राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग व शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्तींना मदत व्हावी तसेच गोरगरीब जनतेला आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने सन 1980 साली संजय गांधी निराधार अनुदान योजना सुरू करण्यात आली.

या योजनेची कार्यान्वयीन यंत्रणा ही शासन नियमाप्रमाणे चालते. साधारणपणे विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयातील उपआयुक्त महसुल हे या योजनेचे विभागीय स्तरावरील सनियंत्रण अधिकारी आहेत. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी हे जिल्हास्तरावरील संनियंत्रण अधिकारी आहेत. विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार यांनी प्रथम तहसील कार्यालयात अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर या कार्यालयाकडून संबंधित गावांचे तलाठी यांचा अहवाल मागविण्यात येतो. अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदरील अर्जाची छाननी करण्यात येवून नंतर तालुका समितीच्या समोर ठेवण्यात येतो. त्यात लाभार्थी पात्र/ अपात्र बाबत निर्णय घेण्यात येतो. पात्र झाल्यास संबंधितास नोटीसीद्वारे बँक खाते क्रमांक / आधार कार्ड इत्यादी कागदपत्राची मागणी करण्यात येते. कागदपत्र सादर केल्यानंतर संबंधितास अनुदान नियमाप्रमाणे बँकेमार्फत दरमहा वितरीत करण्यात येते.

औरंगाबाद जिल्ह्यात विशेष अर्थ/सहाय्य योजनेअंतर्गत श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन उपक्रमाच्या 43190 लाभार्थ्यांना 31 मार्च अखेर 25 कोटी 55 लक्ष 71400 रूपये वितरीत करण्यात आले. संजय गांधी निराधार उपक्रमातून 25802 लाभार्थ्यांना 18 कोटी 91 लक्ष 97500 रूपये वाटप करण्यात आले तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन उपक्रमातून 27996 लाभार्थ्यांना 7 कोटी 12 लक्ष 86800 रूपये वाटप करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेतून 530 लाभार्थ्यांना 12 लक्ष 64600 रूपये तर इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या 43 लाभार्थ्यांना 92600 रूपये आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य वेतन योजनेतून 161 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 3 कोटी 2 लक्ष 10 हजार रूपये जमा करण्यात आले. अशा या विशेष अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 97722 लाभार्थ्यांना तब्बल 52 कोटी 6 लक्ष 22900 रूपये 31 मार्च, 2017 अखेर वितरीत करण्यात आले.

योजनेअंतर्गत वेगवेगळ्या लाभार्थ्यांची निवड कशाप्रकारे करण्यात येते, त्यासाठी कोणते निकष आहेत याची माहिती येथे देत आहे.शासन निर्णय दिनांक 26 ऑक्टोंबर 2010 नुसार वेगवेगळ्या लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

निकष व अटी

संजय गांधी निराधार अनुदान उपक्रम

वय 18 ते 64 वर्ष असावे.

कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु 21000/- असावे.

किमान 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.

अपंग, विधवा, रोगग्रस्त, निराधार पुरुष/महिला वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला 18 वर्षांखालील अनाथ मुले, मुलाचे वय 25 वर्षापेक्षा अधिक नसावे. शासनाच्या अन्य कोणत्याही मासिक लाभ योजनांचा लाभ घेतलेला नसावा, अनुदान दरमहा रु 600/- प्रमाणे दिले जाते.

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन उपक्रम

वय- 65 व 65 वर्षावरील असावे.

कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु 21000/- असावे.

किमान 15 वर्षांपासून महाराष्ट् राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.

शासनाच्या अन्य कोणत्याही मासिक लाभ योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

अनुदान दरमहा रु 600/- (केंद्र शासन रु 200/- व राज्य शासन रु 400/-) प्रमाणे दिले जाते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन उपक्रम

वय- 65 व 65 वर्षांवरील असावे.

कुटूंबाचे नाव ग्रामीण /शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव समाविष्ट असावे.

शासनाचे अन्य कोणत्याही मासिक लाभ योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

अनुदान- दरमहा रु.600/-( केंद्र शासन रु 200 व राज्य शासन रु400) दिले जाते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन उपक्रम

वय- 40 ते 65 वर्षे वयोगटातील विधवा महिला कुटूंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटूंबाच्या यादीत समाविष्ट असावे.

शासनाच्या अन्य कोणत्याही मासिक लाभ योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

अनुदान दरमहा 600/-(केंद्र शासन रु 200/- व राज्य शासन रु. 400/-) दिले जाते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना

वय- 18 ते 65 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेले असावे.

अपंग कुटूंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटूंबाच्या यादीत समाविष्ट असावे.

शासनाच्या अन्य कोणत्याही मासिक योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

अनुदान दरमहा रु 600/-( केंद्र शासन रु. 200 व राज्य शासन रु. 400) दिले जाते.

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना

लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असावा.

वय- 18 ते 64 वयोगटातील असावे.

कुटूंब प्रमुखाच्या व्यक्तीचा (पुरुष अथवा स्त्री) अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास योजना लागू आहे. कुटूंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव समाविष्ट असावे.

कुटूंबातील कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास वारसाला रु 20,000/- अर्थसहाय्य दिले जाते.

या चांगल्या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेऊन भारत देशाच्या विकासात आणि वैभवात भर घालावी.

लेखक - रामचंद्र देठे,
जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद

स्त्रोत - महान्युज