लहान बाळांना दात येताना बऱ्याच वेळेला ताप येतो, पोट बिघडते. अशा वेळेला साधारण ६ व्या महिन्यापासून बाळाच्या हिरड्यांवर रोज मध चोळावे, दात व्यवस्थित येतात. या काळात पोट बिघडले असेल तर २ चमचे बडीशेप २ कप पाण्यात उकळून हा काढा. २ चमचे सकाळी आणि संध्याकाळी दयावा. या बडीशेपेच्या काढ्यामुळे बाळांना दूध पचते आणि भूक वाढते. उपाय डोळ्याची शक्ती वाढवण्यासाठी २ चमचे मधामध्ये गाजराचा रस मिसळून रोज हिवाळ्यात दिल्यास डोळ्यांना लाभदायक ठरते. घाव भरण्यासाठी काळे तीळ वाटून त्यात मध मिसळून त्याचा लेप जखमेवर लावल्यास जखम भरण्यास मदत होते. शरीराला भाजले असेल तर त्या ठिकाणी कोबीची स्वच्छ धुतलेली पाने ठेवून वरून स्वच्छ कापडाने ती जखम बांधून ठेवावी. रोज या जखमेवरील कोबीचे पान आणि कापड बदलावे. जखम पटकन भरून येते. कुठल्याही प्रकारचे किडे चावल्यास त्यावर लगेच मध लावावे. चावलेल्या ठिकाणी सूज येत नाही व वेदना कमी होतात. खूप उचक्या लागत असतील तर १ चमचा साजूक तुपात १ चमचा जिरे पूड घालून कालवून ठेवावे आणि उचक्या लागल्यावर चाटायला दयावे. जिरे आणि धणे समप्रमाणात एकत्र करून ठेवावे. हे मिश्रण रोज जेवणानंतर बडीशेपेच्या ऐवजी खाल्ल्यास आम्लपित्तासारखे विकार बरे होतात. स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट