सौर ऊर्जा ही सूर्याकडून प्रेषित होणारी चुंबकीय प्रारणाच्या (तरंगांच्या) रूपातील ऊर्जा आहे. सूर्याकडून उत्सर्जित होणारे विद्युत् चुंबकीय प्रारण आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व अधिक विरल जड अणुकेंद्रे म्हणजे सौर प्रारण होय. हे प्रारण उष्णतानिर्मिती करणारे, रासायनिक विक्रिया घडविणारे किंवा विद्युत् (वीज) निर्माण करणारे आहे. सूर्य हा अतिशय शक्तिशाली ऊर्जास्रोत आहे आणि सौर प्रारण हा पृथ्वीवर येणारा सर्वांत मोठा ऊर्जास्रोत आहे. तथापि, प्रत्यक्षात त्याची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तीव्रता पुष्कळच कमी असते. पृथ्वीकडे येणार्या सूर्यप्रकाशापैकी सुमारे ५४ टक्क्यांपर्यंतचा सूर्यप्रकाश वातावरण, त्यातील ढग व धूलिकण यांच्याकडून शोषला जातो वा प्रकिर्णित होतो (विखुरला जातो). सूर्यप्रकाशाची भूपृष्ठावरील तीव्रता कमी होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. असे असले, तरी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर ऊर्जास्रोत म्हणून सौर ऊर्जा वाढत्या प्रमाणात आकर्षक ठरली. कारण तिचा स्रोत न संपणारा आहे आणि या ऊर्जेने हानी होत नाही. दगडी कोळसा,तेल, नैसर्गिक वायू यांसारख्या इंधनांच्या तुलनेत सौर ऊर्जा अधिक सुरक्षित व खात्रीशीर ऊर्जा आहे. पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या भागाला दरवर्षी सौर प्रारणाची सुमारे १.५ X १०२१ वॉट-तास (औष्णिक ऊर्जेबरोबर) इतकी ऊर्जा मिळते. ही ऊर्जा पृथ्वीवर माणसे वापरत असलेल्या एकूण ऊर्जेच्या तुलनेत अगदी प्रचंड म्हणजे २३,००० पटींहून जास्त आहे. सूर्यापासून एकूण सुमारे ३.९ X १०२० मेवॉ. ऊर्जा उत्सर्जित होते व तिच्यापैकी केवळ दोन अब्जांश भागाएवढी ऊर्जा पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या भागात पोहोचते. पृथ्वीच्या वातावरणाच्या लगेचच बाहेर व संपूर्ण सौर वर्णपटातील मोजलेल्या सौर प्रारणाच्या शक्ति-घनतेला 'सौरांक' म्हणतात. म्हणजेव सूर्य यांच्यात सरासरी (माध्य) अंतर असताना वातावरणाच्या माथ्यावरील प्रारणाच्या आपतनाच्या दिशेत असलेल्या पृष्ठभागावर सूर्याकडून येऊन पोहोचणार्या ऊर्जेच्या त्वरेला सौरांक म्हणतात व तो दर चौ. सेंमी.ला ०.१४० वॉ. असतो. जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटनेनुसार १९८१ मध्ये सौर स्थिरांकाचे सर्वांत विश्वासार्ह मूल्य दर चौ. मी.ला १,३७० ± ६ वॉ. एवढे होते. या सौर शक्तीपैकी ८% शक्ती वर्णपटातील जंबुपार तरंगलांब्यांची, ४७% ऊर्जावर्णपटाची आणि ४५% ऊर्जातरंगलांब्यांची असते. सौर स्थिरांक हा वस्तुतः यथार्थ वा खरा स्थिरांक नाही. कारण पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेच्या लंबगोल आकारामुळे त्यात सतत लहान सहान बदल होत असतात. ५ जुलैच्या सुमारास पृथ्वी सूर्यापासून कमाल अंतरावर असताना सौर स्थिरांकाचे सरासरी मूल्य ३.३% कमी होते; तर ३ जानेवारीच्या सुमारास पृथ्वी सूर्याच्या सर्वांत जवळ असताना सौर स्थिरांकाच्या सरासरी मूल्यात सु. ३.४% इतकी असते. स्त्रोत: मराठी विश्वकोश