गावाकडच्या गोष्टी - मोव्हाची फुले....... बाबा माझे हाडाचे शेतकरी . त्यांच्यापरिने जे देता येईल ते आयुष्यभर कुटूंबाला देत राहिले. आयुष्यभर तळमळ करीत आपले श्रम जिरवत राहिले.मोडका संसार सांधत सुखाशी भांडत राहिले ! आम्हीही त्यात समाधानी होतो. लहानपणी दुसऱ्याकडे असलेली वस्तू पाहून आपल्याकडेही वस्तू असावी असे वाटे. आपल्या वडिलांची ऐपत काय?हे फारसं कळायचं नाही. कधीतरी,मित्राकडे असलेल्या वस्तूची बाबांकडे 'फर्माईश' केलीच तर -बाबा दुःखी व्हायचे . आपली असमर्थता झाकण्यासाठी आमच्यावर आतल्या आत डाफरायचे. म्हणायचे , 'जा , कमवा. ......आणि मग घ्या.' आम्हांला क्षणभर राग यायचा बाबांचा....पण , आम्ही त्यांचा 'तो 'आदेश समजायचो. आणि प्रत्येक सिझनला त्यांच्या रुपयात चार आणे मिळवण्याचा प्रयत्न करायचो. दिवाळीची सुट्टी तेव्हाही २०-२१ दिवस असायची. तेव्हा शेतात भात,वरई ,नाचणीची कापणी सुरु व्हायची. आम्ही या सराईत ( कापणीत) रिकाम्या झालेल्या शेतात कणसूरांत टोपली घेऊन फिरायचो. पडलेल्या भाताच्या लोंब्या वेचायचो. सर्वा करायचो. जवळच असलेल्या खळ्यावर नेऊन पायाने मळायचो. टोपलीत भरून घरी आणायचो. आईकडून पोतं घेऊन त्यात ते भात टाकायचो. आईलाही आनंद व्हायचा. 'बाबांना सांगू नको भरेपर्यंत.... '' असा सज्जड दम तिला दयायचो. आई पण कौतुकाने माझं त्या वयातील काम न्याहाळायची व गालगुच्चा घेऊन 'जा.नाही सांगत जा.' असं स्मित हास्य करीत मला प्रोत्साहन दयायाची. दिवाळी सण तोंडावर आल्यामुळे साऱ्यांचीच लगबग असायची . कामे उरकण्याची जणू शर्यत लागायची. यातच, माझं पोतं भातानं जवळपास भरायचं. आई ही माझ्या नकळत त्यात मुठ- मुठ टाकून मला मदत करायची. माझ्या आनंदात मिसळायची. भरलेलं पोतं पाहून आनंदाला अगदी उधाण यायचं. मग, मी नाचणी , वरईही गोळा करायचो. बाबांच्या बैलगाडीत माझे भाताचं पोतं स्वतंत्र असायचे. ते विकल्यावर माझी छाती फुगायची. 'बाबा , ही माझी कमाई आहे. हे पैसे मलाच. ' 'हो रे बाबा, तुलाच ! ' बाबा पाठीवर नकळत हात ठेवायचे. तो कणखर खडबडीत श्रमाने सिनलेला जीर्ण हात आशीर्वाद वाटायचा मला ! कमवणं जमू लागलंय मला, मी कमवू शकतो. याच आत्मविश्वासाने मिळेल त्या संधीचा फायदा घेऊन माझ्या त्या वयाच्या अवकतीप्रमाणे कमवू लागलो . मार्च - एप्रिल महिन्यात परीक्षा यायच्या. शाळा अकरा वाजता भरायची . आम्ही भावंडं पहाटे उठून तोंड धुवून जंगलात पळायचो मोव्हा वेचण्यासाठी! मोव्हाच्या झाडाखाली थोडा अंधारच असायचा. त्या अंधारात सफेद चटई अंथरल्यागत मोव्हाच्या फुलांचा सडा पडलेला असायचा. खूप सुंदर दृश्य वाटायचे ते ! मन प्रसन व्हायचे . थंडगार हवेत मोव्हाच्या फुलांचा सुगंध दरवळत असायचा. पक्षांचे विविध विविध आवाज कानी गुंजत. पाल्यापाचोळ्यातून सरपटणाऱ्या प्राण्यांचे सरपटण्याचे आवाज येत . तरीही, न घाबरता, न डगमगता उजाडेपर्यंत मोव्हांवर लक्ष ठेवत गुरांढोरांना हाकलायचं ..त्यांच्या मागे काठी घेऊन पळायचे. जवळही येऊ द्यायचं नाही. कधी हातात दगड घेऊन त्याच्या पाठीमागे लागायचे. चांगलं भटाटलं की , मोव्हफुले वेचायची . टोपल्या भरायच्या. खाली करून आणायच्या. आईने फडक्याच्या गाठोडयात बांधून दिलेली चटणी -भाकरी सोडायची. सोबत पापड ही असायचा. मित्रांसोबत खायाची . सोबत कैरीची फोड , घरून आणलेला मीठ मसाला ...... खूप मज्जा यायची . मोव्हाची फुले घरी नेऊन पसरायची . सुकवायची. वाळवायची आणि पोती -पोती दुकानदाराला विकायची. काहीच माहित नव्हते. या फुलांचा उपयोग काय होतो ते ! पैसे मिळतात एवढेच ठाऊक ! चांगले पैसे कमवून दयायचो. मग , त्यातील वाटा बक्षीस म्हणून मिळायचा ते वेगळे ! मोव्हफुले सिझन सरते सरते ना तेच मोहटया ( मोव्हाला आलेली फळे ) सुरु व्हायच्या. सर्व जंगल अनवाणी पायांनी तुडवत मोहटया गोळा करायचो. घरी आणून त्या फोडायच्या. सुकवायच्या . तेल्याच्या घाण्यात नेऊन तेल काढायचे .गाळायचे. चाळीस - पन्नास लिटर तेल मिळायचे. ते उकळून ,गाळून वर्षभर पुरायचे. जंगलात फिरतांना करवंदे, आंबे, अठरूणे, तोरणं तोडून खायाचो. जंगल मेवा खाऊनच पोट भरायचे . सर्व जंगल मुलांनी , फुलांनी, फळांनी कसे गजबजून जायचे. सारं कसं आल्हाददायक वाटायचे .......... आता सारं बदललं आहे......फक्त समोर चित्र राहिलंय..आठवणींचा गुंडाळा ! गेले ते दिवस ..... राहिल्या फक्त 'गावाकडच्या गोष्टी ! ' @ गोपाळ वेखंडे, शहापूर