पाने त्यांची जीवनदाती ठरतात. उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन बनतातात. मार्च महिना संपत आला की, वसंत ऋतूत फुललेला पळस फुलां-पानांनी सर्वांगी बहरतो. आपलं लक्ष वेधून घेतो. त्याला कोवळी लुसलुशीत पाने फुटतात. प्रथम ती लालसर, हिरवी दिसतात. हळूहळू हीच पळसाची पाने हिरवी गर्द होतात. जाड होतात. त्यांच्यावरच्या रेषा ठळक दिसू लागतात. या रेषा त्या पानाची शोभा वाढवितात. जंगलात तीच झाडे हारो भारी जास्त दिसतात. या पानांना शहरात खूप मागणी असते. फुलं ठेवायला, फुलांच्या हारात ओवायला, हॉटेलात जेवायला, पत्रावळी बनवायला , वस्तूंसाठी खोके बनवायला तसेच खेडयात ईरली बनवायला या पळसाच्या पानांचा उपयोग केला जातो. गरीबीच्या जोखडाखाली पिचलेले, पिढयानपिढया दारिद्रयात खाईत रुतलेले दऱ्याखोऱ्यातील सारेच बांधव या पानांना पोत्यात गोळा करुन दाभण -दोऱ्यांनी ती पाने ओवतात. जणू आपले नशीब ओवतात व उसवलेले चार महिन्याचे आयुष्य शिवतात ! त्याला 'पवन ' असे म्हणतात. ह्या पवनी वईला ( कुंपणाला ) हारोभारी बांधल्या जातात. सात-आठ दिवस लालबुंद होईपर्यंत त्या सुकविल्या जातात. अशा रोजच नव्या पवनी बांधून , यापूर्वीच्या जून्या पवनी ज्या सात -आठ दिवस सुकलेल्या असतात,त्या सोडल्या जातात व त्यांच्या पुड्या बांधल्या जातात. एक चौकोनी पत्र्याचा डबा घेऊन त्या डब्यात दोन वेली टाकल्या जातात. उजवी - डावी पाने उलटी - सुलटी बांधून दोन -तीन किलोची एकेक पुडी बांधली जाते. अशा अनेक पुडया बांधून त्या एका खोलीत एकावर एक थर रचून ठेवतात. घरातील मोठी माणसे पाने आणतात. छोटी मुले ती पाने दाभणाने ओवतात, व म्हातारी माणसे पुडया बांधतात. असे कुणीही न सांगताच स्वयंप्रेरणेनेच कामांची विभागणी आपोआप होत जाते. मग, सर्वच घर कामाला लागतंय. अशी दोन महिने ही पाने गोळा होतात. प्रत्येक घरी पानेच पाने आणि पुड्याच पुड्या साचतात. मग, आठवड्यातून एकदा शहरातून एखादा व्यापारी येतो व तो पुड्या खरेदी करतो. घरात पैसे येतात. त्यामुळे सर्वांच्या कामालाही गती येते. मिळालेल्या पैशातून आगोटसाठी सामानाच्या यादया तयार होतात. चार महिन्यासाठी त्यातूनच सामान सुमान खरेदी केले जाते. गुळाच्या भेळ्या, मिरच्या, मीठ, कांदे, लसूण, हळद, मिरगुंडी पापड , तेल, ईरली, प्लॅष्टीक, शेतीची अवजारे व त्यात नांगरासाठी बैल सुद्धा जो- तो ज्याच्या-त्याच्या औकातीनुसार खरेदी करतो. हे सारं त्याला त्या पळसाच्या पानांमुळे शक्य होतंय. तीच पाने होतात त्याला त्याच्या जगण्याचा आधार. त्याचे कुटूंब हिरवे ठेवण्यासाठी, तीच पाने पिवळी होतात .....व जातात फुलांच्या करंडीत, अन्नक्षेत्राच्या पंक्तीत. तीच पाने समर्पित होतात.......कितीतरी जीवांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ! हीच ती पळसाची तीन पाने .....बाजारात विकून पाऊसकाळ्यासाठी संसारोपयोगी वस्तूखरेदी करून आपला उदरनिर्वाह कर ण्यासाठी मोलाची ठरतात. या पूर्वापार चालत आलेल्या रोजगारावर शहापूर तालुक्यातील ड़ोंगराळ भागातील दहा टक्के गरीब जनता मग ती आदिवासी असोत वा बिगर आदिवासी.......हीच पाने विकून पूर्वापार आपले जीवन जगत आहे... त्यामुळे वाड्या-पाड्यांवरील मंडळी फक्त योजनांवर आधारित राहून कायमस्वरूपी अशा कामधंद्याच्या शोधात राहात नाहीत . परिणामी, त्यांना आपले घर सुटत नाही, आणि त्यांची बेकारी फिटत नाही! म्हणूनच, ही गरीबी हटवायची असेल तर....द्रष्टा नेता हवा...ज्यांनी या मंडळींना कायमचा रोजगार उपलब्ध करून द्यावा. पठारांवर रोजगार उपलब्ध करावेत. कारखाने उभारावेत. तो भाग विकसित करून दळणवळणाची साधने निर्माण करावीत. @गोपाळ वेखंडे, शहापूर, ठाणे