त्वचा व श्लेष्मकला (शरीरातील निरनिराळ्या नलिकाकार पोकळ्यांना, उदा., आतडयाला, असलेले बुळबुळीत अस्तर) यांतील ऊतकांवर (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांवर) शुष्क व आर्द्र उष्णतेमुळे होणाऱ्या परिणामांना अनुक्रमे भाजणे आणि पोळणे म्हणतात. शुष्क व आर्द्र उष्णतेशिवाय रासायनिक विक्रियाशील किरण (उदा., सूर्यकिरण), किरणीयन (गॅमा किरण व इतर आयनीकारक-विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट यांत रूपांतर करणारे-किरण शरीरावर पडणे), रासायनिक पदार्थ घर्षण व विद्युत् यांमुळेही त्वचा भाजते. आर्द्र उष्णतेमुळे (वाफेमुळे किंवा उष्ण द्रवामुळे) होणाऱ्या इजेला ‘पोळणे’ म्हणण्याची पद्धत १९६० सालापासून बंद झालेली असून ‘भोजणे’ या एकाच संज्ञेत या सर्व प्रकाराच्या इजांचा समावेश केला जातो. अमेरिकेत प्रतिवर्षी २० लक्ष लोकांवर भाजण्यावर उपचार कराव लागतात. त्यांपैकी जवळजवळ ८०,००० ते १,२०,००० रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागते. सु. १२,००० लोक भाजण्यामुळे मरण पावतात. प्रतिवर्षी भाजलेल्या रुग्णांची देखभाल व इलाज करण्याकरिता अमेरिकेत ६०,००,००० डॉलर खर्ची पडतात. एका अंदाजाप्रमाणे भारतातील एकटया मुंबई शहरातच प्रतिवर्षी १२,००० ते १३,००० भाजलेल्या रूग्णांवर इलाज केला जातो. भारतात प्रतिवर्षी ६,००,००० भाजलेले रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात येतात व त्यांतील सु. १,००,००० मृत्युमुखी पडतात. इतिहास अतिप्राचीन काळापासून मानवाचे लक्ष अग्नीमुळे झालेल्या शारीरिक इजांकडे गेले असावे. हिपॉक्राटीझ (इ. स. पू. ४६०-३७७) या ग्रीक वैद्यांनी भाजण्याच्या वेदना शमविण्याकरिता भाजलेल्या जागी गरम शिर्क्यामध्ये (व्हिनेगारमध्ये) भिजवलेली पट्टी लावण्याचा उपाय सुचविला होता. ओक वृक्षाच्या सालीपासून बनविलेले द्रावण त्या ठिकाणी लावण्याचा उपायही त्यांनी सुचविला होता. इ. स. १६०७ मध्ये जर्मन शस्त्रक्रियाविशारद फाब्रिशिअस हिल्डेनस यांनी भाजण्याचे उपचारासहित सखोल वर्णन करणारा De Combuslionbus हा पहिला छापील ग्रंथ स्वित्झर्लडमध्ये प्रसिद्ध केला होता. १८६३ मध्ये बाराडूक या शास्त्रज्ञांनी रक्ताभिसरणातील एकूण रक्तातील घट व रक्ताच्या सांद्रतेतील वाढ ही भाजलेल्या रुग्णाच्या मृत्यूची कारणे असतात, असा सिद्धांत मांडला होता. भाजलेल्या रुग्णाच्या द्रव पदार्थाच्या गरजेचा अभ्यास अंडरहिल यांनी १९२३ मध्ये केला. त्यांनी भाजलेल्या पृष्ठभागाचे आकारमान, रुग्णाची सर्वसाधारण अवस्था आणि वय यांची सांगड घालून प्रतिष्ठापना करावयाच्या द्रवासंबंधी सूचना मांडल्या होत्या. अमेरिकेत १९४२ मध्ये बोस्टनमधील एका भयंकर आगीतील मनुष्यहानीमुळे कोप व मूर या शास्त्रज्ञांनी भाजण्यामुळे होणाऱ्या शरीरातील द्रवनाशाचा सखोल अभ्यास केला आणि द्रवनाश जसा बाह्य जखमांतून होतो तसाच शरीरांतर्गतही होतो, हे दाखवून दिले. अनेक वर्षे किती द्रवपुरवठा करावयाचा हे ठरविण्याकरिता रक्तातील तांबडया कोशिकांचे प्रमाण काढण्यासाठी उपयोगी असणारे केंद्रोत्सारक उपकरण (फिरत्या गतीचा उपयोग करून द्रव व घन भाग वेगळे करणारे उपकरण) वापरात होते; परंतु केवळ त्यावरच अवलंबून राहिल्यामुळे अपुरा द्रवपुरवठा होऊन मृत्युसंख्या वाढलेली होती. १९५१ मध्ये रोग्यांच्या शरीराचे आकारमान आणि भाजलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्र यांवर आधारलेले द्रवपुरवठयासंबंधी सूत्र एव्हान्झ यांनी शोधून काढले. यात पुढे सुधारणा होत गेल्या आणि आज आय्. एफ्. के. म्यूर व टी. एल्. बार्कले यांचे सूत्र वापरात आहे. स्थानिक उपचारांच्या निरनिराळ्या पद्धती पूर्वी उपयोगात होत्या. १९४२ मध्ये ॲलेन व कॉख यांनी व्हॅसलीन (पेट्रोलॅटम) लावलेले जाळीदार कापड जखमेवर ठेवून सूक्ष्मजंतूचा शिरकाव होऊ न देणारी पट्टी बांधण्याचा आधुनिक उपचार सुरू केला. हा उपचार १९४९ मध्ये इंग्लडमध्ये ए. बी. वॉलिस यांनी पट्टी न बांधता जखमा उघडया ठेवण्याचा उपचार अमलात आणेपर्यत लोकप्रिय ठरला होता. वॉलिस यांच्या पद्धतीला ‘अनाच्छादित उपचार पद्धत’ म्हणतात. इ. स. १९५४ नंतर भाजण्याच्या जखमांतील सूक्ष्मजंतूंच्या संक्रामणाचा विशेष अभ्यास केला गेला व ते नियंत्रित करण्याकरिता नवीन उपाय शोधण्यात आले आणि १९६४ पर्यत त्यात सतत प्रगती होत गेली. वर्गीकरण भाजण्याचे वर्गीकरण निरनिरळ्या प्रकारांनी करता येते: (१) इजेची खोली, (२) इजा झालेला पृष्ठभाग आणि (३) कारणानुसार इजेची खोली : झालेली इजा शरीरपृष्ठभागापासून किती खोल गेली आहे त्यावरून वर्गीकरणाची पद्धत अमेरिका आणि राष्ट्रकुलातील देशांतून रूढ आहे. या पद्धतीत तीन श्रेणींत विभागणी करतात. इजेच्या खोलीनुसार भाजण्याची श्रेणी व भाजलेला शरीरभाग भाजण्याची श्रेणी भाजलेला शरीरभाग प्रथम श्रेणी बाह्यत्वचा द्वितीय श्रेणी (अ) पृष्ठस्थ त्वचा जाडीचा अल्पभाग, बाह्यत्वचा व पृष्ठस्थ अंतस्त्वचा. (आ) खोल बाह्यत्वचा व खोल अंतस्त्वचा. तृतीय श्रेणी (अ) पृष्ठस्थ त्वचेची संपूर्ण जाडी, संपूर्ण त्वचा. (आ) खोल त्वचा व अघस्त्वचीय ऊतक, स्नायू व अस्थी. स्त्रोत: मराठी विश्वकोश