आवणी(लावणी )

मृगाच्या पावसात पेरणी झाली की,
२१ व्या दिवशी योग्य वार किंवा साजेसा मुहुर्त बघून कोकणातील शेतकरी मंडळी भात लावणीला( आवणीला ) सुरुवात करायचे.

तत्पुर्वी,
आपल्या नातेवाईकाकडे चार -आठ दिवस पाहुणचार झोडून यायचे,
आपल्या घरी आलेल्या पाहूण्याचीही तशीच बरदास्त चालायची.
कुणाला काय, नि कुणाला काय? प्रत्येकाला
सारं काही आवडीनुसार मिळायचे.
खासकरून राखून ठेवलेला कोंबडा पाहुण्यासाठी गावच्या तेल्याकडून कापून मटणाचे तिखटी जेवण मुखात पडायचे.
आवडीनुसार सर्व पाहुणचार व्हायचा.
पाहुण्याला त्याच्या फर्माईशप्रमाणे
अगदी(टींब,टींब सहित) सारं मिळायचं.
पाहुणा खूष होऊन घरी परतायचा.
पण, असे पाहुणे आल्यामुळे
एकमेकांच्या विचारांची देवघेव व्हायची.
एकमेकांची सुख-दुःख एकमेका कळायची.
ती एकमेकात वाटून घ्यायची.
शेती, मातीतल्या गोष्टी व्हायच्या.
नातं नात्यात एकरूप व्हायचं. घट्ट व्हायचं.
एकमेकात मिसळायचं.
त्यामुळे काम करायला नवी उर्जा मिळायची.
हीच ऊर्जा साठवत नांगऱ्या
आपल्या डोक्यावर घोंगडी,मेनकापड,आणि त्यावर ईरला, असा पारंपरिक पोषाख करून
हातात बैलाच्या पागा धरत
सकाळी सहा वाजता शेतात हजर व्हायचा.
त्यांच्या पाठोपाठ त्याची कारभारीण,कर्ती मुलें,सुना,गडीपोरे
असा लवाजमा शेतात उतरायचा.

शेत कसं भरून वाटायचे.....
फुलून यायचे....
कष्ठकऱ्यांना उत्साहाचे भरते यायचे!
सारी माणसं पाहून त्याला
मोठा शेतकरी असल्याचा
स्वतःचाच स्वतःलाच अभिमान वाटायचा.
शेतात जेवढे नांगर तेवढा मोठा शेतकरी.
शेतात जेवढी माणसं तेवढा तो भांडवलदार.
असा हिशेब त्यावेळी सर्रास चालायचा.
त्यामुळे घरातील लहान पोरंसुद्धा शेतात उतरायची.
जणू की शक्ती प्रदर्शन करायची.
आपल्याला जमेल ते काम करायची.
आपलं कसब दाखवून कामं उरकायची.
प्रत्येकाचं वेगळपण आपापल्या कामातून, कौशल्यातून दिसायचं.
कुणी नांगरावर असायचा,
कुणी आवन( रोपं )खणायचा,
कुणी खणलेलं आवन ठोणक्यावर ठोकायचा ,
कुणी आवनाचा भारा बांधून उखळून वाही केलेल्या शेतात नेऊन टाकायचा.
आणि उरलेली माणसं शेतात आवायला (लावायला )सज्ज असायची.
आवनाचे भारे सोडायचे.
शेतात पांगरायचे आणि मग सर्वांनी एकत्र येऊन ते आवायचे. पाखरं जशी आकाशात झेप घेतात त्या
पाखरांच्या रांगेप्रमाणे आवायला लांबलचक रांग व्हायाची. मागे मागे एक एक पाऊल मागे सरकत आवत यायचं बांधाच्या कडेपर्यंत !

सकाळी सहा ते दिवस मावळेपर्यंत माणसे शेतात काम करायची. कर्णमधूर असा पक्षांचा कलरव कानी गुंजे. वेगवेगळे आवाज अर्थपूर्ण वाटत. कधी आर्त हाक, कधी सूचना, तर कधी धोक्याचा संकेत पाखरांच्या आवाजात असायचा.
प्रत्येक पक्षांचे आवाज परिचयाचे असायचे.
शेतात अंधार पडत चालला की एक पक्षी 'जगाचा काच, जगाचा काच ' असा ओरडायचा.
मालक मग सगळ्यांना शेताबाहेर काढायचा.
त्याचे म्हणणे असे असायचे की,
तो पक्षी आपल्याला घरी जायाला सांगतो.
तो जगाचा काच, जगाचा काच ' म्हणतो.
आपला त्याला काच आहे.
हे कधी शेतातून बाहेर पडतात आणि मी निद्रा घेतो. असा त्याचा अर्थ.
हा लोकभ्रम असो वा परंपरा असो माझा शेतकरी दादा ती इमानेइतबारे जोपासायचा.
त्यात तो सुख मानायचा.
शेती-मातीची गाणी गुणगुणत आनंदाने उत्साहाने शेती लावायचा.

साधारणपणे महिनाभर ही आवणी चालायची!
आवणीला पाच दिवस झाले की,
'पचरात' साजरी व्हायाची.
त्या दिवशी गोड-धोड व्हायचे.
घोंघड़ीवर बसून नाचणी,
तांदळाच्या भाकरीबरोबर खमंग बेसण, चटनीचा स्वाद
कांदयासोबत चाखायला मिळायचा!
परंतु, पचरातच्या दिवशी नाचणीची भाकर नसायची. फक्त तांदळाच्याच भाकरी मिळायच्या.
सोबत बेसण असायचे किंवा कुरमुरीत कांदा भजी!

पुन्हा सगळे कामाला लागायचे. रिचार्ज झाल्यासारखे!

दाहिवली कधी? विचारता-विचारता 'दाहिवली ' यायची. कामामुळे कळायचेसुद्धा नाही!
दहा दिवस झाले की (दाहिवलीला)
पुन्हा काहीतरी चांगले मिष्ठान्न पदार्थ मुखात पडायचे.
यामुळे दिवस निघून जात व कामाचा उत्साह टिकून राही.
क्षीणभाग कुठल्याकुठे पळून जाई.
शेजाऱ्याची आवणी झाली की,
तो ही शेजारधर्माचे पालन करून
मदत म्हणून 'शेजाऱ्याची आवणी काढायला 'आवणीवर जायचा. शेजारधर्म होता. एकोपा होता. म्हणुनच, सारे खिशात पुरेपूर पैसा नसतांना सुखी, आनंदी वाटायचे.
या काळात रानभाज्या भरपूर मिळायच्या.
गुरंढोरं वळणारे गुराखी गुरे चारतांना घरी रानभाज्या घेऊन यायचे. शेतात नांगराखाली मासे, मुठे (खेकडे ) सापडायचे.

घरात खास एक भगिनी जेवण बनविण्यासाठी असायची. बहुधा,आजीच हे काम सांभाळायाची!
गावात तर एक चिट् पाखरू नसायचं.
अगदी निरव शांतता.
असलीच तर खूप लहान बाळं व त्यांच्याबरोबर म्हातारी माणसं.
छोटी मुले घरात झोपाळयावर ( झूल्यावर) झुलायाची.
पारंपरिक गाणी बोलायची.........
त्या गाण्यातून आपली गावरान संस्कृति अखंड उभी राहायची...........
शेतावर गेलेल्या आईची मुलांना आठवण यायाची.
म्हणून आजी गाणी म्हणायची.......

"अंबयाच्या डाहली वं
मोर बोबतो..
आय तुजा गं बबलू लरतो
लरला त लरू दे......"

किंवा

'बांधावरच्या शेवंती गं
सदा फुलेली जाय,
दादा नवऱ्या रं,
तुझ्या खांदयावर पाय,
सरवान साखळी रं
अमुची नवरी बाय... '

काही अशी प्रणयगीतेही गायली जात.

बांधावं इरना ( इरला)
त्यात कोन शिरला
दादा शिरला
कला रं दादा,
बायकोसला मारीतो?
नय गं बये ढवाल्या खेलतो '

अशी सर्व घरातून गाणी ऐकू यायाची!

बाहेर पाऊस ठेका धरायचा...
मजा यायाची.....
चार महिने सारखाच पाऊस बरसायचा...

आज आवणी राहिली नाही तशी..
अन् नाही राहिली तशी माणसे....
आणि
नाही राहिली जमीन अन् पाऊसही!

@गोपाळ वेखंडे, शहापूर, ठाणे
'गावाकडच्या गोष्टी ' या आगामी लेख संग्रहातून
संपर्क: 8308350888